Chhattisgarh Mine Collapse : छत्तीसगडच्या बस्तरमध्ये खाण कोसळून ६ ठार, २ जखमी

रायपूर; पुढारी ऑनलाईन : छत्तीसगडमधील बस्तरमधील माझगाव येथे शुक्रवारी मुरुमाच्या खाणीचा काही भाग कोसळला. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला. स्थानिक ग्रामस्थांकडून मुरुमाच्या खाणीच्या खाली मिळणारी चुनखडी काढण्याचे काम सुरु होते. या वेळी अचानक खाणीचा काही भाग धसला, त्यामुळे स्थानिक मजूर ढिगाऱ्याखाली दबले गेले. या ढिगाऱ्याखाली आठ स्थानिक मजूर गाडले गेल्याचे सांगण्यात येत आहे. खाणीचे खोदकाम सुरू असताना हा अपघात झाला. या मजुरांमध्ये महिलांचाही समावेश आहे. जेसीबीच्या सहाय्याने सात मजुरांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. (Chhattisgarh Mine Collapse)
शुक्रवारी मुरुमाच्या खाणीतील चुनखडी काढण्यासाठी खोदकाम करताना बोगदा कोसळल्याने आठ स्थानिक मजूर जागीच गाडले गेल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेत सहा स्थानिक ग्रामस्थांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये पाच महिलांचा समावेश आहे. (Chhattisgarh Mine Collapse)
या घटनेची माहिती देताना बस्तरच्या सहाय्यक पोलिस अधीक्षक निवेदिता पाल यांनी सांगितले की, नगरनार पोलीस स्टेशन हद्दीतील माझगाव येथील सरकारी जमिनीवर मुरुमच्या खाणीतून ग्रामस्थांकडून चुनखडी बऱ्याच दिवसांपासून काढली जात होती. गावकरी त्यांच्या कच्च्या घरांचे प्लास्टर करण्यासाठी या चुनखडीचा वापर करतात. (Chhattisgarh Mine Collapse)
बराच काळ चुनखडी काढल्याने त्या जागी लांब पल्ल्याची बोगद्यासारखी पोकळी तयार झाली होती. नेहमीप्रमाणे शुक्रवारीही दुपारी बाराच्या सुमारास आठ ग्रामस्थ माती काढण्यासाठी बोगद्यात घुसले होते. थोड्याच वेळात बोगद्याच्या वरची माती धसली गेली, त्यामुळे बोगद्यात घुसलेले सर्व गावकरी आत गाडले गेले.
घटनेची माहिती मिळताच प्रशासन आणि पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि जेसीबीच्या सहाय्याने मृतदेह व जखमींना बाहेर काढले. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये गावच्या सरपंचाच्या भावाचाही समावेश आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, जखमींना किरकोळ दुखापत झाली असून, त्यांना वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. परिसरातील ही पहिलीच घटना असल्याने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.
अधिक वाचा :
- हेअर ट्रान्सप्लांटच्या शस्त्रक्रियेनंतर तरुणाचा मृत्यू : दिल्लीत चौघांवर गुन्हे – Video
- Hansika Motwani : हंसिकाची मेहंदी सेरेमनी, लाल रंगाच्या ड्रेसमध्ये सजली
- Maharashtra- Karnataka border dispute | महाराष्ट्रातील मंत्र्यांनी कर्नाटकात येऊ नये, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा इशारा