शिवसेनेचे चाळीस आमदार फोडले, तरी दुप्पट निवडून येतील : सुषमा अंधारे
कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेचे चाळीस आमदार फोडले असले, तरी त्याच्या दुप्पट आमदार निवडून आणण्याची क्षमता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे. भाजपचे जातीयवादी राजकारण महाराष्ट्रात विष पेरण्याचे काम करत असून एकनाथ शिंदे गटालाही संपवण्याचा कुटील डाव रचला जात असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत केला.
शिवसेनेने जातीपातीचे राजकारण कधीच केले नाही. प्रत्येकाला पक्षात स्थान दिले. आमदार, खासदार, मंत्री केले. खा. धैर्यशील माने यांना पक्षाचा प्रवक्ता केले, तरीही त्यांनी गद्दारी केली. खा. संजय मंडलिक यांचीही तशीच स्थिती आहे. शिवसेनेतून शिंदे यांच्यासोबत जे आमदार गेले, त्यांना आगामी निवडणुकीत जनता जागा दाखवेल.
महाराष्ट्राची अर्थव्यवस्था डळमळीत करण्याचे काम सुरू आहे. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला जात असताना सरकार गप्प का, असा सवाल त्यांनी केला. शिंदे गटासोबत गेलेल्या राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार प्रकाश आबिटकर यांच्यावरही त्यांनी टीका केली.
अजून चार्जशीट दाखल का नाही
किरीट सोमय्या यांनी यापूर्वी आरोप केलेल्या खासदार भावना गवळी, यशवंत जाधव व इतर मंडळींवर अद्याप चार्जशीट का दाखल केले नाही? या सार्यांची उत्तरे सोमय्या यांनी दिली, तर शिवबंधन बाजूला ठेवून त्यांच्या नावाचा गंडा बांधायला तयार आहे, असेही अंधारे यांनी सांगितले. यावेळी शिवसेना उपनेत्या संजना घाडी, जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, माजी आमदार सुजित मिणचेकर, शहरप्रमुख रवीकिरण इंगवले, प्रतिज्ञा उत्तरे उपस्थित होते.

