गणेश विसर्जन : साताऱ्यात भक्‍तीमय वातावरणात बाप्पांना निरोप | पुढारी

गणेश विसर्जन : साताऱ्यात भक्‍तीमय वातावरणात बाप्पांना निरोप

सातारा ; पुढारी वृत्तसेवा : आज अनंत चतुर्देशी दिवशी सार्वजनिक तसेच घरगुती गणेश विसर्जन होत आहे. त्‍या पार्श्वभूमीवर सातार्‍यातील यंत्रणा सज्ज झाली आहे. अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशी ‘बाप्पा चालले अपुल्या गावाला.. चैन पडेना आम्हाला’, गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या’ च्या गजरात जिल्ह्यातील सुमारे 577 सार्वजनिक गणेश मंडळांच्या तर घरगुती 32 हजार 617 गणेश मूर्तींचे विसर्जन झाले. त्यामध्ये सातारा शहरातील 35 गणेश मंडळे व 2500 घरगुती गणेश मूर्तींचा समावेश होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मिरवणुकांना व जल्लोषाला फाटा देण्यात येवून शांततेने व भक्तीमय वातावरणात हे गणेश विसर्जन झाले.

पुढच्या वर्षी लवकर या’ च्या गजरात विघ्नहर्त्यांला निरोप

कोरोनामुळे यावर्षी सुध्दा मिरवणुका न काढताच सातारा शहर व परिसरासह जिल्ह्यात भक्तीमय वातावरणात ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ च्या गजरात आपल्या लाडक्या विघ्नहर्त्यांना निरोप दिला.

जिल्ह्यात सध्या कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी संसर्गाची धास्ती कायम आहे. त्यामुळे अनंत चतुर्दशीला होणारी गर्दी टाळण्यासाठी अनेकांनी पूर्वसंध्येलाच आपल्या गणेशमूर्तींचे विसर्जन केले.

पर्यावरणपूरक कृत्रिम कुंडांची व्यवस्था

जिल्ह्यातही ठिकठिकाणी पर्यावरणपूरक कृत्रिम कुंडांची व्यवस्था करण्यात आली आहे. शनिवारी सकाळपासूनच घरगुती गणपतींचे विसर्जन पारंपारिक पद्धतीने ठिकठिकाणी करण्यात आले. गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला.

अनंत चतुर्दशी पुर्वसंध्येला मिरवणुका न काढता साध्या पध्दतीने काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आपल्या गणेशमुर्तीचे विसर्जन केले.

संगम माहूली येथील कृष्णा नदी तिरावर तसेच वर्येपूल व वाढे पुलाजवळ वेण्णा नदीपात्रात सकाळपासूनच गणपती विसर्जनसाठी सातारा शहर परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती.

त्यामुळे भाविकांच्या गर्दीने शहर परिसरातील नदीतीर फुलून गेले होते. रविवारी अन्य सर्वच मूर्तींचे विसर्जन होणार आहे. त्यासाठी संबंधित तळ्यांवर चोख व्यवस्था करण्यात आली आहे.

राजवाड्यावरील पोहण्याचा तलाव येथे विसर्जनाची सोय

सातारा शहरात नगरपलिकेच्यावतीने बुधवार नाका, गोडोली, दगडी शाळा-सदरबझार, हुतात्मा स्मारक, राजवाड्यावरील पोहण्याचा तलाव येथे विसर्जनाची सोय करण्यात आली आहे.

तसेच अनेक ठिकाणी पाण्याचे कृत्रिम कुंड तयार करण्यात आले आहेत. तसेच निर्माल्यासाठी विसर्जन तलावाजवळ घंडागाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस दलातर्फे चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

विसर्जन ठिकाणी पालिकेने लाईफ गार्ड तैनात करण्यात आले आहेत. तसेच मोठ्या मूर्तींसाठी 100 मेट्रिक टनी क्रेनही उपलब्ध करण्यात आली आहे.

दरम्यान, सातारा जिल्ह्यात सायंकाळपर्यंत 550 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे तर सातारा शहरातील 35 सार्वजनिक गणेश मंडळे व 2500 घरगुती गणेशमुर्तींचे विसर्जन करण्यात आले.

आज अनंत चतुर्दशी दिवशी उर्वरीत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे व घरगुती गणेशमुर्तीचे विसर्जन करण्यात येणार आहे.

जागेवरच आरती करुन विसर्जनासाठी रवाना…

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी पोलिस प्रशासनाने विसर्जनस्थळी आरती करण्यावर निर्बंध लावले आहेत. तसेच विसर्जनस्थळी गर्दी करु नये, प्रसाद वाटप करु नये, असे आवाहन केले आहे.

त्यामुळे यावर्षी घरगुती व सार्वजनिक अशा सर्व गणेश मूर्तीं जागेवरच आरती झाल्यानंतर मगच विसर्जनासाठी रवाना होत आहेत. त्यामुळे विसर्जनस्थळी होणार्‍या गर्दीवर नियंत्रण येण्यास मदत होत आहे.

Back to top button