कल्याण : अतिक्रमण विरोधी पथकाने डोके फोडल्याचा चाळकऱ्यांचा आरोप | पुढारी

कल्याण : अतिक्रमण विरोधी पथकाने डोके फोडल्याचा चाळकऱ्यांचा आरोप

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने कल्याण पश्चिमेकडे काळा तलाव परिसरातील धोकादायक चाळीवर तोडकामाची कारवाई सुरू केली आहे.

कारवाई दरम्यान केडीएमसीच्या अतिक्रमण विरोधी पथकाने या चाळीतील एका ज्येष्ठ नागरिकाचे डोके फोडून त्याला रक्तबंबाळ केल्याने समस्त चाळकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

केडीएमसीच्या अधिकाऱ्यांनी इन्कार करत असा कोणताही हल्ला चाळकरी रहिवाश्यावर आमच्या पथकाकडून केला नसल्याचे सांगितले.
कल्याणच्या पश्चीम भागात असलेल्या काळा तलाव परिसरातील बाबाजी चाळ ही धोकादायक झाल्याने ती तोडण्याची कारवाई शुक्रवारी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने सुरु केली.

कारवाईदरम्यान चाळकरी मोठ्या संख्येने जमा झाले. यावेळी सदर चाळीवर कारवाई करण्यास रहिवाश्यांनी जोरदार प्रतिबंध करण्याचा प्रयत्न केला. तर कारवाईस विरोध करणाऱ्या 73 वर्षीय राणा देवराज प्रजापती या चाळकऱ्याचे डोके फोडून त्याला रक्तबंबाळ करण्यात आले. हा हल्ला अतिक्रमण विरोधी पथकाने केल्याचा आरोप जखमी राणा प्रजापती यांच्यासह तेथे जमलेल्या संतप्त रहिवाश्यांनी केला.

दाद मागण्यासाठी महानगरपालिकेच्या मुख्यालयात धाव

या घटनेनंतर संतापलेल्या चाळकऱ्यांनी कारवाईच्या विरोधात दाद मागण्यासाठी महानगरपालिकेच्या मुख्यालयात धाव घेतली. प्रवेशद्वाराजवळ आयुक्तांच्या भेटीची मागणी करत बराच वेळ गोंधळ घातला.

यावेळी जखमी राणा प्रजापती यांनी केडीएमसीच्या पथकाने डोक्यात कुदळ-फावड्याचा फटका मारल्याने मला चक्कर येत असल्याचे सांगत आत्मदहन करण्याचा इशारा दिला.

अतिक्रमण विरोधी पथकाचे प्रमुख तथा प्रभाग क्षेत्र अधिकारी राजेश सावंत यांनी या चाळकऱ्यावरील हल्ल्याचा इन्कार केला. या चाळकऱ्याला आमच्या कोणत्याही कर्मचाऱ्याने जखमी केले नसून त्याने स्वत: डोके फोडून घेतल्याचा खुलासा सावंत यांनी केला.

ठाण्यात महापालिकेच्या अधिकाऱ्यावर फेरीवाल्यांकडून हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच आता केडीएमसीच्या पथकाने कारवाईदरम्यान रहिवाश्यांकडून हल्ला केल्याचा आरोप केला जात आहे.

या घटनेतून आमचे मनोबल खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केडीएमसीच्या अधिकाऱ्यांकडून केला जात आहे.

हे ही वाचलं का?

Back to top button