Modi-Biden : अफगाण परिस्थितीवर मोदी-बिडेन यांच्यादरम्यान होणार चर्चा | पुढारी

Modi-Biden : अफगाण परिस्थितीवर मोदी-बिडेन यांच्यादरम्यान होणार चर्चा

नवी दिल्ली; पुढारी वृत्‍तसेवा : Modi-Biden : तालिबानने अफगाणिस्तानवर केलेला कब्जा, त्यामुळे निर्माण झालेली अस्थिर परिस्थिती, इस्लामी देशांत वाढत असलेली कट्टरता, दहशतवाद आदी मुद्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्यादरम्यान 24 तारखेला चर्चा होणार आहे.

परराष्ट्र खात्याचे सचिव हर्षवर्धन श्रृंघला यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. पंतप्रधान मोदी बुधवारी अमेरिका दौर्‍यावर रवाना होणार असून 26 तारखेला ते परततील, असेही श्रृंघला यांनी नमूद केले.

मोदी आणि बिडेन यांची समोरासमोर होत असलेली ही पहिलीच बैठक आहे. इंडो-पॅसिफिक क्षेत्राच्या सुरक्षेसाठी स्थापन करण्यात आलेल्या क्‍वाड परिषदेला दोन्ही देशांचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

याशिवाय संयुक्‍त राष्ट्रसभेच्या आमसभेत मोदी यांचे भाषण होणार आहे. पंतप्रधानांसमवेत अमेरिका दौर्‍यावर एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ जात असून त्यात परराष्ट्र खात्याचे मंत्री एस. जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्‍लागार अजित डोभाल यांचा समावेश आहे.

भारत आणि अमेरिका यांच्यादरम्यानच्या द्विपक्षीय संबंधाचा आढावा घेण्याबरोबरच व्यापार व गुंतवणुकीला चालना देणे, संरक्षण क्षेत्र मजबूत करणे, सुरक्षाविषयक सहकार्य, स्वच्छ इंधनाला चालना देणे आदी प्रमुख मुद्यांवर मोदी आणि बिडेन यांच्यात चर्चा होणार आहे.

अमेरिका दौर्‍यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांचीही भेट घेणार आहेत.

अफगाणवरील तालिबानच्या कब्जामुळे जगभरात अस्थिरता झाली असून जागतिक दहशतवादी जाळे उध्वस्त करण्याचेही मोठे आव्हान आहे.

त्यामुळे मोदी-बिडेन चर्चेदरम्यान दोन्ही देशांचा भर या मुद्यावर राहील, असे श्रृंघला यांनी स्पष्ट केले. बिडेन यांनी आयोजित केलेल्या कोविड – 19 विषयावरील जागतिक परिषदेला मोदी हजर राहणार आहेत, अशी माहितीही श्रृंघला यांनी दिली.

 

Back to top button