सिंहायन आत्मचरित्र प्रकरण 31: रणरागिणी | पुढारी

सिंहायन आत्मचरित्र प्रकरण 31: रणरागिणी

गतवर्षी पाच नोव्हेंबर 2020 रोजी ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी पंचाहत्तर वर्षे पूर्ण केली. ‘पुढारी’ हे विविध चळवळींचे प्रथमपासूनचे व्यासपीठ. साहजिकच, संयुक्त महाराष्ट्र लढ्यापासून अनेक राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक घटनांचे ते साक्षीदार आहेत. केवळ साक्षीदार नव्हे, तर सीमा प्रश्नासह अनेक आंदोलनांत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. पाऊण शतकाचा हा प्रवास; त्यात कितीतरी आव्हाने, नाट्यमय घडामोडी, संघर्षाचे प्रसंग! हे सारे त्यांनी शब्दबद्ध केले आहेत, ते या आत्मचरित्रात. या आत्मचरित्रातील काही निवडक प्रकरणे ‘बहार’मध्ये क्रमशः प्रसिद्ध करण्यात येत आहेत. – संपादक, बहार पुरवणी

दिल्ली झाली दीनवाणी,
दिल्लीशाचे गेले पाणी
ताराबाई रामराणी,
भद्रकाली कोपली ॥

हिंदवी स्वराज्यरक्षिका महाराणी, रणरागिणी ताराराणी यांचं अगदी यथार्थ वर्णन या काव्यात करण्यात आलं आहे. मराठ्यांच्या स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास म्हणजे एक विलक्षण रोमांचक आणि तितकाच धगधगता कालखंड आहे, यात शंकाच नाही. छ. संभाजी महाराज हे औरंगजेबाच्या कैदेत कपटाने कैद झाल्यानंतर त्या क्रूरकर्मा बादशहानं हाल हाल करून अत्यंत निर्दयीपणानं त्यांची निर्घृण हत्या केली. संभाजी महाराजांच्या हौतात्म्यानंतर शिवशाहीची सूत्रं त्यांचे कनिष्ठ बंधू युवराज छ. राजाराम महाराजांकडे आली; पण दुर्दैवानं तेही अल्पायुषी ठरले!

छत्रपती राजाराम महाराजांच्या निर्वाणानंतर राज्य निर्नायकी झाले. हे जरी खरं असलं, तरी ज्याप्रमाणे गवतास भाले फुटावेत, त्याप्रमाणे सार्‍या स्वराज्यातून स्वातंत्र्ययुद्धाचा वणवा पेटला. परंतु, या वणव्यालाही एक दिशादर्शक नेतृत्व हवंच असतं. म्हणून मग छ. राजारामांच्या धर्मपत्नी महाराणी ताराराणी यांनी अवघ्या वयाच्या पंचविसाव्या वर्षी स्वराज्याची धुरा सांभाळली आणि पराक्रमाची शिकस्त केली. महाराणी ताराबाईंना आपले पिता सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या रक्ताचा पराक्रमाचा वारसा लाभला होता, तर शिवरायांच्या पराक्रमाचा, मुत्सद्दीपणाचा आणि गनिमी काव्याचा वारसा त्या तितक्याच समर्थपणे चालवत होत्या.
गदिमांनी म्हटलेलं आहे –

शिवरायांची सून प्रतापी महाराणी तारा
स्फूर्ती दे तव स्मृती चिरंतन लाख लाख मुजरा…

अफाट सामर्थ्य असलेल्या मोगल बादशहा औरंगजेबाशी तुटपुंज्या साधनानिशी आणि मूठभर सैन्यबळानिशी त्यांनी कडवी झुंज दिली. आपल्या तळपत्या तलवारीच्या तेजाळ धारेने औरंगजेबाच्या सैन्याला दख्खनच्या मातीत ‘सळो की पळो’ करून सोडलं. अखेर मराठ्यांना नेस्तनाबूत करण्याचे औरंगजेबाचे मनसुबे मातीमोल झाले. इतकेच काय, पण त्याला पुन्हा दिल्लीचं तोंडही पाहता आलं नाही. मराठ्यांशी अपयशी लढत देतानाच महाराष्ट्राच्या मातीतच त्याला आपला देह ठेवावा लागला. अखेर त्याची कबर महाराष्ट्रातच बांधावी लागली.

मराठ्यांनी बलाढ्य मोगल सैन्याचा जो निर्णायक पराभव केला, तो महाराणी ताराराणी यांच्या विजिगीषू नेतृत्वामुळेच!

रामराणी भद्रकाली,
रणरंगी क्रुद्ध झाली
प्रलयाची वेळ आली
मुगल हो सांभाळा ॥

ताराराणींचा इतिहास धुंडाळताना कवी गोविंदांनी केलेलं हे त्यांचं वर्णन यथार्थच वाटतं.

पुढे औरंगजेबाच्या कैदेत असलेले, छ. संभाजी महाराजांचे सुपुत्र युवराज शाहू, औरंगजेबाच्या मृत्यूनंतर सुटून स्वराज्यात परत आले. परंतु, त्यांच्याशी झालेल्या बखेड्यानंतर स्वाभिमानी, स्वामिनी, रणरागिणी, स्वराज्यरक्षिका महाराणी ताराराणी यांनी करवीर क्षेत्री येऊन स्वतंत्र राज्याची स्थापना केली. त्यातूनच कोल्हापूरची गादी उदयास आली आणि म्हणूनच भविष्यात राजर्षी शाहू महाराजांसारखा द्रष्टा राजा आपल्याला मिळाला. राजर्षींनी या संस्थानाचा सर्वांगीण विकास केला. समतेची गुढी याच राज्यातून सर्वप्रथम रोवली गेली आणि बहुजनांच्या दारी शिक्षणाची गंगाही आली.

हिंदवी स्वराज्य संस्थापक, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे माझं परमदैवत. तसेच राजर्षी शाहू महाराज हेही माझं आराध्य दैवत. त्यामुळेच मी 1974 साली छ. शिवराज्याभिषेक त्रिशतसंवत्सरी आणि राजर्षी शाहू महाराज जन्मशताब्दी हे दोन्ही सोहळे शासकीय इतमामात आणि लोकोत्सव स्वरूपात घडवून आणले होते. मी मुळातच इतिहासाचा चाहता आणि भक्त असल्यानं, हे लोकसोहळे पार पाडत असतानाच माझ्या मनात महाराणी ताराराणी यांचं भव्य पुतळ्याच्या स्वरूपात स्मारक उभं करण्याची कल्पना घोळू लागली होती आणि तेव्हाच मी ताराराणींचा पुतळा उभा करण्याचा मनोमनी संकल्पही करून टाकला होता.

करवीर राज्य संस्थापिका, महाराणी ताराराणी यांचं खुद्द करवीरातच उचित स्मारक नाही, ही उणीव माझ्या मनात घर करून होती. ती दूर करण्याचा मग मी निश्चयच केला.

शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू, इतिहासकार डॉ. अप्पासाहेब पवार यांनी ताराबाईकालीन कागदपत्रे प्रकाशित करण्याचं अत्यंत बहुमोल कार्य पार पाडलं होतं. त्यातून ताराराणींच्या कार्यावर नव्यानं प्रकाशझोत पडला होता. ताराराणींनी स्वराज्याच्या रक्षणासाठी केलेले अथक प्रयत्न या नव्या संशोधनातून अधोरेखित झाले होते. मी इतिहासाचा अभ्यासक आणि भक्त असल्यामुळे या कागदपत्रांचा मी काळजीपूर्वक अभ्यास केला आणि त्यामुळे माझ्या मनातला ताराराणींबद्दलचा आदर अधिकच वाढला. त्यातून महाराणी ताराराणींचा भव्य अश्वारूढ पुतळा उभा करण्याची संकल्पना अधिकच द़ृढ झाली.

खरं तर 1971 पासूनच माझ्या मनात महाराणी ताराराणी यांचा पुतळा उभारण्याची कल्पना घोळत होती. तेव्हा काही प्रतिष्ठित नागरिक आणि उद्योगपतींबरोबर मी त्यासंदर्भात चर्चाही केली होती. ताराराणींनी दिल्लीवर धडक मारून दिल्लीच्या तख्तालाही नमवलं होतं. त्यामुळे केवळ कोल्हापुरातच नव्हे, तर दिल्लीतही ताराराणींचा पुतळा उभा राहिला पाहिजे, ही माझी इच्छा होती.

ती इच्छा मी आबांनाही बोलून दाखवली, तेव्हा आबा म्हणाले, “बाळ, हे तर माझं स्वप्न होतं. 1974 सालीच मी इंदिराजींना पत्र लिहून माझी भावना बोलून दाखवली होती. त्यांचाही सकारात्मक प्रतिसाद आला होता. पण पुढे केंद्रात सत्तांतर झालं आणि तो प्रश्न तसाच राहून गेला. आता तू लक्ष घालतोयस, याचा मला मनापासून आनंद होतोय. तू एखादी गोष्ट मनावर घेतलीस, की त्याची तड लावल्याशिवाय राहात नाहीस. पुढे हो!”

आबांच्या या प्रोत्साहनानं माझ्या अंगात बारा हत्तींचं बळ न येईल तरच नवल! 1975 पासून मी ‘निर्णयसागर’च्या कामकाजासाठी सातत्यानं मुंबईतच वास्तव्यास होतो. थोडी उसंत मिळाली, की लगेच कोल्हापूरला येत असे. त्या काळात अधूनमधून ‘सत्यवादी’कार बाळासाहेब पाटील यांना जाऊन भेटत असे. अशाच एका भेटीत बोलता बोलता महाराणी ताराराणींचा विषय निघाला.

मी त्यांना म्हणालो, “साहेब, ताराराणींचे आपल्यावर कधीही न फिटणारे ऋण आहेत. करवीर राज्याची स्थापना करून त्यांनी कोल्हापूरला एक नवी ओळख दिली. इतिहास दिला. नाहीतरी अशी अनेक शहरं आहेत, की ज्यांना इतिहासच नाही. परंतु, दुर्दैवानं मात्र अशा रणरागिणीचं तिच्या पराक्रमाला साजेसं भव्य स्मारक कोल्हापुरात नाही!”

त्यावर बाळासाहेब पाटील म्हणाले, “अगदी माझ्या मनातलं बोललात. माझीही तीच इच्छा होती. पण आता माझं वय झालं ऐंशी! सहस्रचंद्रदर्शन करायच्या वयात ही डोंगराएवढी जबाबदारी मी कशी पेलणार? माझ्या चार मुलांपैकी कोणीही तुमच्या इतका कर्तृत्ववान नाही. त्यामुळे ही जबाबदारी तुम्हीच पार पाडू शकाल याची मला खात्री आहे. तुम्ही तरुण आहात! लाथ माराल तिथं पाणी काढण्याची तुमच्यात धमक आहे! तेव्हा तुम्हीच ही जबाबदारी अंगावर घ्या! शक्य तिथं मार्गदर्शनाला मी आहेच! आपण दोघेही बाळासाहेबच! मग हे काम मी केलं काय नि तुम्ही केलं काय, शेवटी बाळासाहेबच करणार ना? लागा कामाला!”

‘सत्यवादी’कारांचं म्हणणं योग्यच होतं. स्मारकाचं काम मोठ्या धावपळीचं असतं. सार्वजनिक क्षेत्रातील अनेकांशी संपर्क साधावा लागतो. बैठका घ्याव्या लागतात. सर्वानुमते निर्णय घ्यायचे असतात. सगळ्यांच्या सूचनांचा विचार करायचा असतो. स्मारकाचं स्वरूप, त्याची जागा ठरवायची असते. एक म्हणता शंभर गोष्टी असतात. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून महापालिकेला सहभागी करून घ्यायचं, निधी उभा करायचा, असाही बराच व्याप! ‘सत्यवादी’कार बाळासाहेब पाटील हे तेव्हा ऐंशीच्या उंबरठ्यावर होते. एवढी दगदग आपल्याला पेलणार नाही, असं म्हणून त्यांनी स्मारक उभारणीसंबंधीची सर्व जबाबदारी माझ्यावरच टाकली.

आणि मी जबाबदारी उचलली

त्यानंतर मी तातडीनं हालचाली केल्या. 1978 मध्ये बी. एन. मखिजा हे कोल्हापूर महापालिकेचे प्रशासक होते. मी पुढाकार घेऊन महापालिकेत कोल्हापुरातील मान्यवरांची बैठक बोलावली. 10 मार्च 1978 रोजी ही बैठक झाली. महाराणी ताराराणींच्या पुतळ्याच्या उभारणीचं कामकाज तातडीनं सुरू व्हावं, अशा भावना मी व्यक्त केल्या.

राजर्षी शाहू स्मारक भवनासाठी निधी उभारण्याची जबाबदारी मी नुकतीच यशस्वीपणे पार पाडली होती. त्यामुळे अर्थातच ताराराणींच्या पुतळ्यासाठी निधी संकलनाची जबाबदारी ओघानं माझ्याकडेच आली. ‘शुभस्य शीघ्रम’ आणि ‘Start with yourself’ या दोन्ही उक्तींप्रमाणे मी त्या बैठकीतच माझा भरीव निधी जाहीर केला. पाठोपाठ शांतिनाथ पाटणे आणि ‘सत्यवादी’कार बाळासाहेब पाटील यांनीही आपापल्या देणग्या जाहीर केल्या. निधी संकलनाचा प्रारंभ तिथूनच झाला.

या बैठकीला लेफ्टनंट जनरल (निवृत्त) एस. पी. पी. थोरात, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू बॅ. पी. जी. पाटील, कोल्हापूरचे डी. आय. जी. सहस्रभोजने, जिल्हाधिकारी डी. टी. जोसेफ, जिल्हा पोलिसप्रमुख यू. डी. राजवाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

तेव्हा कोल्हापूर महापालिकेत आयुक्त वि. शं. करंदीकर हे होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली पुतळा समिती स्थापन करण्यात आली. महापालिकेनं जबाबदारी उचलली. महापालिकेत पुतळा उभारणीचा ठराव मंजूर झाला. निधी संकलनाची जबाबदारी मी स्वतः घेतल्यानं इतरांनी सुटकेचा निःश्वास टाकला. निधी संकलन म्हणजे केवढं मोठं दिव्य असतं, याचा मी यापूर्वी अनुभव घेतलेला होताच.

हा वसा म्हणजे सावित्रीच्या वशाहूनही अवघड. एकवेळ सत्यवानाचे प्राण यमाच्या तावडीतून परत सोडवून आणणं सोपं आहे; पण निधी गोळा करणं अशक्य! परंतु, मी ती कामगिरी स्वेच्छेनं स्वीकारली आणि ती यशस्वीरीत्या पारही पाडली आणि स्मारकाच्या कामाला वेग आला.

स्मारकासाठी बैठका सुरू झाल्या. राजकीय, सामाजिक आणि सार्वजनिक क्षेत्रातील नेते नि कार्यकर्ते तसेच उद्योग व्यवसायातील मान्यवरांची बैठकांना उपस्थिती असे. बहुतेक बैठका ‘पुढारी’ भवनातच झाल्या; तर काही बैठका ‘सत्यवादी’ कार्यालयातही झाल्या. महाराणी ताराराणींचा आगळावेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण अश्वारूढ पुतळा उभारावा, ही माझी कल्पना. पुतळ्याचं काम कोणत्या शिल्पकाराला दिल्यास योग्य होईल, यावर बैठकीत चर्चा झाली आणि काही सूचना आल्या.

‘सत्यवादी’कारांनी एक-दोन नावं सुचविली. तथापि कोल्हापूरचे सुपुत्र, सुप्रसिद्ध शिल्पकार आणि आमचे मित्र रवींद्र मेस्त्री यांच्यावर ही जबाबदारी सोपवावी, अशी सूचना मी मांडली आणि सर्वानुमते त्यावर शिक्कामोर्तबही झालं.

रवींद्र मेस्त्री हे कलामहर्षी बाबुराव पेंटर यांचे सुपुत्र. पित्याच्या कलेचा समृद्ध वारसा त्यांना लाभलेला. रवींद्र मेस्त्रींनी मोठ्या आनंदानं हे काम स्वीकारलं.

पुतळा माझ्या मनातला

महाराणी ताराराणी यांचा पुतळा पारंपरिक पद्धतीचा केवळ अश्वारूढ असा नसावा, तर तो पूर्ण वेगळा असावा, ही माझी कल्पना. घोडा चारी टापांवर उभा आहे, असं न दाखवता घोड्यानं पुढच्या दोन टापा उचलल्या आहेत, असं आवेशपूर्ण आणि आक्रमक शिल्प साकारावं, अशी कल्पना माझ्या मनीमानसी रुजलेली. अर्थात, असं शिल्प साकारणं हे शिवधनुष्यच होतं.

यापूर्वी कोल्हापुरातील ताराराणी विद्यापीठात व्ही. टी. पाटील यांनी ताराराणींचा अश्वारूढ पुतळा उभा केला होता; पण तो चारी पाय टेकलेला होता. माझ्या मनात तसा पुतळा नव्हता, तर अश्वारूढ; पण पाठीमागील दोन पायांवर उभारलेला पुतळा जसा होता, त्याप्रमाणेच पुतळा करावा, असं मी रवींद्र मेस्त्रींना सुचवलं. परंतु, तसा पुतळा उभा करणं फार जोखमीचं काम असल्याचं रवींद्र मेस्त्रींनी सांगितलं.

“तुम्ही जातिवंत कलाकार आहात. हे शिवधनुष्य तुम्ही पेलायचं नाही, तर मग कोणी?” मी रवींद्र मेस्त्रींना म्हणालो.
त्यावर ते म्हणाले, “आजपर्यंत अनेक शिल्पं तयार केली. सिनेमाचे भव्य सेटस् उभे केले. नाटकांचे पडदेही रंगवले; पण दोन पायांवर घोडा उभा करण्याची कल्पना म्हणजे तारेवरची कसरत आहे. तोल गेला तर कपाळमोक्ष ठरलेलाच!”

“पण तोल जाणारच नाही, असा आत्मविश्वास का नाही तुम्ही बाळगत?” मी म्हणालो.

दोन पायांवर उभा असलेला अश्वारूढ पुतळा उभा करणं जोखमीचं काम असल्याचं जरी रवींद्र मेस्त्रींनी सांगितलं, तरी मी आणि माझे मित्र विश्वासराव शेळके यांनी, रवींद्र मेस्त्रींच्याकडून तसा पुतळा तयार करून घ्यायचा चंगच बांधला. मुळात विश्वासराव शेळके हे जरी फौंड्रीचे मालक असले, तरी ते जणू डिग्री न घेतलेले इंजिनिअरच होते. हा वारसा त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळालेला होता.

शिवाय सीनियर इंजिनिअर बेरी, तसेच डिझाईन कोलॅबरेशनचे विजय शिंदे आणि सबनीस हेही आमच्या मदतीला धावून आले होते. या सर्वांशी साकल्यानं चर्चा केल्यानंतर अशा प्रकारचा पुतळा उभा करणं अवघड असलं तरी ते अशक्य नाही, यावर आम्हा सर्वांचं एकमत झालं आणि मग हे अवघड शिवधनुष्य रवींद्र मेस्त्रींनी लीलया पेललं! रवींद्र मेस्त्रीचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. असे ध्येयवेडे कलाकार खूप थोडे असतात.

रवींद्र मेस्त्री, उद्योगपती विश्वासराव शेळके आणि मी; आम्ही तिघे जिवलग मित्र. त्यामुळे पुतळ्याबाबत आमच्या एकत्र चर्चा झडू लागल्या आणि त्यातून आमचा आत्मविश्वास बळावू लागला. रवींद्र मेस्त्री खरी कॉर्नरजवळ राहात असत. मी आणि विश्वासराव त्यांच्या घरी जात असू. तिथे मग पुतळ्याच्या निर्मितीवर चर्चा होत असे. दोन टापांवर उभा राहिलेला पुतळा उभा करताना पुतळ्याच्या एकूण बॅलन्सचा विचार करणं आवश्यक होतं. त्यासाठी मग स्ट्रक्चरल इंजिनिअरचाही सल्ला घेण्यात आला आणि त्यानंतरच रवींद्र मेस्त्रींनी शिल्पकामाची सुरुवात केली.

सूक्ष्म अवलोकन सृजनाचे

या पुतळ्याचं क्ले मॉडेल, वॅक्स मॉडेल आणि वेल्डिंग इत्यादी कामं उद्यमनगरातील विजय कोथळकर यांच्या फॅब्रिको या वर्कशॉपमध्ये करण्यात आली; तर ओतकाम उद्योगपती विश्वासराव शेळके यांच्या ‘कोल्हापूर ऑटो वर्क्स’मध्ये करण्यात आलं. या सर्व कामावर माझं सूक्ष्म अवलोकन आणि निरीक्षण सातत्यानं चालूच होतं. मला तर झोपेतही पुतळ्याच्या सृजनाचं नि सर्जनाचं स्वप्न पडत होतं. मी त्याचा ध्यासच घेतला होता म्हणा ना! मी आणि विश्वासराव, रवींद्र मेस्त्रींच्या घरी जात असू. तिथून त्यांना सोबत घेऊन आम्ही उद्यमनगरात जायचो आणि तिथं पुतळा उभारणीच्या कामाचं अवलोकन करीत असू.

घोड्याच्या पुढच्या दोन टापा उंचावलेल्या स्थितीत पुतळा चबुतर्‍यावर बसवायचा, म्हणजे तोल राखण्याचा मोठा कळीचा मुद्दा होता. एक मिलिमीटरचा जरी फरक झाला, तरी पुतळा कलण्याची भीती होती. मात्र, रवींद्र मेस्त्रींनी अतिशय कौशल्यानं पुतळा उभा केला. घोड्याच्या मागच्या दोन टापांना लोखंडी पट्ट्या जोडून त्या खाली काँक्रिटनं चबुतर्‍यावर त्या खिळवण्यात आल्या आणि बॅलन्स राखण्यात आला!

आवेशपूर्ण अद्वितीय शिल्पाकृती

घोड्याच्या मागील दोन टापांवर उभारलेल्या या पुतळ्याची उंची 18 फूट, तर वजन दोन टन एवढं आहे. जगात पुतळे अनेक प्रकारचे असतात. पण युद्धाच्या पवित्र्यात घोड्याच्या मागच्या दोन पायांवर उभा राहून शत्रूवर झेप घेणारा हा पुतळा अनन्यसाधारण आहे, यात शंकाच नाही! राजधानी दिल्ली ही कोल्हापूरच्या उत्तरेकडे आहे, हे लक्षात घेऊन महाराणी ताराराणींचा हा भव्य पुतळा उत्तराभिमुखच उभा करण्यात आलेला आहे. त्यांच्या हातातील उंचावलेल्या समशेरीतून ताराराणींचा रणआवेशच प्रकट होतो. जणू शाहिरांनी शब्दांतून प्रकट केलेला त्यांचा आवेशच रवींद्र मेस्त्रींनी मूर्त स्वरूपात सृजित केला होता.

‘तो देह बहु सुकुमार
घोड्यावर होई स्वार
लटकते कटी तलवार
चमकते जणू चपला गगनी ॥’

इथं मात्र विद्युल्लतेसारखी तळपती तलवार ताराराणींच्या कमरेला नसून ती त्यांच्या हातात आहे. शाहिराच्या काव्यापेक्षा रवींद्र मेस्त्री एक पाऊल पुढे गेल्याची प्रचिती हा पुतळा पाहताना आल्याशिवाय राहात नाही. रणरागिणी महाराणी ताराराणींचा असा आवेशयुक्त पुतळा अन्यत्र कुठे असण्याची शक्यता नाहीच! रवींद्र मेस्त्रींनी एक अप्रतिम शिल्पाकृती साकारली, यात शंकाच नाही. या शिल्पाकृतीनं केवळ इतिहासाचा मागोवाच घेतला नाही, तर एक नवा इतिहासच घडवला; असं म्हटलं तर ते अतिशयोक्तीचं होणार नाही!

‘असि धिंग रामराणी,
नाचतसे वैभवानी
मूर्तिमंत ही भवानी,
जगी अवतरली ॥’

हे तत्कालीन कवी गोविंदांचं काव्यच मूर्तिमंत होऊन आपल्यासमोर उभं आहे, असं या पुतळ्याकडे बघून वाटतं!

आणि तो ऐतिहासिक क्षण

पुतळा तयार झाला. हा भव्य पुतळा पाहात असताना माझ्या मनात गदिमांच्या ओळी तरळू लागल्या.
ते म्हणतात –

सम्राज्ञी ना, समरकुशला लोकनेत्रि प्रतापी
सत्तांधांना नमवुनि रणीं आपुले राज्य स्थापी
नारी नोहे अमर जगतिं ज्योत ही पौरुषाची
ताराराणी जननि अमुच्या अस्मितेची, यशाची !

आता अनावरणाची लगबग सुरू झाली. तत्कालीन राज्यपाल आणि हवाई दलाचे माजी प्रमुख एअर चीफ मार्शल (निवृत्त) ओ. पी. मेहरा यांना उद्घाटक म्हणून निमंत्रित करण्यात आलं. रणरागिणीच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी मेहरा यांच्यासारख्या रणवीराची निवड औचित्यपूर्णच असल्याची प्रतिक्रिया जनमानसातून उमटली. ‘करायचं ते दणक्यात’ हा माझा स्वभावधर्मच असल्यामुळे मला छोटी कल्पना आणि लहान विचार कधी सुचतच नाही.

कोल्हापूरच्या पूर्व प्रवेशद्वारी उभारण्यात आलेल्या या भव्य पुतळ्याचं अनावरण 17 फेब्रुवारी 1981 रोजी सायंकाळी मेहरा यांच्या हस्ते व छत्रपती विजयमाला राणीसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली आणि पालकमंत्री बाबासाहेब भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालं. हजारोंच्या संख्येनं उपस्थित असलेल्या कोल्हापूरच्या जनता जनार्दनानं, मागच्या दोन पायांवर उभ्या असलेल्या घोड्यावर हाती समशेर घेऊन मांड ठोकलेल्या ताराराणींचं अद्वितीय शिल्प पाहून टाळ्यांचा कडकडाट केला. कुठल्याही अत्युत्तम कलाकृतीला मनापासून दाद द्यावी, तर ती कोल्हापूरकरांनीच!

लोकांच्या टाळ्यांच्या कडकडाटापाठोपाठच करवीरच्या त्या स्वराज्य संस्थापिकेला तोफांची सलामी देऊन, तिला जणू मानाचा मुजराच करण्यात आला. मात्र, या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी छ. शहाजी महाराज आणि शाहू महाराज काही अपरिहार्य कारणामुळे उपस्थित राहू शकले नाहीत.

“टीचभर जमिनीसाठी नव्हे, तर राष्ट्रीयत्वाच्या जाज्वल्य भावनेनं महाराणी ताराराणींनी बलाढ्य आणि जुलमी औरंगजेबाविरुद्ध प्रखर लढा दिला. ताराराणींचा हा ज्वलंत राष्ट्राभिमान डोळ्यापुढे ठेवूनच प्रत्येक भारतीयाने आचरण केले पाहिजे…”

असे ओजस्वी उद्गार यावेळी राज्यपाल ओ. पी. मेहरा यांनी काढले. ते पुढे म्हणाले, “छत्रपती शिवरायांनी परकीय मोगली सत्तेविरुद्ध हयातभर लढा दिला. तोच लढा ताराराणींनी पुढे चालवला. महाराणी ताराराणी यांनी आपल्या उदंड कर्तृत्वानं भारतीय स्वराज्याच्या इतिहासात आपला सुवर्ण ठसा उमटवला आहे…” अशा शब्दांत त्यांनी ताराराणींचा गौरव केला.

माझं नातं जवळचं

“ताराराणी आऊसाहेब तळवंडीच्या मोहिते घराण्यातील आणि मीही त्याच घराण्यातील! माहेर आणि सासर या दोन्हीकडून माझं नातं जवळचं आहे. त्यामुळे हा घरचाच कार्यक्रम. त्याला उपस्थित राहणं माझं कर्तव्यच मी समजते. त्यामुळे माझे आभार मानण्याचं कारण नाही. खरं तर आपण मला अध्यक्षपद देऊन माझा बहुमानच केला आहे”, असे भावोत्कट उद्गार छत्रपती विजयमाला राणीसाहेब यांनी काढले.

मी माझ्या भाषणाची सुरुवात करतानाच म्हणालो, “स्वराज्यरक्षिका ताराराणी या आद्य स्त्री क्रांतिकारक आहेत, असं म्हटलं तरी ते वावगं होणार नाही. त्यांनी मोगलांशी दिलेला लढा, हा मराठ्यांचा स्वातंत्र्य लढाच होता. त्यामुळे त्यांचाच आदर्श घेऊन भारतीय स्वातंत्र्य युद्धात ब्रिटिशांविरुद्ध झाशीची राणी लक्ष्मीबाई, राणी कित्तूर चन्नमा आणि चाँदबीबीसारख्या राजस्त्रियांनी स्वातंत्र्याच्या होमकुंडात उडी घेतली. त्यांची प्रेरणा ही महाराणी ताराराणी याच होत्या, याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे!”

माझ्या या उद्गारानंतर टाळ्यांचा कडकडाट झाला. पुतळा उभारणीच्या कार्याचा आढावा घेत असतानाच हे काम कोणकोणत्या स्थित्यंतरातून गेलं, हेही मी नमूद केलं तसेच मी म्हणालो, “स्वराज्यरक्षिका महाराणी ताराराणी यांच्यासाठी पडेल तो त्याग करणं हे प्रत्येक करवीरवासीयांचं आद्य कर्तव्य आहे. आपण सारे इथं कर्तव्यभावनेनंच जमला आहात. त्यामुळे आभाराची औपचारिकता पाळावी, असं नाही.”

यावेळी ‘सत्यवादी’कार बाळासाहेब पाटील यांनीही मनोगत व्यक्त केलं. त्यांनी बाळासाहेब जाधव यांच्या परिश्रमामुळे आणि जिद्दीमुळे हा पुतळा उभा राहिला, असे कौतुकोद्गार काढले. तसेच या क्षणाचं औचित्य साधून शिल्पकार रवींद्र मेस्त्रींचा यथोचित सत्कारही करण्यात आला. या पुतळा उभारणीचं खरं श्रेय त्यांनाच जात होतं. त्यांच्या सृजनशीलतेला तर तोडच नाही. त्यांचा सत्कार हा केवळ एक उपचार होता. त्यांचा सत्कार म्हणजे आरशातल्या आपल्याच प्रतिबिंबाचा सत्कार करण्यासारखं होतं. ते तर आमचेच होते!

ज्या रणरागिणीनं करवीर राज्याची स्थापना केली, बलाढ्य मोगलांनाही नमवलं, त्या महाराणी ताराराणींचं उचित स्मारक उभं राहिलं! सारे करवीरवासीय या स्मारकानं धन्य धन्य झाले! आपल्या महाराणीचा तो भव्य-दिव्य पुतळा डोळे भरून पाहताना सर्वांच्या तोंडी एकच कवन विलसत होतं,

‘माऊली मराठ्यांची ही
चैतन्य, स्फूर्ति, शक्ती ही
संदेश सैनिका देई
स्वातंत्र्यदेवता जणू अवतरली
छत्रपती श्री तारा ॥’

मात्र ताराराणींच्या पुतळ्याचं अनावरण होत असतानाच आणि प्रामुख्यानं विजयमाला राणीसाहेबांचं भाषण ऐकत असतानाच आणखी एक महत्त्वाच्या उणिवेची जाणीव माझ्या मनाला चाटून गेली आणि ती उणीवही लवकरात लवकर दूर करायचीच, असा मी माझ्या मनाशीच संकल्प सोडून टाकला, तो संकल्प होता –

शाहूपुत्राचेही उचित स्मारक

कोल्हापुरात युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचे दोन पुतळे उभारण्यात आले आहेत. शिवाय दसरा चौकात राजर्षी शाहू महाराजांचा भव्य पुतळा डौलानं उभा आहे. हिंदवी स्वराज्यरक्षिका महाराणी ताराराणींचा अश्वारूढ पुतळा तर माझ्याच पुढाकारानं उभारण्यात आला होता.

राजर्षी शाहू महाराज यांचे सुपुत्र छ. राजाराम महाराज यांनी आपल्या पित्याचा सामाजिक, शैक्षणिक सुधारणांचा वारसा पुढे चालवला होता. त्याचबरोबर आधुनिक कोल्हापूरची पायाभरणी केली होती. अशा या कर्तबगार राजाचा पुतळा मात्र अद्याप उभारला गेला नव्हता. ताराराणींच्या पुतळ्यानंतर राजाराम महाराजांचा पुतळा उभारण्याच्या कामात मी सक्रिय सहभाग घेतला. राजाराम महाराज प्रतिष्ठानतर्फे या पुतळ्याची उभारणी करण्याचं निश्चित करण्यात आलं. या कार्याला गती यावी, म्हणून मी पहिल्यापासूनच त्यामध्ये पुढाकार घेतला.

राजाराम महाराजांची कारकीर्द केवळ 18 वर्षांची. परंतु, एवढ्या अल्पकाळातही त्यांनी डोंगराएवढं काम करून ठेवलं आहे. त्यांनी सामाजिक सुधारणांना उत्तेजन दिलं. बालविवाह प्रतिबंधक कायदा हा तर त्यांच्या दूरद़ृष्टीचाच निर्णय. बेळगाव जिल्ह्यातील 400 अस्पृश्यांनी केवळ बळजबरीतून मुस्लिम धर्म स्वीकारला होता. राजाराम महाराजांनी त्यांना पुनरपि हिंदू धर्मात घेऊन त्यांना सन्मान दिला. अशा प्रकारे अनेक धर्मांतरितांना त्यांनी हिंदू धर्मात परत आणलं.

ते कृषिशास्त्राचे जाणते होते. त्यामुळे संस्थानातील शेती आणि सहकाराला त्यांनी उत्तेजन दिलं. तसेच शुगर मिल आणि आशियातील सर्वात मोठा शेतकरी सहकारी संघ आदींची स्थापना त्यांच्याच राजवटीत झाली. 1931 मध्येच त्यांनी कोल्हापुरात हायकोर्ट आणि अपील कोर्ट स्थापन केलं. आपल्या पित्याप्रमाणेच त्यांनी कुस्ती आणि इतर कला-क्रीडांना राजाश्रय दिला.

त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी लक्ष्मीपुरी, राजारामपुरी, ताराबाई पार्क अशा नव्या आदर्शवत वसाहती उभारल्या आणि कोल्हापूर अधिक व्यापक नि समृद्ध केलं. त्याचबरोबर त्यांनी शाहूपुरीचाही विस्तार केला. इतकेच नव्हे तर त्यांनी 1925 मध्येच कोल्हापूर नगरपालिका लोकनियुक्त केली. पाठोपाठ इलाखा पंचायतीची स्थापना करून त्यांनी एका अर्थानं लोकशाहीचं बीजारोपणच केलं. 1940 मध्येच कोल्हापुरात विमानतळ उभारून त्यांनी कोल्हापूरला जगाच्या संपर्कात आणलं. त्यांच्या कर्तबगारीमुळे कृषी, उद्योग, व्यापार, सहकार, शिक्षण अशा विविध क्षेत्रांमध्ये कोल्हापूरची सर्वांगीण प्रगती झाली.

आमच्या आबांचे राजाराम महाराजांशी निकटचे संबंध होते. राजाराम महाराजांचे समाजोद्धारक कार्य त्यांनी जवळून पाहिलं होतं आणि वेळोवेळी ‘पुढारी’तून त्यांच्या कार्याचं कौतुकही केलं होतं. विमानतळासारख्या धाडसी आणि अत्याधुनिक उपक्रमाचं त्यांनी ‘पुढारी’तून स्वागत केलं होतं. त्यामुळे राजाराम महाराजांचा पुतळा उभारण्याच्या कामात मी सक्रिय सहभाग घेतोय म्हटल्यावर त्यांनाही समाधान वाटल्यावाचून राहिलं नाही.

पुतळा उभारणीसाठी होणार्‍या बैठकांना मी आवर्जून उपस्थित राहात असे. ताराराणींचा पुतळा उभारण्याचा अनुभव माझ्या गाठीशी होताच. त्यामुळे चर्चेमध्ये मी उपयुक्त सूचना करीत असे. पुतळ्याचं काम कोणाला द्यायचं, याविषयी चर्चा होऊन सर्वानुमते बिंदू चौकातील डोंगरसाने बंधू यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली. पुतळ्याची जागा व्हीनस कॉर्नर ही निश्चित करण्यात आली. महापालिकेनं पुतळ्याचा चौथरा आणि भोवतीचा कठडा यांचं बांधकाम करून दिलं.

पुतळा तयार झाला आणि…

25 सप्टेंबर, 1983 रोजी पुतळ्याच्या अनावरणाचा सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. उद्घाटक होते तत्कालीन उपमुख्यमंत्री बॅ. रामराव आदिक.

“राजाराम महाराजांनी राजर्षी शाहूंचं कार्य समर्थपणानं पुढे चालवलं,” असे गौरवोद्गार बॅ. आदिक यांनी काढले.

राज्यमंत्री अभयसिंहराजे भोसले, विजयसिंह मोहिते-पाटील, रत्नाप्पाण्णा कुंभार, कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्यासह अनेक मान्यवरांची या शानदार समारंभाला उपस्थिती होती. मात्र, या समारंभाला शाहू महाराज उपस्थित नव्हते!

उपसंहार

युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा त्रिशत् शिवराज्याभिषेक सोहळा व राजर्षी शाहू महाराज यांची जन्मशताब्दी असे दोन भव्य कार्यक्रम, तसेच महाराणी ताराराणी आणि शाहूपुत्र राजाराम महाराज यांची शिल्पाकृती स्मारकं उभी करण्याचे कार्य नियतीनं माझ्या हातून घडवून आणलं, त्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. आजही मी जेव्हा जेव्हा बाहेरगावाहून येताना ताराराणी चौकात प्रवेश करतो, तेव्हा तेव्हा ताराराणींच्या त्या अश्वारूढ पुतळ्याकडे माझी द़ृष्टी जाते आणि माझ्याही नकळत कवी गोविंदांची काव्यावली माझ्या ओठांवर रुंजी घालू लागते,

‘मानहानी दिल्लींद्राची,
सभा हासते इंद्राची
आजिकाल कवींद्राची,
सर्व चिंता हारली॥’

Back to top button