England vs India Test : ये पैसा बोलता है..! | पुढारी

England vs India Test : ये पैसा बोलता है..!

निमिष पाटगावकर

भारत-इंग्लड (England vs India Test) मालिकेतील मँचेस्टरचा शेवटचा सामना जिंकून इतिहास रचायला भारत तयार आहे असे वाटत असतानाच हा सामना अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्याची बातमी आली आणि सर्व क्रिकेटरसिकांच्या आनंदावर विरजण पडले. शुक्रवार दुपारपर्यंत निव्वळ गोंधळाचे वातावरण होते. भारताने सामना बहाल केला, अशी बातमी प्रथम आली. थोड्या वेळाने कळले की, सामना बहाल केला नाही तर तो रद्द झाला आहे.

सामना रद्द होण्याचे कारणही प्रथम संभाव्य कोरोनाचा धोका असेे दिले, तर नंतर भारतीय खेळाडूंची सामना खेळायची मानसिक अवस्था नाही हे कारण दिले. भारत आणि इंग्लडच्या क्रिकेट रसिकांची यामुळे निराशा झाली; पण या सर्व घडामोडींमागचे अर्थकारण लक्षात घ्यायला हवे. यासाठी आपल्याला प्रथम काही महिने मागे जावे लागेल.

दुसर्‍या आणि तिसर्‍या कसोटीत जो नऊ दिवसांचा अवधी होता, तो चार दिवसांचा करावा, ही बीसीसीआयची मागणी इंग्लिश बोर्डाने धुडकावून लावली होती. या मागणीमागे आयपीएलला पुरेसा वेळ मिळावा हेच कारण होते. मँचेस्टरचा सामना नियोजित वेळेप्रमाणे 14 तारखेला संपला असता.

आयपीएलचे दुबईचे सामने 19 सप्टेंबरपासून सुरू होत आहेत आणि आयपीएलसाठी सहा दिवसांचा विलगीकरण कालावधी निश्चित केला आहे. याचाच अर्थ असा की, मँचेस्टर कसोटी खेळलो असतो तर रोहित शर्मा, बुमराह, सूर्यकुमार यादव यांसारख्या महारथींना आयपीएलचा पहिला सामना आणि विराट कोहली, सिराज यांना 20 तारखेचा दुसरा सामना मुकावा लागला असता.

हे पाच खेळाडू मँचेस्टरची कसोटी (England vs India Test) रद्द झाल्या झाल्या आरटी-पीसीआर चाचणीचे निगेटिव्ह रिपोर्ट घेऊन चार्टर्ड विमानाने दुबई आणि अबुधाबीला पोहोचले देखील. तिथे उतरता क्षणीच त्यांची चाचणी पुन्हा निगेटिव्ह आली तेव्हा त्यांचे आणि संघमालकांचे मानसिक स्वास्थ्य उत्तम असायला हरकत नाही.

आयपीएलचे अर्थकारण आपण लक्षात घेतले पाहिजे. ही आयपीएल जर पूर्ण झाली नाही तर बीसीसीआयचे जवळपास 2500 कोटींचे नुकसान झाले असते. या आयपीएलमध्ये बीसीसीआयला 708 कोटींची रक्कम प्रायोजकांकडून मिळणार आहे. बीसीसीआयने 5 वर्षांकरिता स्टार टीव्हीला प्रक्षेपण हक्क 16,347 कोटींना विकले आहेत.

म्हणजे वर्षाचे साधारण 3270 कोटींचे उत्पन्न आहे. याव्यतिरिक्त तिकीट विक्री वगैरेचे किरकोळ उत्पन्न आहेच. या अर्थकारणाची मँचेस्टर कसोटीशी तुलना केली तर आपल्या पगाराची अंबानींच्या उत्पन्नाशी तुलना केल्यासारखे आहे. मँचेस्टर कसोटी स्थगित झाल्यामुळे 10 मिलियन पौंड तिकीट विक्री, 30 मिलियन पौंड प्रसारण हक्क असे 40 मिलियन पौंड म्हणजे 406 कोटी रुपयांची उलाढाल होती.

त्यातही बीसीसीआयने सामना खेळायचा नाहीच, हा निर्धार लावून धरल्याने शेवटी वाटाघाटी निष्फळ ठरल्यावर सामना रद्द व्हायचे कारण बहाल करणे, कोरोना संकट बदलून खेळाडूंची सामना खेळायची मानसिक स्थिती नाही हे जाहीर केले. कारण पहिल्या दोन कारणांनी इंग्लिश बोर्डाला इन्शुरन्सची रक्कम मिळायला त्रास झाला असता.

म्हणजेच लँकेशायर आणि इंग्लिश बोर्डालाही आता काही आर्थिक तोटा नाही. तोटा झालाच तर तो मायबाप प्रेक्षकांचा; पण त्यांना कोण विचारतो? त्यांचे तिकिटाचे पैसे परत मिळतील; पण शनिवारी रोनाल्डो खेळत असलेल्या मँचेस्टर युनायटेडच्या सामन्यांमुळे तिथली हॉटेल्स बुक आहेत. क्रिकेटप्रेमींना या अवाच्या सव्वा भावाने बुक केलेल्या हॉटेलच्या भाड्याचे आणि प्रवासखर्चाचे अतोनात नुकसान सहन करावे लागले आहे.

हे सर्व पूर्वनियोजित होते का? नसेल; पण जेव्हा रवी शास्त्री, अरुण आणि श्रीधर यांना कोरोना होतो, तेव्हा आपले खेळाडू मानसिक स्वास्थ्य राखून ओव्हल कसोटी जिंकतात; पण बुधवारपर्यंत कसून सराव करणारा संघ एका सहायक फिजिओच्या कोरोना चाचणीमुळे सामना खेळायचाच नाही इतके मनस्वास्थ्य घालवून बसतो हे पटणारे नाही. ही भीती कोरोनाची नसून पुन्हा आयपीएल रद्द झाली तर होणार्‍या आर्थिक नुकसानीची आहे. ‘ये पैसा बोलता है…!’ हेच खरे!

Back to top button