Gujarat- Morbi Election Result : मोरबी दुर्घटनेत १३५ मृत्यूची नोंद झालेल्या मतदारसंघात भाजप आघाडीवर | पुढारी

Gujarat- Morbi Election Result : मोरबी दुर्घटनेत १३५ मृत्यूची नोंद झालेल्या मतदारसंघात भाजप आघाडीवर

पुढारी ऑनलाईन डेस्क : गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल आज गुरुवारी (दि.८) जाहीर होत आहे. गुजरातच्या निवडणुकीकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. गुजरातमधील मोरबी मतदारसंघ खूप चर्चेत आहे कारण तिथे काही दिवसांपूर्वी मोरबी येथील मच्छू नदीवरील ‘केबल ब्रिज’ अचानक तुटल्याने झालेल्या दुर्घटनेत 132 मृत्यूची नोंद झाली होती. ही घटना ऐन प्रचाराच्या दिवसांमध्ये घडली होती. याचा परिणाम निवडणुकीवर होणार का? याकडे देशाचे लक्ष लागले होते. जाणून घेऊया मोरबी मतदारसंघात कोण आघाडीवर आहे. (Gujarat- Morbi Election Result )

Gujarat- Morbi Election Result : भाजप आघाडीवर

गुजरातमध्ये विधानसभेच्या १८२ जागा आहेत. आतापर्यंत हाती आलेल्या कलांनुसार भाजप गुजरातमध्ये विक्रमी बहुमत मिळवताना दिसत आहे. भाजपने १५६ जागांवर आघाडी घेतली असून काॅंग्रेस खूप मागे म्हणजे १७ जागांवर आघाडीवर आहे. तर आपने या निवडणुकीतून गुजरातमध्ये स्वतःचे पाय रोवले आहेत. या राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाला ९२ जागा प्राप्त होणे आवश्यक आहे.

Gujarat- Morbi Election Result : दुर्घटनेतील मोरबीतही भाजप आघाडीवर

ऐन निवडणुकींच्या प्रचारांच्या घामघुमीत  मोरबी येथील मच्छू नदीवरील ‘केबल ब्रिज’ अचानक तुटून झालेल्या दुर्घटनेत 132 मृत्यूची नोंद झाली होती. घटनेनंतर पुलाची व्यवस्थित पुर्नबांधणी झाली नाही. यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला. त्यामुळेच ही दुर्घटना घडली, असे अनेकांनी आरोप केले. त्यामुळे याचा परिणाम मतदारांवर होईल? अशी शक्यता वर्तवली जात होती. पण या मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे कांतिलाल अमृत्या शिवलाल आघाडीवर आहेत. मोरबी निवडणूक निकाल हे सांगत आहे की, कांतिलाल  शिवलाल अमृतिया हे  १७१८ मतांनी आघाडीवर आहेत. आतापर्यंत त्यांना १०,१५६ मत मिळाली आहेत. या मतदारसंघात कॉंग्रेसचे उमेदवार जयंती पटेल यांच्याविरोधात लढत आहे. तर आपचे  पंकज रनसारिया हे पिछाडीवर आहेत.

दरम्यान, ही दुर्घटना घडताच त्यावेळी तेथे उपस्थित असलेले आमदार अमृतिया यांनी थेट नदीत उडी घेऊन बचाव कार्य सुरू केले. त्यांनी बचाव पथकाला मदत करत अनेक जणांचे प्राण वाचविले त्यांच्या या कृतीची मोठी चर्चा झाली होती. आमदार अमृतिया हे आतापर्यंत आपल्या राजकीय कारकीर्दीत पाचवेळा आमदार राहीले आहेत.

काय आहे मोरबी दुर्घटना 

गुजरातमधील मोरबी येथे मच्छू नदीवरील ‘केबल ब्रिज’  सायंकाळच्या  6.30 दरम्यान अचानक तुटल्याने झालेल्या दुर्घटनेत 13५ मृत्यूची नोंद झाली होती. पूल तुटताच पुलावरील बहुतांश जण नदीत पडले. दुर्घटना घडली तेव्हा पुलावर 500 पेक्षा जास्त लोक होते. या घटनेने मोरबीत एकच धावपळ उडाली. पोलिसांनी तसेच प्रशासनाने तत्काळ बचाव मोहीम सुरू केली. शक्य तितक्या लोकांना नदीतून बाहेर काढले. पुलाची नुकतीच दुरुस्ती करण्यात आली होती व तो पूर्ववत सुरू करण्यात आला होता. तत्पूर्वी, 6 महिने तो पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला होता.  दुर्घटनेच्या पाच दिवस अगोदर तो पर्यटकांसाठी खुला करण्यात आला होता.

मोरबी पुलाचा इतिहास 

मोरबीचे तत्कालीन राजे प्रजावत्सल सर वाघजी ठाकोर हे राजमहालातून दरबारापर्यंत या पुलाने जात असत. त्यांच्या काळातच पुलाची निर्मिती झाली. राजेशाही संपुष्टात आल्यानंतर मोरबी नगरपालिकेवर या पुलाची जबाबदारी सोपविण्यात आली. लाकूड आणि तारेने बनविण्यात आलेला हा पूल 233 मीटर लांब आणि 4.6 फूट रुंद आहे. हा पूल एक पर्यटनस्थळ होते. त्यासाठी 15 रुपये तिकीट दरही आकारला जात असे. 1880 मध्ये 3 लाख 50 हजार रुपये खर्चून हा पूल बनविण्यात आला होता. पुलासाठीचे साहित्य तेव्हा ब्रिटनमधून मागविण्यात आले होते.

हेही वाचा

Back to top button