कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधात स्थानिक पोलिस ठाण्यात गैरव्यवहारप्रकरणी तक्रार दाखल करण्यासाठी मंगळवारी (दि. 28) कोल्हापूरला येत आहे, असे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना बुधवारी पत्राद्वारे कळविले आहे.
जिल्हा प्रवेशबंदीमुळे 20 सप्टेंबरला सोमय्या यांना कराड येथूनच मुंबईला माघारी परतावे लागले होते. आता सोमय्या पुन्हा दौर्यावर येत असल्याने 'हाय व्होल्टेज ड्रामा'चा दुसरा अंक सुरू होत आहे.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या कुटुंबाने 127 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा खळबळजनक आरोप करत किरीट सोमय्या यांनी सक्तवसुली संचालनालयाकडे (ईडी) तशी तक्रारही दाखल केली आहे. त्यानंतर कागल तालुक्यातील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना पाहणी आणि मुरगूड पोलिस ठाण्यात मुश्रीफ यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी 20 सप्टेंबरला कोल्हापूर दौर्यावर येत असल्याचे सोमय्या यांनी जाहीर केले होते.
सोमय्या यांच्या आरोपामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते कमालीचे संतप्त झाले होते. त्यांच्या कोल्हापूर दौर्यात अडथळा आणत तीव— निदर्शने करण्याची तयारी कार्यकर्त्यांनी केली होती. भाजपच्या कार्यकर्त्यांनीही प्रत्युत्तर देण्याची तयारी केल्याने वातावरण तापले होते. जिल्हाधिकार्यांनी कोल्हापूर जिल्हा प्रवेशबंदी केल्याने ते 20 सप्टेंबरच्या पहाटे कराड येथून माघारी परतले होते.
सोमय्या यांचे पत्र असे…
हसन मुश्रीफ यांच्या परिवारावर आर्थिक घोटाळ्यासंदर्भात पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यासाठी कोल्हापूरला येणे आवश्यक आहे. स्थानिक पोलिस ठाण्यात यासंदर्भात तक्रार व पुरावे द्यायचे आहेत. एफआयआर दाखल व्हायला हवा. कोल्हापूर जिल्हा प्रवेशबंदी आदेशात जिल्हाधिकार्यांनी म्हटले होते की, गणेश विसर्जनानिमित्त पोलिस व्यस्त आहेत, त्यामुळे 20 तारखेला प्रवेशबंदीचा आदेश काढावा लागत आहे. आता आपण 27 सप्टेंबरला मुंबईहून निघून 28 सप्टेंबरला कोल्हापुरात येणार आहे. यापूर्वी कळवलेले कार्यक्रम रद्द केले आहेत. मंगळवारी सकाळी 9 वाजता अंबाबाईचे बाहेरून दर्शन घेऊन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करणार आहे. याअनुषंगाने योग्य ती व्यवस्था करावी.
सोमय्या यांचा दौरा