प्रयागराज; वृत्तसंस्था : महंत नरेंद्र गिरी यांना ब्लॅकमेल करण्यात येत होते. त्यांच्या कुठल्या तरी व्हिडीओची सीडी तयार करण्यात आली होती. पोलिसांनी मंगळवारी ही सीडीही जप्त केली आहे. समाजवादी पक्षाच्या तत्कालीन सरकारमध्ये राज्यमंत्री असलेला एक नेता याप्रकरणी संशयाच्या भोवर्यात आहे. विविध राजकीय पक्षांशी संबंधित सहाजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, महंतांच्या सुरक्षा रक्षकांचीही चौकशी केली जाणार आहे.
महंतांचा चेला आनंद गिरी यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याची कसून चौकशी सुरू आहे. आनंद गिरी याच्याविरुद्ध जॉर्ज
टाऊन पोलिस ठाण्यात महंतांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी महाराज यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे सोमवारी आढळून आले होते. अल्लापूर येथील वाघंबरी मठाच्या खोलीत त्यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता. नरेंद्र गिरी महाराजांनी लिहिलेली एक चिठ्ठीही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. ही चिठ्ठी मृत्युपत्राप्रमाणे लिहिली असून, कोणत्या शिष्याला काय द्यायचे आणि किती द्यायचे, ते यात नमूद आहे. काही शिष्यांच्या व्यवहाराने मी अत्यंत दु:खी आहे, असेही यात लिहिले आहे. महंतांचा आखाडा सोडल्यानंतर त्यांचे शिष्य आनंद गिरी यांनी महंतांवर जमिनीच्या व्यवहारात कोट्यवधींच्या गैरव्यवहाराचा आरोप केला होता. दरम्यान, महंतांच्या अंतिम दर्शनासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मंगळवारी प्रयागराजला दाखल झाले. बुधवारी मृतदेहाची उत्तरीय तपासणी होईल आणि बुधवारीच पार्थिवाला समाधी दिली जाईल. मंगळवारी दिवसभर भक्तांना महंतांचे अंत्यदर्शन करू द्यावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत. महंतांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी करणारी याचिका यादरम्यान अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. 'लेटे हनुमान मंदिरा'चे पुजारी आद्या तिवारी आणि त्यांचा मुलगा संदीप तिवारी यांचीही याप्रकरणी चौकशी सुरू आहे.
प्रयागराज येथील पोलिस उपसंचालकांनी महंतांच्या मृत्यूप्रकरणी तपासासाठी दहा सदस्यांची 'एसआयटी' स्थापन केली असून, अजित चौहान हे या पथकाचे प्रमुख असतील.