Gujarat Election Results 2022 | गुजरातमध्ये भाजप सुसाट, मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार भूपेंद्र पटेल यांचा मोठा विजय

Gujarat Election Results 2022 | गुजरातमध्ये भाजप सुसाट, मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार भूपेंद्र पटेल यांचा मोठा विजय

Gujarat Election Results 2022 : गुजरातमध्ये भाजप ऐतिहासिक विजयाच्या मार्गावर आहे. भाजपने १५५ जागांवर विजयी आघाडी घेतली आहे. तर काँग्रेस १७ जागांवर आघाडीवर असून आपने ६ जागांवर मुसंडी मारली आहे. दरम्यान, गुजरातमधील भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार भूपेंद्र पटेल यांनी घाटलोडियाच्या शहरी मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला आहे.
त्यांनी प्रतिस्पर्ध्यावर जवळपास २९ हजार मतांची आघाडी घेतली आहे.

गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल घाटलोडिया विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आहेत. यापूर्वी माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल या घाटलोडियामधून आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. २०१२ च्या गुजरात निवडणुकीत आनंदीबेन पटेल यांनी काँग्रेसच्या रमेशभाई पटेल यांचा १ लाख १० हजार मतांनी पराभव केला होता. यानंतर आनंदीबेन गुजरातच्या मुख्यमंत्री झाल्या. तर २०१७ मध्ये भूपेंद्र पटेल यांनी काँग्रेसच्या शशिकांत भुराभाई यांचा १ लाख १७ हजार मतांनी पराभव केला होता. त्यानंतर पटेल मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले होते. सध्याच्या निवडणुकीत भाजपने या जागेवरून विद्यमान मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना पुन्हा उमेदवारी दिली. त्यांचा सामना काँग्रेसच्या अमी याज्ञनिक आणि आम आदमी पक्षाचे विजय पटेल यांच्याशी झाला.

घाटलोडिया मतदारसंघात याआधीही भाजपचे वर्चस्व राहिले आहे. हा मतदारसंघ गुजरातमधील अहमदाबाद जिल्ह्यात येते. सरखेजमधून वेगळा करून या मतदारसंघाची रचना करण्यात आली आहे. या जागेची विशेष गोष्ट म्हणजे येथून विजयी झालेले दोन आमदार मुख्यमंत्री झाले आहेत. या जागेवरून २०१२ मध्ये आनंदीबेन पटेल यांनी विजय मिळवला होता. २०१४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तेव्हा आनंदीबेन पटेल यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपवण्यात आले होते.

कसा आहे घाटलोडिया मतदारसंघ?

घाटलोडिया मतदारसंघात पाटीदार समाज मोठा आहे. पाटीदार समाजाच्या आंदोलनानंतरही गेल्या निवडणुकीत भूपेंद्र पटेल यांनी सहज विजय मिळवला होता. आता पाटीदार आंदोलनाचे प्रमुख समजले जाणारे हार्दिक पटेल भाजप सोबत आहेत.
घाटलोडिया येथे भूपेंद्र पटेल यांच्या प्रचारासाठी गृहमंत्री अमित शहा गेले होते. शहा यांनी पटेल यांच्यासोबत रोड शो केला. भुपेंद्र पटेल यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून पाठवा, असे आवाहन शहा यांनी जनतेला केले होते. (Gujarat Election Results 2022)

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news