दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली ठाकरे गटाची याचिका, निवडणूक आयोगाला तातडीने निर्णय घेण्याचे दिले आदेश | पुढारी

दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली ठाकरे गटाची याचिका, निवडणूक आयोगाला तातडीने निर्णय घेण्याचे दिले आदेश

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा- धनुष्यबाण हे पक्षचिन्ह गोठविण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावत निवडणूक आयोगाला या विषयावर लवकरात लवकर अंतिम निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत. ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

मुंबईतील अंधेरी मतदारसंघातील पोटनिवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठविले होते. त्यावेळी ठाकरे आणि शिंदे गटांना वेगवेगळी नावे व वेगवेगळी चिन्हे देण्यात आली होती. त्यानंतर ठाकरे गटाने निवडणूक आयोगाच्या वरील निर्णयाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मंगळवारी झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने ठाकरे गटाची याचिका फेटाळून लावली. पक्षचिन्हाचा अंतीम निर्णय लवकर घ्यावा, असे निर्देशही न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले आहेत.

ज्या कारणांसाठी धनुष्यबाण चिन्ह गोठविण्यात आले होते, ते कारण आता राहिलेले नाही. त्यामुळे स्थिती पूर्ववत करावी, असा युक्तिवाद ठाकरे गटाकडून करण्यात आला होता. पक्षचिन्ह गोठविताना आमची बाजूदेखील ऐकून घेण्यात आली नव्हती, असे ठाकरे गटाचे म्हणणे होते. गेल्या 8 ऑक्टोबर रोजी निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव व धनुष्यबाण चिन्ह गोठविले होते. त्यानंतर ठाकरे गटाला मशाल तर शिंदे गटाला ढाल-तलवार हे चिन्ह देण्यात आले होते.

हेही वाचा:

Back to top button