कोपेनहेगन : डेन्मार्कमध्ये पुरातत्त्व संशोधकांनी उत्खनन करून सोन्याचा खजिना बाहेर काढला आहे. जेलिंगजवळील विन्डेलिव्ह येथे ओले जिनेरप शित्झ यांनी या खजिन्याचा मेटल डिटेक्टरच्या सहाय्याने छडा लावला होता. त्यानंतर वेजले संग्रहालयातील पुरातत्त्व संशोधकांनी तिथे उत्खनन केल्यावर वायकिंग युगाच्या आधीच्या काळातील 22 मौल्यवान कलाकृतींचा शोध लावला.
शित्झ हे आपल्या एका वर्गमित्राच्या जमिनीला स्कॅन करण्यासाठी मेटल डिटेक्टर घेऊन सहज फिरत बाहेर पडले होते. त्यावेळी डेन्मार्कच्या इतिहासातील सर्वात मोठा खजिना आपल्याला गवसणार आहे याची त्यांनाही कल्पना नव्हती.
तेथील जमीन चिखलाने भरली होती. तिथेच त्यांना आधी एखाद्या कॅनच्या झाकणासारखे काही तरी सापडले. त्यावेळी त्यांना लक्षात आले की हे झाकण नसून जमिनीखाली दबलेल्या सोन्याच्या तुकड्यांपैकी एक आहे.
याठिकाणी उत्खनन केल्यावर दोन पौंडापेक्षा अधिक सोन्याच्या वीसपेक्षाही अधिक कलाकृती सापडल्या. पंधराशे वर्षांपूर्वी याठिकाणी एक गाव होते. त्यावेळेचा हा खजिना असावा असे मानले जाते. हा डेन्मार्कमध्ये सापडलेला आतापर्यंतचा सर्वात मोठा सोन्याचा खजिना ठरला आहे.