Independence Day 2022 : घराणेशाहीच्या राजकारणावर पंतप्रधान मोदींचा जोरदार प्रहार, वाचा भाषणातील ठळक मुद्दे | पुढारी

Independence Day 2022 : घराणेशाहीच्या राजकारणावर पंतप्रधान मोदींचा जोरदार प्रहार, वाचा भाषणातील ठळक मुद्दे

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : पुढील 25 वर्षात भारताला विकसित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी देशवासियांना पाच प्रण दिले. स्वातंत्र्यदिनानिमित्त (Independence Day 2022) लाल किल्ल्यावरून भाषण करताना मोदी यांनी घराणेशाहीच्या राजकारणावर जोरदार प्रहार केलाच पण महिलांचा सन्मान करण्याचे आवाहनही नागरिकांना केले. मोदी यांना सलग नवव्यांदा लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकविण्याचा मान मिळाला.

मोदी यांनी आपल्या भाषणात देशाचा वारसा, स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेले योगदान, एकता, अखंडता याचा उल्लेख केला तसेच विविधतेतील एकतेवर गर्व करण्याचे आवाहन केले. देशाचा असा कोणताही कानाकोपरा नसेल की ज्याठिकाणी देशवासियांनी शेकडो वर्षाच्या गुलामीविरुद्ध युद्ध लढले नसेल, असे सांगून मोदी पुढे म्हणाले की, मंगल पांडे, तात्या टोपे, भगत सिंह, सुखदेव, राजगुरु, चंद्रशेखर आझाद, असफाक उल्ला खां, राम प्रसाद बिस्मिल यासारख्या असंख्य क्रांतिवीरांनी ब्रिटिश राजवटीचा पाया हलविला होता. स्वातंत्र्याची लढाई लढणारे आणि स्वातंत्र्य मिळाल्यावर देश घडविणारे डॉ. राजेंद्र प्रसाद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नेताजी सुभाषचंद्र बोस, जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, श्यामाप्रसाद मुखर्जी, लालबहादूर शास्त्री, दीनदयाळ उपाध्याय, जयप्रकाश नारायण, राममनोहर लोहिया, आचार्य विनोबा भावे, वीर सावरकर, नानाजी देशमुख अशा महापुरुषांना नमन करण्याचा आजचा दिवस आहे.
स्वातंत्र्याच्या काही दशकांनंतर जगाचा भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. समस्यांचे समाधान भारतात शोधले जाऊ लागले आहे. जगात झालेला हा बदल देशाच्या 75 वर्षांच्या यात्रेचा परिणाम आहे, असे मोदी यांनी नमूद केले. पुढील 25 वर्षांत देशाला विकसित राष्ट्र बनविण्यासाठी आपणास ‘पंच प्रण’ करावे लागतील, असे सांगून ते पुढे म्हणाले की, विकसित भारत, गुलामीच्या विचारापासून शंभर टक्के स्वातंत्र्य, मिळालेल्या वारशावर गर्व करणे, एकता आणि एकजुटता तसेच नागरिकांचे कर्तव्य हे ते पंच प्रण आहेत. स्वच्छता अभियान, लसीकरण, अडीच कोटी लोकांना मोफत वीज जोडणी, उघडण्यावर शौच करण्यापासून मिळालेली मुक्ती, अपारंपरिक ऊर्जा अशा सर्व मानकांवर देश संकल्पबद्ध होऊन वाटचाल करीत आहे.

राष्ट्रीय शिक्षण धोरण हा गुलामीच्या विचारापासून मुक्त होण्याचा रस्ता आहे. आपल्याला सर्व प्रकारच्या गुलामीपासून मुक्त व्हावे लागेल. आम्हास विदेशी प्रमाणपत्र नको आहेत. आपणास देशाच्या प्रत्येक भाषेवर गर्व असायला हवा. डिजिटल इंडिया आणि स्टार्टअप हे नवविचार व ताकतीचे परिणाम आहेत. जेव्हा आपण जमिनीशी जोडले जाऊ तेव्हाच उंच उडू शकणार आहोत. तेव्हाच जगाला समाधान देऊ शकणार आहोत. यासाठी वारशावर गर्व करणे आवश्यक आहे. एकत्रित कुटुंब असो वा पर्यावरणाची सुरक्षा हा आपला वारसा आहे. विविधतेला आपण सेलिब्रेट केले पाहिजे. लैंगिक समानता, इंडिया फर्स्ट, कामगारांचा सन्मान हा त्याचा भाग आहे, असे मोदी यांनी सांगितले. (Independence Day 2022)

नागरिकांचे कर्तव्य प्रगतीचा मार्ग तयार करते. ही मूलभूत प्राणशक्ती असल्याचे सांगून मोदी म्हणाले की, विजेची बचत, शेतीसाठी मिळणाऱ्या पाण्याचा पूर्ण उपयोग, रसायनमुक्त शेती ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. नागरिकांमध्ये पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांचाही समावेश आहे. येणाऱ्या 25 वर्षात ‘पंच प्रण’ वर आपणास लक्ष केंद्रित करावे लागेल. 2047 साली स्वातंत्र्याला शंभर वर्षे पूर्ण होतील, तोपर्यंत आपणास कर्तव्य कठोर व्हावे लागेल. आपण लोक असे आहोत जे जीवातही शिव पाहतात. जे नरातही नारायण पाहतात. झाडातही देव पाहतात. आपण ‘नारी’ ला नारायणी म्हणतो. हेच आपले सामर्थ्य आहे.

पंतप्रधान मोदी यांनी सकाळी राजघाटवर जाऊन महात्मा गांधी यांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर लाल किल्ल्यावर त्यांचे आगमन झाले. याठिकाणी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह इतरांनी मोदी यांचे स्वागत केले. तिरंगा फडकविल्यानंतर मोदी यांनी देशाला संबोधित केले. तत्पूर्वी 21 तोफांची सलामी देण्यात आली. मोदी यांचे भाषण 83 मिनिटे चालले. गतवर्षी त्यांचे भाषण 88 मिनिटे चालले होते. 2014 साली जेव्हा मोदी पहिल्यांदा पंतप्रधान झाले होते, त्यावेळी त्यांचे भाषण 65 मिनिटे चालले होते. केवळ एकदाच 2017 साली मोदी यांचे भाषण एक तासापेक्षा कमी काळ झाले होते. त्यावेळी ते 56 मिनिटे बोलले होते. स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ला तसेच दिल्लीतील इतर ठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

भ्रष्टाचार, घराणेशाहीच्या राजकारणावर प्रहार…

पंतप्रधान मोदी यांनी भ्रष्टाचार, घराणेशाहीच्या राजकारणावर जोरदार प्रहार केला. भ्रष्टाचार घाणीसारखे आहे, त्याला स्वच्छ करावेच लागेल, असे सांगून मोदी म्हणाले की, ज्या लोकांनी देशाला लुटले आहे, त्यांना लुटीचा माल देशाला परत करावा लागणार आहे. कुटुंबवाद आणि भाई – भतीजावाद संपवावा लागेल, कारण यामुळे भ्रष्टाचाराला चालना मिळत आहे. घराणेशाही, भाई – भतीजावाद याचा मी उल्लेख करतो तेव्हा तो केवळ राजकीय क्षेत्रापुरता मर्यादित नाही. दुर्दैवाने राजकारणातील हा वाईटपणा इतर संस्थांमध्ये देखील घुसला आहे. यामुळे देशाच्या प्रतिभेचे नुकसान होत आहे. भाई – भतीजावाद संपविण्यासाठी युवकांनी मला साथ द्यावी. देशातील असंख्य लोक गरीबीशी झुंज देत आहेत तर दुसरीकडे काही लोक असे आहेत की ज्यांच्याकडे लुटीचा पैसा ठेवायला जागा नाही. जे लोक बँक घोटाळा करून पळून गेले, त्यांची संपत्ती जप्त केली जात आहे.

भ्रष्टाचार देशाला किड्यासारखा पोखरत आहे. भ्रष्टाचाराविरुद्ध राग दिसतो पण चेतना दिसत नाही. ही परिस्थिती बदलली पाहिजे, असे सांगतानाच लालबहादूर शास्त्री यांनी ‘जय जवान, जय किसान’ चा नारा दिला होता. अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यात ‘जय विज्ञान’ जोडला. आता यात ‘जय अनुसंधान’ जोडण्याची वेळ आली आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. मोदी यांनी महिलांचा अपमान थांबविण्याचे आवाहनही देशवासियांना केले. आज आपल्यामध्ये कोणत्या ना कोणत्या कारणाने बोलण्या-चालण्यात, स्वभावात महिलांचा अपमान करण्याची विकृती आली आहे. ही विकृती थांबवली जावी, असे आवाहन मोदी यांनी केले.

ठळक वैशिष्ट्ये…

  • दरवर्षी लाल किल्ल्यावरून भाषण करताना पंतप्रधान रंगीत फेटा घालतात. यावेळी त्यानी राष्ट्रीय ध्वजाच्या आकृतीची पांढरी टोपी घातली होती. पंतप्रधानांच्या तिरंगा फेट्यात सरकारच्या ‘हर घर तिरंगा’ अभियानाची झलक दिसत होती.
  • भारत ही लोकशाहीची जननी अर्थात मदर ऑफ डेमोक्रेसी असल्याचे मोदी यांनी सांगितले.
  • पंतप्रधानांच्या भाषणात कोणतीही योजना, महागाई अथवा दहशतवादाचा उल्लेख नव्हता. मोदी यांनी तिरंगा फडकविल्यानंतर 21 तोफांची सलामी देण्यात आली. विशेष म्हणजे ज्या तोफांद्वारे ही सलामी देण्यात आली, त्या तोफा मेड इन इंडिया होत्या.

 

Back to top button