भवानीनगर : ऊस वाहतूक वाहनांना रिफ्लेक्टर सक्तीचे करा; नागरिकांसह वाहनधारकांची मागणी | पुढारी

भवानीनगर : ऊस वाहतूक वाहनांना रिफ्लेक्टर सक्तीचे करा; नागरिकांसह वाहनधारकांची मागणी

भवानीनगर; पुढारी वृत्तसेवा : बारामती- इंदापूर रस्त्यावरून उसाची वाहतूक करणार्‍या अनेक वाहनांना रिफ्लेक्टर नसल्यामुळे रात्रीच्या वेळी अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे या वाहनांना रिप्लेक्टर सक्तीची करण्याची मागणी परिसरातील नागरिकांसह अन्य वाहनधारकांनी केली आहे. इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातून श्री छत्रपती साखर कारखाना, बारामती अ‍ॅग्रो, कर्मयोगी साखर कारखाना, निरा भीमा सहकारी साखर कारखाना आदींसह अनेक कारखान्यांची उसाची वाहने वाहतूक करीत आहेत.

परंतु या वाहनांना मागील बाजूस कापडी रिप्लेक्टर लावण्याची आवश्यकता आहे. रात्रीच्या वेळी उसाची वाहतूक करणार्‍या ट्रेलरला कापडी रिप्लेक्टर लावल्यानंतर तो रिप्लेक्टर पाठीमागून येणार्‍या वाहनचालकाच्या त्वरित लक्षात येतो व त्यामुळे अपघात टाळण्यास मदत होते. सध्या ऊस वाहतूक करणार्‍या अनेक वाहनांवर रिप्लेक्टर नसल्यामुळे रात्रीच्या वेळी उसाने भरलेले वाहन पाठीमागून येणार्‍या वाहनचालकाला दिसत नाही. रात्रीच्या वेळी उसाच्या वाहनाच्या पाठीमागून दुचाकी किंवा चारचाकी गाडी येत असेल व समोरून येणार्‍या वाहनांच्या दिव्याचा प्रखर प्रकाश वाहनचालकांच्या डोळ्यावर आल्यानंतर त्याला पुढे असलेले उसाचे वाहन दिसत नाही. त्यामुळे अपघात होतो.

टेपरेकॉर्डर असणार्‍या ट्रॅक्टरवर कारवाई आवश्यक
अनेक ऊस वाहतूक करणारे वाहनचालक मोठमोठ्या आवाजात ट्रॅक्टरमधील टेपरेकॉर्डर लावून उसाने भरलेले वाहन बेजबाबदारपणे चालवतात. त्यामुळेदेखील वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन अपघाताची शक्यता असते. परंतु अशा वाहनांकडे आरटीओचे दुर्लक्ष दिसत आहे. रिफ्लेक्टर नसणार्‍या तसेच ट्रॅक्टरवर टेपरेकॉर्डर असणार्‍या वाहनांवर कारवाई केल्यास अपघातांना आळा बसण्यास मदत होईल.

रस्त्यावर थांबणार्‍या बैलगाड्या धोकादायक
बैलगाडीतून उसाची वाहतूक करणारे मजूर उसाने भरलेली बैलगाडी पंक्चर झाल्यानंतर रस्त्यावरच उभी करतात. रात्रीच्या वेळी अशा पंक्चर झालेल्या बैलगाड्या वाहनचालकांना दिसत नाहीत. त्यामुळेदेखील अपघात होतात. बैलगाड्यांना देखील रिप्लेक्टर बसवण्याची आवश्यकता आहे.

 

Back to top button