भारत जोडो यात्रा रोखून दाखवाच : राहुल गांधीचे आव्हान | पुढारी

भारत जोडो यात्रा रोखून दाखवाच : राहुल गांधीचे आव्हान

पुढारी ऑनलाईन डेस्क : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अपमानाच्या मुद्यावरून काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातच रोखा, अशी मागणी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे खासदार राहुल शेवाळे यांनी केली होती. यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. भारत जोडो यात्रा श्रीनगर पर्यंत नेण्याचं लक्ष आहे. जर सरकारला यात्रा रोखायची असेल तर रोखून दाखवा, असे आव्हान त्यांनी सरकारसह खासदार राहुल शेवाळे यांना दिले. अकोला येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी पत्रकारांनी मराठीतून विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली.

भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातच रोखण्याच्या भाजप नेत्यांच्या मागणीनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी प्रथमच मीडियासमोर आले. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार घणाघात केला. खासदार शेवाळे यांचे विचार चुकीचे आहेत असं नाही, ते त्यांचे वैयक्तिक विचार आहेत. जर सरकारला यात्रेमुळे देशाचे नुकसान होत आहे, अस वाटत असेल तर यात्रा रोखून दाखवा, असे आव्हान त्यांनी दिले.

पुढे ते म्हणाले की, लोकांना भारत जोडो यात्रेची गरज नाही, असं वाटत असतं तर हजारो लोक यात्रेत सहभागी झाले नसते. सत्ताधाऱ्यांकडून न्यायव्यवस्थेवर दबाव आणला जात आहे. शिक्षणासाठी, वैद्यकीय उपचारासाठी पैसे द्यावे लागतात. सरकारी शाळा, दवाखाने बंद होत आहेत. महाराष्ट्रात तर २० पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या सरकारी शाळा बंद केल्या जात आहेत. महागाई तर वाढत आहे. मग देशातील पैसे कोठे जात आहेत. पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढत आहेत, ते पैसे कोठे, कोणाच्या हातात जात आहेत, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थीत केला.

५० खोक्यांवरून राहुल गांधींचा निशाणा

पैशांची आमिष देत विरोधी पक्ष संपविण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. अनेकजण ५० कोटींसाठी विकले जात आहेत. पण भारतात चांगल्या लोकांची कमी नाही ते काँग्रेस सोबत येतील, अशी टीका त्यांनी महाराष्ट्रातील सत्तांतरावर केली.

देशातील सर्वात मोठा प्रश्न बेरोजगारी आणि शेतकऱ्यांचा

भारत जोडो यात्रेदरम्यान देशातील सर्वात मोठ्या दोन समस्या दिसून आल्या. पहिली म्हणजे युवकांना कोणत्याही विद्यापीठातून पदवी मिळते, पण नोकरी मिळेल याची शाश्वती नाही. दुसरा प्रश्न शेतकऱ्यांचा आहे. देशात बेरोजगारी, महागाई वाढत आहे. भाजपचे नेते शेतकऱ्यांसोबत बोलत नाहीत. लोकांमध्ये फक्त भीती निर्णाण केली जात आहे.

भारत जोडो यात्रा उत्तर प्रदेशमधून जाणार

भारत जोडो यात्रा उत्तर प्रदेशमधून जाणार नाही अशी चुकीची माहिती कोण पसरवत आहे माहीत नाही. पण यात्रा उत्तर प्रदेश मधून जाणार आहे. दिल्लीतून उत्तर प्रदेशमध्ये, तेथून हरियाणा, पंजाब, जम्मू काश्मीरमध्ये जाणार आहे, असे राहुल गांधी यांनी यावेळी सांगितले.

…तर गुजरात निवडणुकीत सहभागी होणार

कन्याकुमारी येथून सुरू झालेली यात्रा काश्मीर पर्यंत जाणार आहे. ती पूर्ण करण्याचे लक्ष आहे. पण काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगितले तर गुजरात निवडणुकीतही सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा :

Back to top button