अहमदाबाद; पुढारी ऑनलाईन : विजय रुपाणी यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर गुजरातचा नवा मुख्यमंत्री (Gujarat New CM) कोण होणार? याची चर्चा सुरु आहे. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत अनेक दिग्गज आहे. पण उपमुख्यमंत्री नितीन पटेल, केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया, पुरुषोत्तम रुपाला, गुजरात भाजपचे नेते आर. सी. फालदू, सी. आर. पाटील आणि लक्षद्वीपचे प्रशासक प्रफुल्ल पटेल हे मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार (Gujarat New CM) मानले जात आहेत.
गुजरातमधील गांधीनगरमध्ये आज रविवारी भाजपच्या आमदारांची बैठक होत आहे. या बैठकीसाठी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, नरेंद्र सिंह तोमर उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत नवीन नेता निवडला जाणार आहे. यावेळी नवीन मुख्यमंत्रीपदाचा चेहरा हा पाटीदार समाजातील असेल अशी अटकळ बांधली जात आहे.
आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपला कोणतीही जोखीम घ्यायची नाही असे चित्र दिसते. पाटीदार समाज हा गुजरातमध्ये भाजपची व्होटबँक आहे. पण हरियाणा आणि झारखंड प्रमाणे भाजप गुजरातमध्ये नव्या चेहऱ्याला संधी देऊन नवी राजकीय खेळी खेळू शकते, असा काही राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे.
याआधी उत्तराखंड आणि कर्नाटकमध्ये नेतृत्व बदल करण्यात आला आहे. आता गुजरातमध्ये देखील भाजपचा मुख्यमंत्री बदलला जात आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या सव्वा वर्ष आधीच विजय रुपाणी मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाले. राज्यपालांकडे आपला राजीनामा सुर्पूद केल्यानंतर रुपाणी यांनी नव्या जोमाने काम करण्याची इच्छा व्यक्त केली.
गुजरातच्या विकासाची यात्रा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेृतृत्वात नव्या उत्साहाने आणि नव्या नेतृत्वात पुढे जायला हवी. या उद्देशाने आपण राजीनामा दिल्याचे रुपाणी यांनी स्पष्ट केले.
विधानसभा निवडणूक कोणत्या नेतृत्वात होईल, या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजप प्रत्येक राज्यात निवडणुका लढणार असल्याचे सांगितले.
गुजरात विधानसभेच्या १८२ जागांसाठी पुढील वर्षी डिसेंबरमध्ये निवडणुका होणार आहेत.
मुख्यमंत्रीपदासाठी केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया आणि पुरुषोत्तम रुपाला यांचे नावे सर्वांधिक चर्चेत आहे. जर या दोन केंद्रीय मंत्र्यांपैकी कोणाची निवड झाली नाही तर सी. आर. पाटील बाजी मारु शकतात. उपमुख्यमंत्री नितीन पटेल हे देखील प्रमुख दावेदार मानले जात आहेत.
गुजरात विधानसभेच्या मागील निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसमध्ये कांटे की टक्कर पहायला मिळाली होती. पण भाजपने सत्ता कायम राखण्यात यश मिळवले होते. त्यामुळे यावेळी कोणतीही जोखीम घ्यायचे नाही असे भाजपचे धोरण दिसते.