Gujrat Assembly Election 2022 : पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल विजयी | पुढारी

Gujrat Assembly Election 2022 : पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल विजयी

पुढारी ऑनलाईन डेस्क : गुजरातमधील पाटीदार समाजाचे तरुण नेते आणि भाजपचे उमेदवार हार्दिक पटेल विजयी झाले आहेत. अहमदाबाद जिल्ह्यातील विरमगाम मतदारसंघातून भाजपने त्यांना तिकीट दिले होते. त्यांना ७३ हजार ७८६ मते मिळाली आहेत. आम आदमी पक्षाचे अमरसिंह अनादजी ठाकूर ३९ हजार १३५ मतांसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. काँग्रेसचे नेते भारवाड़ लाखाभाई भीखाभाई यांना तिसऱ्या क्रमांकाची २८ हजार ६३४ मते मिळाली आहेत. २०१२ आणि २०१७ या सलग दोन विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसने विरमगामची जागा जिंकली होती.

हार्दिक पटेल हा पाटीदार समाजाचा युवा चेहरा भाजपने जनतेला दिला आहे. त्यांनी काही महिन्यांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेसबरोबर हार्दिक यांची इनिंग फार काळ चालली नाही. हार्दिक यांनी 2019 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 2020 मध्ये त्यांना राज्याचे कार्यकारी अध्यक्ष देखील केले होते. परंतु, अन्याय होत असल्याचा आरोप करत त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला होता. हार्दिक पटेल यांनी भाजपचे कमळ हाती घेतल्यानंतर त्यांनी ही पहिलीच निवडणूक लढवली. हार्दिक पटेल हे उत्तम कौशल्य असलेले युवा नेतृत्व असले तरी काँग्रेसमधून भाजप प्रवेश करणा-या पटेल यांचे भविष्य काय असेल? याची मोठी चर्चा गुजरात निवडणुकीत होती.

हार्दिक यांचा जन्म 20 जुलै 1993 रोजी गुजरातमध्ये झाला. त्यांचे वडील भरत भाई आणि आई उषा पटेल यांनी त्यांना चांगले शिक्षण दिले. पटेल कुटुंब मुलांच्या शिक्षणासाठी विरमगाम शहरात राहायला आले होते. विरमगामच्या दिव्य ज्योत स्कूलमधून त्यांनी सहावी ते आठवीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर 2010 मध्ये त्यांनी अहमदाबादच्या हार्दिक सहजानंद कॉलेजमध्ये बीकॉमचे शिक्षण पूर्ण केले. गेल्या सात वर्षांत ते गुजरातमध्ये भाजपच्या विरोधात मैदानात उतरले होते. गुजरात विधानसभा निवडणुकीत पाटीदार समुदायाची महत्वाची भूमिका ठरली आहे.

या मतदारसंघात २०१७ च्या निवडणुकीत डॉ. तेजश्रीबेन दिलीपकुमार पटेल भाजपच्या तिकिटावर रिंगणात होत्या. परंतु त्यांना काँग्रेसच्या भारवाड लाखाभाई भिखाभाई यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. काँग्रेसच्या उमेदवाराला ७६ हजार १७८ मते मिळाली होती. तर भाजपला ६९ हजार ६३० मते मिळाली होती.

महाविद्यालयातून विकसित झाले नेतृत्वाचे गुण

हार्दिक पटेल यांनी महाविद्यालयाच्या विद्यार्थी संघटनेच्या सरचिटणीसपदाच्या निवडणुकीत भाग घेतला होता. त्यावेळी त्यांची बिनविरोध निवड झाली होती. पटेल हे पाटीदार समाजाचं नेतृत्त्व करतात. पाटीदार समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी त्यांनी आंदोलन छेडले होते. पटेल समाजाला सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात आरक्षण मिळावे, या मागणीसाठीच्या आंदोलनातून उदयास आलेले नेतृत्व म्हणूनही त्यांची ओळख आहे.

काँग्रेस प्रवेशानंतर 16 महिन्यांत प्रदेशाध्यक्ष

हार्दिक पटेल 12 मार्च 2019 रोजी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांनी प्राथमिक सदस्य ते कार्यकारी प्रदेशाध्यक्ष असा प्रवास अवघ्या 16 महिन्यांत पूर्ण केला होता. काँग्रेसमध्ये हार्दिक पटेलला चांगली संधी होती. मात्र, २०२२ च्या गुजरात निवडणुकीपूर्वी हार्दिक पटेलने काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी.आर.पाटील यांनी त्यांचा पक्षात समावेश केला आहे.

हेही वाचा :

Back to top button