खंडाळा साखर कारखान्यासाठी 17 ऑक्टोबरला मतदान | पुढारी

खंडाळा साखर कारखान्यासाठी 17 ऑक्टोबरला मतदान

लोणंद : पुढारी वृत्तसेवा

खंडाळा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. कारखान्याच्या 21 जागांसाठी येत्या 17 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, पुणे यांच्या वतीने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला गेला आहे. सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होत आहे .

खंडाळा कारखान्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम यापूर्वीच जाहीर झाला होता. मतदार याद्या प्रसिद्ध होऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचे तीन दिवस राहिले असताना कारखान्याच्या निवडणुकीला स्थगिती मिळाली
होती. 31 ऑगस्ट रोजी सरकारने सहकारी संस्थांसह कारखान्याच्या निवडणुकीवरील स्थगिती उठवली. त्यामुळे सहकार निवडणुक प्राधिकरणाकडून सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

त्यानुसार सोमवार व मंगळवार या दोन दिवशी सकाळी 11 ते 3 या वेळेत खंडाळा तहसिल कार्यालयात अर्ज दाखल करण्याची मुदत देण्यात आली आहे. त्याचदिवशी अर्जाची यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. दि. 22 रोजी छानणी करून दि. 23 रोजी वैध अर्जांची यादी प्र्रसध्द करण्यात येणार आहे. दि. 7 ऑक्टोबरपर्यंत अर्ज माघारीची मुदत देण्यात आली आहे. दि. 8 ऑक्टोबरला चिन्ह वाटप करण्यात येणार आहे. तर दि. 17 रोजी कारखान्यासाठी मतदान होणार आहे. तर दि. 19 रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

कारखान्याच्या 21 संचालकांपैकी व्यक्ती उत्पादक खंडाळा , शिरवळ , बावडा , भादे व लोणंद या पाच गटांमध्ये प्रत्येकी 3 असे एकूण 15 संचालक, महिला राखीव गटातून दोन महिला संचालक, संस्था व बिगर उत्पादक सभासद प्रतिनिधी, अनुसूचित जाती / जमाती प्रतिनिधी, इतर मागास मतदार प्रवर्ग प्रतिनिधी, भटक्या विमुक्त जाती जमाती व विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी मतदारसंघातून प्रत्येकी एक संचालक असे एकूण 21 निवडून द्यायचे आहेत .

इच्छुकांनी उमेदवारी अर्जाची 100 रुपये फी भरून अर्ज खरेदी करून वेळेत अर्ज दाखल करावेत. अनुसूचित जाती जमातीच्या उमेदवारांसाठी 300 रुपये, तर इतर उमेदवारांसाठी 1000 रुपये अनामत शुल्क राहणार आहे.

आ. मकरंद पाटील निवडणूक लढणार का?

खंडाळा कारखान्याची निवडणूक प्रतिष्ठेचा विषय आहे. खंडाळा तालुक्यातील राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांची खंडाळा कारखान्याची निवडणूक लढवावी अशी इच्छा आहे. मात्र, आ. मकरंद पाटील निवडणूक लढवायला तयार होणार का? याबाबत चर्चा सुरू झाली
आहे. खंडाळ्यातील भाजप व्यतिरिक्त आणखी एक गट खंडाळा विकास आघाडीच्या माध्यमातून कारखान्याची निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. आ. मकरंद पाटील राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून निवडणूक लढवणार की असंतुष्टांची मोट बांधून त्यांच्या आघाडीला पाठबळ देणार? याविषयी उत्सुकता आहे.

Back to top button