Mass Conversion Event : दिल्लीत १० हजार लोकांचे ‘आप’ नेत्याच्या उपस्थितीत सामूहिक धर्मांतर; भाजप आक्रमक | पुढारी

Mass Conversion Event : दिल्लीत १० हजार लोकांचे ‘आप’ नेत्याच्या उपस्थितीत सामूहिक धर्मांतर; भाजप आक्रमक

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : विजयादशमी अर्थात दसऱ्याच्या मुहुर्तावर दिल्लीमध्ये तब्बल दहा हजार लोकांनी हिंदू धर्माचा त्याग करत बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. अलिकडच्या काळात झालेले हे सर्वात मोठे सामूहिक धर्मांतर मानले जात आहे. विशेष म्हणजे हा सोहळा दिल्लीतील केजरीवाल सरकारमधील कॅबीनेट मंत्री राजेंद्र पाल गौतम यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या घटनेमुळे एकच गदारोळ उठला आहे. या प्रकरणी भाजपने टीकेची झोड उठवली असून या प्रकरणी माफी मागण्याची व राजेंद्र गौतम यांना हटवण्याची मागणी केली आहे. हे प्रकरण आता केजरीवाल सरकारचे डोके दुखी ठरणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. दरम्यान या सोहळ्या दरम्यान यावेळी हिंदू देवी-देवतांची पूजा करणार नाही आणि त्यांना देव मानणार नाही, अशी शपथ सुद्धा घेण्यात आली. (Mass Conversion Event)

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी विजयादशमीच्या दिवशी करोलबाग येथील राणी झाशी रोडवर असलेल्या आंबेडकर भवनात राजेंद्र पाल गौतम यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. यामध्ये लोकांनी केवळ बौद्ध धर्माची दीक्षा घेतली नाही, तर हिंदू देव-देवतांची पूजा करणार नाही आणि त्यांना देव मानणार नाही, अशी शपथही घेतली. (Mass Conversion Event)

राजेंद्र गौतम यांच्या उपस्थितीत आयोजित या कार्यक्रमाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मेजर सुरेंद्र पुनिया यांनी ट्विट केले आहे की, अरविंद केजरीवाल यांचे विशेष मंत्री राजेंद्र पाल गौतम दिल्लीत सामूहिक धर्मांतर करत आहेत. वरून सनातन धर्म, भगवान श्रीकृष्ण, खुल्या व्यासपीठावरून श्री रामाची निंदा करत आहेत. (Mass Conversion Event)

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना टॅग करत त्यांनी पुढे लिहिले की, सनातन धर्म संपवण्याचा ठेका त्यांनी कुठून घेतला? त्याचवेळी करोलबागचे नगरसेवक असलेले माजी महापौर योगेंद्र चंडोलिया यांनी हा हिंदू धर्माचा अपमान असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, नागरिक आपल्या स्वेच्छेने कोणताही धर्म स्वीकारू शकतो, परंतु बहुसंख्य हिंदू समाजातील देवतांचा अपमान करण्याचा अधिकार कोणालाही नाही. (Mass Conversion Event)

अधिक वाचा :

Back to top button