कोप्पल, पुढारी ऑनलाईन: कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या पित्याच्या समाधीजवळ लाडक्या लेकीने केक कापला आणि वाढदिवस साजरा केला. पित्यावर जेथे अंत्यसंस्कार केले तेथे जाऊन चिमुकलीने आपला वाढदिवस साजरा केला. 'माझे वडील आसपास आहेत, असे वाटते त्यामुळे मी त्यांच्याजवळ जाऊन केक कापला,' असे भावूक उद्गार या चिमुकलीने काढले.
कर्नाटकातील कोप्पल जिल्ह्यातील ही भावपूर्ण घटना आहे. तीन महिन्यांपूर्वी स्पंदना नावाच्या मुलीचे वडील कोरोनामुळे मृत्युमुखी पडले होते.
तिचे वडील या लाडक्या लेकीचा वाढदिवस अत्यंत थाटात साजरा करत. मात्र यावेळी नियतीने तिच्या वडिलांना तिच्यापासून दूर केले होते.
वडिलांवर जेथे अंत्यसंस्कार केले तेथे जाऊन समाधीजवळ लाडक्या लेकीने केक कापला. कुश्तगी तालुक्यात राहणाऱ्या स्पंदनासोबत सुमारे डझनभर कुटुंबीय होते.
वडिलांच्या समाधीसमोर उभे राहून स्पंदना कोनासागर हिने श्रद्धांजली वाहिली. ती म्हणाली, 'मला असे वाटते, की माझे वडील अजूनही आजूबाजूला उभे आहेत.
ते माझ्या वाढदिवसाला मला पाहत आहेत, आशीर्वाद देत आहेत. माझ्या आयुष्यातील ही एक अविस्मरणीय घटना आहे.
मी येथे प्रत्येक विशेष प्रसंगी माझ्या वडिलांचे आशीर्वाद घेण्यासाठी येईन.'
स्पंदनाचे वडील राजकीय कार्यकर्ते होते. याची आठवण सांगताना स्पंदनाची आई रुपा म्हणाल्या, मे महिन्यात माझे पती महेश कोनासागर कोरोनामुळे गेले.
एका राजकीय सभेत सहभागी झाल्यानंतर त्यांना ताप आला होता. नंतर, डॉक्टरांनी ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले.
१३ मे रोजी त्यांचा मृत्यू झाल्यानंतर आमच्या शेतातच त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.
स्पंदना ही आईवडिलांची एकुलती मुलगी. तिच्या वडिलांचे तिच्यावर भरपूर प्रेम होते. तिची आई रुपा सांगतात,'महेश यांचा मृत्यू झाल्याचे सांगितल्यानंतर तिला विश्वास बसला नाही. स्पंदनाला या सर्व घटनेतून सावरायला बराच वेळ लागला. जेव्हा आम्ही तिचा आठवा वाढदिवस घरी साजरा करायचे ठरवले, तेव्हा ती म्हणाली, की तिला तिच्या वडिलांच्या समाधीस्थळी जाऊन वाढदिवस साजरा करायची इच्छा आहे.'