BUS : विनातिकिट प्रवाशांविरोधात एसटीची तपासणी मोहीम | पुढारी

BUS : विनातिकिट प्रवाशांविरोधात एसटीची तपासणी मोहीम

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : एसटी महामंडळाने एसटीमधून (BUS) विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात २२ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर २०२१ दरम्यान तपासणी मोहीम करणार आहे. मोहिमे दरम्यान विनातिकीट प्रवासी आढळल्यास संबंधितांकडून चुकविलेल्या भाड्याव्यतिरिक प्रवास भाड्याच्या दुप्पट रक्कम वसूल करण्यात येणार आहे.

हा दंड टाळण्यासाठी प्रवाशांनी विनातिकीट प्रवास करू नये, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे. प्रवाशांमध्ये जागरूकता निर्माण करण्याकरिता व विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आळा घालण्यासाठी २२ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर २०२१ (१५ दिवस) या कालावधी दरम्यान एसटी (BUS) महामंडळ तिकिट तपासणी मोहीम राबविणार आहे.

या मोहिमेत विभागातील मार्ग तपासणी  पथकातील व आगारातील सर्व पर्यवेक्षकीय कर्मचारी यांचाही समावेश केला जाणार आहे. हे सर्व अधिकारी विनातिकीट प्रवाशांविरोधात तपासणी मोहीम राबविणार आहेत.

यावेळी विनातिकट प्रवास करताना प्रवासी आढळल्यास त्यांच्याकडून चुकविलेल्या भाड्या व्यतिरिक्त प्रवास भाड्याच्या दुप्पट रक्कम किंवा रुपये १०० यापैकी जी रक्कम अधिक असेल ती दंड म्हणून वसूल करण्यात येईल. त्यामुळे एसटीतुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी विनातिकीट प्रवास करू नये. तसेच आपले तिकीट काळजीपूर्वक जपून ठेवावे, असे आवाहन महामंडळातर्फे करण्यात आले आहे.

Back to top button