जीवसृष्टीला कारणीभूत ठरणार्‍या रेणूंचे अंतराळात भांडार | पुढारी

जीवसृष्टीला कारणीभूत ठरणार्‍या रेणूंचे अंतराळात भांडार

लंडन ः अंतराळाच्या अनंत पसार्‍यात केवळ पृथ्वीवरच जीवसृष्टी आहे असे म्हणणे हे कुपमंडूक वृत्तीचेच लक्षण आहे. मात्र, तरीही विज्ञानाला अद्याप पृथ्वीबाहेरील जीवसृष्टीचा शोध लागलेला नाही. एका ताज्या संशोधनामुळे लवकरच याबाबतचे रहस्य उलगडेल असे चित्र आहे. वैज्ञानिकांनी आपल्या ‘मिल्की वे’ नावाच्या आकाशगंगेतील तरुण तार्‍यांच्या आसपास ऑगेनिक मॉलिक्यूल्स म्हणजेच जैविक रेणूंच्या मोठ्या भांडाराचा शोध लावला आहे. याच रेणूंमुळे पृथ्वीवर जीवसृष्टी विकसित झाली होती.

लीडस् युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी याबाबतचे संशोधन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की याच कार्बनिक रेणूंमुळेच पृथ्वीवर जीवसृष्टी शक्य झाली. आता अंतराळात त्यांचे प्रमाण आधीच्या तुलनेत शंभरपट अधिक आढळून आले आहे. संशोधिका कॅथरिन वॉल्श यांनी सांगितले की आपल्या ग्रहावरील जीवसृष्टीसाठी आवश्यक असलेली सामग्री आकाशगंगेतील अन्य तार्‍यांच्या आसपासही आढळते. त्यामुळे जीवसृष्टीच्या प्रारंभासाठीचे रेणू हे ग्रहांच्या निर्मितीसाठीच्या आवश्यक वातावरणातही सहजपणे उपलब्ध असू शकतात.

आपली सौरमालिका ज्या आकाशगंगेचा एक भाग आहे त्या ‘मिल्की वे’ आकाशगंगेत सुमारे 400 अब्ज तारे आहेत. प्रत्येक तार्‍याभोवती किमान एक ग्रह फिरतो आहे. लाखो तारे ‘गोल्डीलॉक्स झोन’मध्ये आहेत, ज्या ठिकाणी द्रवरूप पाण्याची शक्यता आहे. डॉ. जीन इली यांनी सांगितले की हे अतिशय जटिल कार्बनिक रेणू अंतराळात वेगवेगळ्या वातावरणात आढळतात. वायू आणि धुळीतून फिरणार्‍या तरुण तार्‍यांच्या ‘प्रोटोप्लॅनेटरी डिस्क’मध्ये त्यांचा शोध घेण्यात आला. असे रेणूच पृथ्वीवरील ‘बायोलॉजिकल केमिस्ट्री’साठी ‘कच्चा माल’ ठरले होते. योग्य परिस्थितीत तेच अमिनो अ‍ॅसिड, शर्करा आणि रायबोन्यूक्लिक अ‍ॅसिड (आरएनए)ची निर्मिती करतात. पृथ्वीवरील पहिले जीवन ‘आरएनए’वरच आधारित होते असे मानले जाते.

Back to top button