भिगवण (पुणे); पुढारी वृत्तसेवा : नवऱ्याचे घरातील नात्यातील माहिलेशी असणारे अनैतिक संबंध आणि फक्त मुलीच होतात, मुलगा होत नाही या त्रासाला व जाचाला कंटाळून अकोले येथे २७ वर्षीय महिलेने आपल्या तीन वर्षांच्या मुलीसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. हा प्रकार इंदापुर तालुक्यातील अकोले गावी मंगळवारी (दि. २१) घडला.
मनिषा महादेव दराडे (वय २७ वर्षे) असे आत्महत्या केलेल्या या विवाहितेचे नाव आहे. तिने तिची लहान मुलगी भाग्यश्री महादेव दराडे (वय ३ वर्षे) हिस सोबत घेवून विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली.
याबाबत वडील नवनाथ विठोबा खैरे (वय ६५, रा. दादेगाव, ता. आष्टी, जि. बीड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती महादेव चंद्रकांत दराडे आणि रुपाली शरद खैरे (दोघे रा. अकोले, ता. इंदापुर, जि. पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली.
मनिषा हिला मुलगा होत नाही, तुला सर्व मुलीच आहेत. त्यामुळे आम्ही तुला सोडचिठ्ठी देणार आहोत, असे म्हणून मनीषाला वेळोवेळी मारहाण, शिवीगाळ, दमदाटी करून मानसिक व शारिरीक छळ केला जात होता. तसेच पती महादेव दराडे याच्या असणाऱ्या अनैतिक संबंधासही मनिषा कंटाळून गेली होती. त्यातूनच तिने तिची लहान मुलगी भाग्यश्री हिच्यासह अकोले येथील अशोक यशवंत गायकवाड यांच्या विहिरीतील पाण्यात उडी मारुन आपले जीवन संपवले.
या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक विनायक दडस पाटील हे करीत आहेत.