पाकमधून काश्मीरमध्ये मोठी घुसखोरी | पुढारी

पाकमधून काश्मीरमध्ये मोठी घुसखोरी

जम्मू ; पुढारी वृत्तसेवा : गेल्या काही वर्षांत प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानातील दहशतवाद्यांकडून घुसखोरी चा सर्वात मोठा प्रयत्न झाला आहे. तो उधळून लावण्यासाठी भारतीय लष्करानेही ‘ऑपरेशन उरी’ तीव्र केले आहे. सोमवारी सलग दुसर्‍या दिवशी जम्मू-काश्मीरमध्ये याच एका मोहिमेत लष्कर व्यग्र होते.

उत्तर काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये सोमवारी सकाळपासून बंद करण्यात आलेली इंटरनेट सेवा आणि मोबाईल फोन सेवा मंगळवारीही बंदच ठेवण्यात आली. घुसखोरांमध्ये तालिबानी दहशतवाद्यांचा समावेश असण्याच्या शक्यतेने भारतीय लष्कराच्या चिंतेत वाढ झाली आहे.

लष्करातील अधिकार्‍यांनी सांगितले की, उरी हल्ल्याच्या पाचव्या स्मृतिदिनी शनिवारी रात्री उशिरा दहशतवाद्यांकडून घुसखोरीचा प्रयत्न झाल्याचे उघड झाले. उरी हल्ल्यानंतर भारताने नियंत्रण रेषेवर सर्जिकल स्ट्राईक करून पाकपुरस्कृत दहशतवादाला चोख प्रत्युत्तर दिले होते. यात अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्त झाले होते.

सुरुवातीला जवळपास सहा घुसखोरांचा एक गट पाकिस्तानातून दाखल झाला. या गटाच्या घुसखोरीच्या प्रयत्नादरम्यान लष्कराकडून गोळीबार करण्यात आला. दहशतवाद्यांच्या गोळीबारात एक भारतीय जवान जखमी झाला, असेही दिल्लीतील लष्करी सूत्रांकडून सांगण्यात येते.

घुसखोरांचा माग काढण्यासाठी लष्कराचे ऑपरेशन सुरू आहे. नियंत्रण रेषेवरील नेमकी परिस्थिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. घुसखोरीच्या प्रयत्नांच्या पार्श्‍वभूमीवर फोन सेवा आणि इंटरनेट बंद करण्याची ही पहिलीच वेळ आहे. भारत आणि पाकिस्तानी लष्करांदरम्यानच्या युद्धबंदी करारानंतर सीमापार घुसखोरीचा हा दुसरा प्रयत्न आहे. फेब्रुवारीपासून कुठल्याही बाजूने युद्धबंदीचे उल्लंघन झाल्याची नोंद नाही.

यावर्षीही युद्धबंदीचे उल्लंघन झालेले नाही; मात्र घुसखोरीला आवर न घातल्यास आम्ही युद्धबंदीच्या उल्लंघनास तयार आहोत, असे श्रीनगरातील 15 कोअरचे जनरल ऑफिसर कमांडिंग लेफ्टनंट जनरल डी. पी. पांडे यांनी सांगितले.

उरीमध्ये घुसखोरीविरुद्ध तीव्र केलेल्या मोहिमेनंतरही घुसखोर भारतीय हद्दीत आहेत की, पुन्हा सीमापार परतले आहेत, हेही अद्याप स्पष्ट झालेले नाही. दुसरीकडे, या सगळ्या दहशतीच्या सावटाखाली उरी परिसरातील लोक गेल्या दोन रात्रींपासून शांतपणे झोपलेले नाहीत. अफगाणिस्तानातील तालिबान राजवटीच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच ही मोठी घुसखोरी झाली आहे.

घुसखोरांमध्ये तालिबानीही असू शकतात, अशी शंका आहे. घुसखोरीनंतर 20 ते 25 दहशतवादी बेपत्ता आहेत. या सर्वांचा भारतीय लष्कराकडून शोध घेतला जात आहे. लढाऊ हेलिकॉप्टरही त्यासाठी भिरभिरत आहेत. नियंत्रण रेषेवर होणारी बर्फवृष्टी अनेकदा तारेचे कुंपण नेस्तनाबूत करून टाकते आणि घुसखोरांना संधी मिळते, ही या भागातील मोठी अडचण आहे.

Back to top button