रेकॉर्डब्रेक पाऊस : दिल्लीत रस्ते, सखलभागांसह आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाणी | पुढारी

रेकॉर्डब्रेक पाऊस : दिल्लीत रस्ते, सखलभागांसह आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाणी

पुढारी वृत्तसेवा; नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीत रेकॉर्डब्रेक पाऊस झ्राला.  रेकॉर्डब्रेक पाऊस झाल्‍याने रस्ते आणि सखलभागच नव्हे तर आंतरराष्ट्रीय विमानतळही पाण्याखाली गेला आहे. सप्टेंबर महिन्यातला पावसाचा गेल्या ४६ वर्षातला विक्रम यंदा मोडला गेला आहे. प्रचंड पावसामुळे दिल्ली महानगरातले जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले असून ,आणखी काही दिवस पावसाचा जोर राहील, असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.

चक्क आंतरराष्ट्रीय विमानतळ पाण्याखाली

शुक्रवारच्या रात्रीपासून सूरू झालेला पाऊस शनिवार दिवसभर सुरु होता. दिल्लीतले सर्व प्रमुख रस्ते, सखलभाग, अंडरपास आणि चक्क आंतरराष्ट्रीय विमानतळ  पाण्याखाली गेला. साचलेले पाणी आणि बिघडलेली सिग्नल यंत्रणा यामुळे कित्येक ठिकाणी वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागल्या होत्या. जखीरा येथील अंडरपासमध्ये १० फूटपेक्षा जास्त पाणी साचल्याने काही काळ वाहतूक बंद करावी लागली होती. पावसासोबत काही भागात विजांचा कडकडाटही सुरू होता. हवामान खात्याने दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्रासाठी यलो अलर्ट जारी केलेला आहे. जोरदार पावसामुळे तापमानदेखील ३ ते ४ अंशांनी खाली आले आहे. केवळ दिल्लीच त्याला लागून असलेल्या नोएडा, ग्रेटर नोएडा, गाझियाबाद, फरिदाबाद, गुरुग्राम या शहरांना पावसाने झोडपून काढले आहे.

काही रस्ते बंद

इंदिरा गांधी अंतरराष्ट्रीय विमानतळात (टर्मिनल 3) पाणी साचल्याने हवाई वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला. विमानतळ प्राधिकरणाने याबद्दल खेद व्यक्त केला असून पाणी उपसण्याचे काम दिवसभर सुरु होते. साचलेल्या पावसात कित्येक विमानाची चाके बुडाली होती. दिल्लीतील रिंग रोड तसेच गुरुग्रामला जाणाऱ्या रस्त्यावर कित्येक किलोमीटर लांब रांगा लागल्याचे दिसून आले. रात्री उशिरापर्यंत ही स्थिती कायम होती. वाहतूक पोलिसांनी काही रस्ते बंद केले होते, तर काही ठिकाणी मार्ग बदलले होते. आझाद मार्केट अंडरपासही पाण्याखाली गेला होता. हा मार्ग वाहतूक पोलिसांनी बंद केला होता.

४६ वर्षातला पावसाचा विक्रम मोडला

सफदरजंग हवामान केंद्रात ११००मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. याआधी २००३ साली येथे १०५० मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. एकूण मॉन्सूनमधील पावसाचा विचार केला तर गेल्या ४६ वर्षातला पावसाचा विक्रम मोडला गेला आहे. आरके पूरम, मोतीबाग, प्रगती मैदान, आयटीओ भागात गुडघ्यापर्यंत पाणी साचल्याने नागरिकांचे चांगलेच हाल झाले. राजधानीच्या पॉश भागातही ठिकठिकाणी पाणी साचले होते. विमानतळाकडे जाणारे रस्ते बंद असल्याने अनेकांची विमाने चुकली. एम्स ते नोएडा रस्त्यावरील वाहतूकही प्रभावित झाली होती.

हेही वाचलं का? 

 

Back to top button