

निमोणे; पुढारी वृत्तसेवा : शिरूर तालुक्यातील गुनाटनजीक कोळपेवाडी परिसरात वनविभागाच्या पिंजर्यात एक बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले; मात्र अद्यापही या परिसरात दोन बिबट्यांचा वावर असल्याने नागरिकांना भीतीच्या सावटाखालीच जगावे लागत आहे. या परिसरात उसाची पिके मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मुबलक खाद्य व पाणी असल्यामुळे मागील काही वर्षांपासून बिबट्यांचे या परिसरातील वास्तव्य वाढले आहे.
मागील एक महिन्यापासून तीन बिबट्यांचा वावर येथे पाहायला मिळत असल्यामुळे शेतशिवारातील कामे रोडावली होती. वनविभागाने या परिसरात पिंजरा लावल्यानंतर तब्बल दहा-पंधरा दिवस बिबट्या मुक्तविहार करीत असल्याने दिवसेंदिवस नागरिकांमध्ये घबराट पाहिला मिळत होती; मात्र मंगळवारी (दि. 6) पहाटेच्या दरम्यान एक बिबट्या पिंजर्यात सापडल्याने नागरिकांनी काहीसा मोकळा श्वास घेतला आहे.