

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: पंजाबमधील नेतृत्वबदलानंतर काँग्रेसने आता राजस्थानमधील पक्षांतर्गत मतभेद संपुष्टात आणण्याची कसरत सुरु केली आहे. राजस्थान काँग्रेसमधील अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील मतभेदावर पडदा टाकण्यासाठी काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी प्रयत्न सुरु केले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
पंजाबमधील नेतृत्वबदलानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याशी फोनवरुन चर्चा केल्याचे समजते. दरम्यान, राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. दोघांनी सुमारे दोन तास चर्चा केली. दीड वर्षांपूर्वी सचिन पायलट यांनी पक्षाविरोधात बंड केले होते. यानंतर प्रथम त्यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली आहे. यामुळे या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे. पायलट यांनी काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी-वढेरा यांच्याही भेट घेतली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी आणि सचिन पायलट यांच्यामध्ये तीन प्रमुख मुद्यांवर चर्चा झाली. पायलट यांची पक्षातील भूमिका, राजस्थान मंत्रीमंडळातील फेरबदलामध्ये त्यांना मिळणारे स्थान आणि पक्षातंर्गत बदल या मुद्यांवर दोघांमध्ये चर्चा झाली.
राजस्थान काँग्रेस नेत्यांमधील मतभेद दूर करण्यासाठी काँग्रेसने अजन माकन यांची नियुक्ती केली होती. मात्र पक्षातंर्गत नियुक्तीचा निर्णय घेण्याचे काम अपूर्णच राहिले आहे.
माकन यांनी पायलट आणि गेहलोत यांच्यातील मतभेद दूर करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र त्यांना यश आलेले नाही.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थान काँग्रेसमध्ये मोठे बदल करण्यासाठी चर्चा सुरु झाली आहे.
मंत्रीमंडळातील फेरबदलाबाबत पक्षश्रेष्ठीच निर्णय घेणार आहेत. तर जिल्हा काँग्रेस समिती अध्यक्षांच्या निवड करण्याचा अधिकार माकन यांना देण्यात आला आहे. यासाठी त्यांनी राज्यातील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी व जिल्हानिहाय नेत्यांशी चर्चा केली आहे.
मागील पावणे तीन वर्ष राजस्थान विधानसभा उपाध्यक्षपद रिक्तच आहे. या निवडीसंदर्भातही चर्चा झाल्याचे समजते.
सचिन पायलट मागील पाच दिवसांपासून दिल्लीत आहेत.
मंत्रीमंडळ फेरबदलात आपल्या समर्थकांची वर्णी लागण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरु केले आहेत.
हेही वाचलं का ?