Soyabean : सोयाबीन शेतीतून पैसा मिळवायचा आहे मग हे कराच… | पुढारी

Soyabean : सोयाबीन शेतीतून पैसा मिळवायचा आहे मग हे कराच...

अनिल विद्याधर

आपल्याकडे दिवसेंदिवस सोयाबीनचे (Soyabean) महत्त्व वाढत आहे. महाराष्ट्रात या पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड होते. या पिकाचे महत्त्व लक्षात घेऊन त्याच्या लागवडीचे नियोजन केल्यास आगामी खरीप हंगाम चांगला जाईल.

गेल्या काही वर्षांमध्ये सोयाबीन या तेलबिया पिकाचे क्षेत्र महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. विदर्भ, मराठवाड्याच्या पाठोपाठ पश्चिम महाराष्ट्रातही सोयाबीनचे क्षेत्र वाढत आहे.

या बहुगुणी पिकाचे महत्त्व लक्षात घेऊन नियोजन केले, तर चांगले अर्थार्जन हमखास होऊ शकते.

सोयाबीनचे बियाणे अतिशय नाजूक असते. सोयाबीनच्या (Soyabean)  दाण्याचे बाहेरचे आवरण अतिशय पातळ असते. बियाण्यातील बीजांकूर आणि मुळांकूर बाह्य आवरणाच्या लगत असतात.

त्यामुळे त्याला थोडाही धक्का लागला, तरी बियाण्यांच्या उगवणीवर परिणाम होतो.

तक्रारींवरून निष्कर्ष

सोयाबीनची गोणी जराही आपटली आणि त्यातील बियाणे म्हणून वापरले तर पीक उगवून येईल, याची खात्री नाही. 2011 च्या खरिपात विशेषतः मराठवाडा आणि विदर्भातून उगवणीसंदर्भात फार तक्रारी आल्या.

या तक्रारीच्या अनुषंगाने अभ्यास करण्यासाठी इंदुरच्या सोयाबीन संशोधन संचालनालयाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. व्ही. एस. भाटिया यांच्या अध्यक्षतेखाली नऊ जणांची समिती शासनाने गठीत केली होती.

समितीच्या अहवालात नोंदविण्यात आलेल्या निष्कर्षांमध्ये प्रामुख्याने म्हटले आहे की, बियाण्याचा जोम पिकाच्या काढणीनंतर कमी होत जातो.

याचे कारण म्हणजे काढणीच्या वेळी पीक कापून ढीग रचला जातो. त्याची मळणी उशिरा केली जाते.

वातावरणातील आर्द्रता आणि काढणीच्या वेळचा पाऊस बियाणाची गुणवत्ता कमी करतो. दर्जेदार बियाणे मिळविण्यासाठी खालील उपाययोजना त्यांनी सुचविल्या आहेत.

या उपाययोजना उपयोगी ठरतात

बियाण्याचा प्लॉट परिपक्व होण्याच्या वेळेस बुरशीनाशकाची फवारणी करावी. बियाणे प्लॉटची काढणी वेळेवर करावी. वेळेवर मळणी करून पीक काढल्यानंतर एक किंवा दोन दिवस बियाणे उन्हात वाळवावे ज्यामुळे त्याची आर्द्रता 13-14 टक्के खाली येईल.

13 टक्के आर्द्रता असेल, तर मळणी यंत्राच्या ड्रमचा वेग 300 ते 400 अरपीएम आणि 14 टक्के आर्द्रता असेल, तर 400 ते 500 आरपीएम ठेवावा.

बियाण्याची आर्द्रता 12 टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास साठवणुकीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे प्रक्रिया केंद्रावर सोयाबीन वाळविण्याची आणि 12 टक्के पेक्षा कमी आर्द्रता आणण्याची सुविधा असणे आवश्यक आहे.

सोयाबीन कमी तापमान आणि कमी सापेक्ष आर्द्रतेत साठविले पाहिजे. त्यासाठी साठवणुकीच्या जागेचे छत इन्सुलेटेड (मजबूत), खिडक्या, एक्झॉस्ट पंखे आदी सुविधा असल्या पाहिजेत.

बियाणे साठवणूक करताना

साठवणूक करताना बियाण्यातील ओलाव्याचे प्रमाण 12 टक्क्यांपेक्षा अधिक नसावे.

त्यासाठी बियाणे उन्हात वाळवून तागाच्या पोत्यात भरावे व पोते रचताना त्यावर अधिक भार पडणार नाही, याची काळजी घ्यावी. साठवणुकीची जागा स्वच्छ व कोरडी असावी.

किटकांचा किंवा उंदरांचा उपद्रव होऊ नये, यासाठी विशेष काळजी घ्यावी.

बियाणे तयार होऊन पेरणीसाठी शेतावर पोहोचेपर्यंत चार-सहा महिने जातात.

त्यासाठी बियाणे विक्रीपूर्वी पुन्हा एकदा उगवण शक्तीची चाचणी केली पाहिजे.

बियाणे खरेदी करताना पावती घेतली पाहिजे. पावतीवर उत्पादक कंपनीचे पूर्ण नाव, वाणाचे नाव, लॉट क्रमांक आदी तपशील असले पाहिजेत.

बियाण्याची पिशवी, त्यावरील लेबल, माहितीपत्रक, पावती पीक काढणीपर्यंत जपून ठेवावे.

उगवण क्षमतेची खात्री करा

बियाणे शक्यतो प्रमाणित असले पाहिजे. बियाण्याची शेतावरील उगवण क्षमता कमीत कमी 70 टक्के असली पाहिजे.

नोव्हेंबर ते जानेवारी या बियाणे खरेदीच्या वेळी 72 ते 78 टक्के उगवण क्षमता असेल, तर जून जुलैपर्यंत हाताळणी व साठवणुकीमुळे ती 70 टक्क्यांपर्यंत कमी होते.

त्यामुळे शेतकर्‍यांनी पाच-सहा दिवस ठेवून उगवण क्षमतेची खात्री करावी.

एक वाण पेरण्याऐवजी बहुविध वाणाची निवड करावी.

खरिपात जूनच्या पहिल्या पंधरवड्यात वाफसा आल्यावर 75 ते 100 मिलिमीटर पाऊस झाल्यानंतर तीन ते पाच सेंटिमीटर खोलीवर पेरणी केली पाहिजे.

दोन ओळीतील अंतर भारी जमिनीसाठी 45 सेंटिमीटर आणि मध्यम जमिनीसाठी 30 सें.मी. असावे. दोन रोपांमधील अंतर 10 सें.मी. असावे.

जास्त खोल पेरणी केल्यास उगवण क्षमता कमी होते. जमिनीत पुरेशी ओल नसली, तरी उगवणीवर परिणाम होतो.

बुरशीवर संरक्षण असे करावे

70-75 टक्के उगवणशक्तीचे हेक्टरी 75 किलो बियाणे वापरले पाहिजे. स्वतःजवळचे बियाणे वापरण्यापूर्वी उगवणक्षमता तपासून घ्यावी.

पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाण्यास 3 ग्रॅम थायरम किंवा 1 ग्रॅम कार्बेन्डेझीम याप्रमाणे बुरशीजन्य रोगांपासून संरक्षणासाठी बीजप्रक्रिया करावी आणि ट्रायकोडर्मा 4 ग्रॅम प्रतिकिलो या प्रमाणात लावावे.

रायझोबीयम जपोनिकम आणि पी.एस.बी. प्रत्येकी 200 ते 250 ग्रॅम प्रति 10-15 किलो या प्रमाणात पेरणीपूर्वी 3 तास आधी लावून सावलीत वाळवावे.

बीज प्रक्रिया करताना बियाणे घासू नये, तसेच बुरशीनाशकाची प्रक्रिया केल्यानंतरच जीवाणू खताची बीज प्रक्रिया करावी.

तेलाचे प्रमाण 20 टक्के, प्रथिनांचे प्रमाण 40 टक्के, मुळांवरील गाठीतील जीवाणू हवेतील नत्र स्थिर करून पिकांची वाढ घडवितात.

सोयाबीनचा पाचोळा जमिनीवर पडल्याने बाष्पीभवन टळते.

शिवाय जमिनीचा पोत सुधारतो, फेरपालट, तसेच आंतरपीक हे सोयाबीन पिकाचे फायदे आहेत. दुबार पीक पद्धतीत सोयाबीनला फार महत्त्व आहे.

Back to top button