बजरंग खरमाटे यांनी कोट्यवधीची बेनामी संपत्ती गोळा केली: किरीट सोमय्या | पुढारी

बजरंग खरमाटे यांनी कोट्यवधीची बेनामी संपत्ती गोळा केली: किरीट सोमय्या

तासगाव; पुढारी वृत्तसेवा:  मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सचिन वाझे यांच्या माध्यमातून, माजी मृहमंत्री अनिल देशमुख यांनी संजिव पलांडे तर परिवहन मंत्री अनिल परब यांनी बजरंग खरमाटे या अधिका-च्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची बेनामी संपत्ती गोळा केली आहे, असा गौप्यस्फोट भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे.

वंजारवाडी (ता. तासगाव) येथील परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या फार्म हाऊसची पाहणी करण्यासाठी आले असताना ते बोलत होते. सोमवारी (दि. ६) रोजी सकाळी साडेदहा वाजता किरीट सोमय्या आणि भाजप नेते मकरंद देशपाडे हे वंजारवाडी येथे पोहोचले.

पाहाणीदरम्यान किरीट सोमय्या म्हणाले की, सांगली जिल्ह्यात चार ठिकाणी परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांची बेनामी मालमत्ता आहे. यात एका ठिकाणी १५० एकर जमीन आहे. तर औद्योगिक वसाहतीमध्ये पाच एकर जागेवरती एक कंपनी आहे. वंजारवाडी गावात अलिशान फार्म हाऊस आहे.

वंजारवाडी येथील फार्म हाऊसची किंमत २० ते २२ कोटी रुपये आहे. एक परिवहन अधिकारी अलिशान फार्म हाऊस कसे बांधू शकतो?. हा फार्म हाऊस खरोखरं खरमाटे यांचाच आहे का? हे पाहण्यासाठी येथे आलो असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.

अनिल परबांचे काऊंटडाऊन सुरु

परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांना ‘ईडी’ने समन्स बजावून चौकशीसाठी बालाविले आहे. यावर किरीट सोमय्या म्हणाले, माझ्या माहितीप्रमाणे ‘ईडी’च्या अधिका-यांकडे खरमाटे यांच्या ७५० कोटी रुपयांच्या बेनामी मालमत्तेची माहिती आहे. त्याचीच चौकशी सुरु झाली आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांचेही काऊंटडाऊन सुरु झालेले आहे.

हेही वाचलं का? 

Back to top button