'फ्रीडम अॅट मिडनाईट' हे 528 पृष्ठांचे पुस्तक भारताच्या आधुनिक महाइतिहासाचे महाकाव्य आहे. ब्रिटन, भारत आणि पाकिस्तानातही बहुचर्चित हे पुस्तक आतापर्यंत 5 कोटी लोकांनी वाचले असून त्याची प्रशंसा केली आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासाबद्दल निरपेक्ष लेखन केल्याचा गौरव म्हणून फ्रेंच पत्रकार आणि लेखक डॉमिनिक लॅपिएर यांना 5 मे 2008 रोेजी तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. लॉर्ड माऊंटबॅटन, देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, संयुक्त राष्ट्रांच्या माजी राजदूत विजयालक्ष्मी पंडित यांच्या मुलाखतीवर आधारित तथ्यांश स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त खास 'पुढारी'च्या वाचकांसाठी…
कोल्हापूर : देविदास लांजेवार
14 ऑगस्ट 1947 रोजी एकसंध भारतातून बलाढ्य ब्रिटिश साम्राज्याचा अस्त झाला अन् 15 ऑगस्ट 1947 रोजी नव्या भारताचा उदय झाला. भारतील उपखंडात दोन देश स्वतंत्र राष्ट्र म्हणून अस्तित्वात आले. मात्र भारत – पाकिस्तान सीमेवर हिंसाचाराचा आगडोंब उसळला होता. रक्ताचे पाट वाहत होते अन् योगायोग म्हणजे 32 वर्षांनंतर ऑगस्टमध्येच आयरिश बंडखोरांनी बोर्डलँडसमधील मल्लाघमोर गावच्या समुद्र किनार्यावर माऊंटबॅटन यांची बोट शक्तिशाली स्फोटात उडवली. यात ते त्यांच्या नातवासह मारले गेले.
भारत – पाकिस्तानची फाळणी करताना हिंदुस्थानचे शेवटचे व्हाईसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन यांनी खूप घाई केली आणि ऑगस्ट 1947 मध्ये भारत – पाकला सत्ता सोपवली, असा आरोप कित्येकांनी आतापर्यंत केलेला आहे. फाळणीनंतर झालेला प्रचंड हिंसाचार आणि रक्तपात माऊंटबॅटन रोखू शकले असते. मात्र त्यांनी हा रक्तपात थांबविण्यासाठी कोणतीच पावले उचलली नाहीत.
फाळणीनंतरच्या हिंसाचारात किती लोकांना जीव गमवावा लागला, याची ठोस आकडेवारी आतापर्यंत कुणीच सांगू शकले नाही. कारण स्वतंत्र भारतात या हिंसाचारातील जीवित आणि वित्तहानीची पाहणी करणारी कोणतीही अधिकृत संस्था अस्तित्वात नव्हती. फाळणीच्या हिंसाचारात 2 लाख 25 हजार लोकांना जीव गमवावा लागला, असे लॉर्ड माऊंटबॅटन यांनी सांगितले होते. हा आकडा ही माऊंटबॅटन यांच्या मेंदूची उपज होती. मात्र काही इतिहासकारांनी या नरसंहारात पाच लाख बळी गेले, असा दावा केल्याचे डॉमिनिक लॅपिएर यांनी पुस्तकात नमूद केले आहे.
फाळणीनंतरच्या रक्तपातास लॉर्ड माऊंटबॅटन यांना काही अंशी जबाबदार धरण्यात आले आहे. त्यामुळे 27 ऑगस्ट 1979 रोजी माऊंटबॅटन मल्लाघमोर बंदरातील सुगो समुद्र किनार्यावर बोटीत त्यांची कन्या पामेला, तिचा पती लॉर्ड जॉन ब्रॉबनी आणि नातवासह सुट्टीचा आनंद घेत असताना ती बोट शक्तिशाली बॉम्बस्फोटात उडविण्यात आली. त्यात माऊंटबॅटन यांच्यासह त्यांच्या नातवाची अखेर झाली.
महान द्वीप मल्लाघमोर येथील समुद्र किनार्यावर हत्येपूर्वी 35 वर्षांपासून माऊंटबॅटन सहकुटुंब सहलीसाठी येत असत. आयर्लंडमधील आपल्या शाही महालात आणि या समुद्रकिनार्यावर ते निश्चिंतपणे सहज वावरत असत. दुसर्या महायुद्धामध्ये ग्रेट ब्रिटनला विजय मिळवून देणारा हा नौसेनेचा सरसेनापती एका साध्या स्फोटात मारला गेला याबद्दल जगभरात आश्चर्य व्यक्त केले गेले होते.
हत्येच्या पूर्वसंध्येला माऊंटबॅटन यांना सतर्क करण्यात आले होते
1979 च्या उन्हाळ्यातील सुट्ट्यांमध्ये माऊंटबॅटन जेव्हा बोर्डलँडस येथे दिसले तेव्हा डॉमिनिक लॅपिएर यांनी 27 ऑगस्ट रोजी सायंकाळी लॉर्ड माऊंटबॅटन यांना दूरध्वनीवरून 'आपल्या जीवास धोका आहे, सतर्क राहा', असे सांगितले होते; असा दावा 'फ्रीडम अॅट मिडनाईट' या पुस्तकात केला आहे. "लुईस सावध राहा, कारण आयर्लंडमधील आयआरए कट्टरपंथी आपणावर हल्ला करू शकतात", असा इशारा दिला होता. तेव्हा 'प्रिय लॅरी, आयरिश लोकांना जेवढा मी ओळखतो तेवढा तू ओळखत नाहीस. तेथे काय घडते याची सर्व माहिती मला असते,' असे उत्तर माऊंटबॅटन दिले होते. मात्र गाफील असलेल्या कधीकाळच्या या कडव्या सेनापतीला 79 व्या वर्षी आयरिश बंडखोरांनी ठार मारले. लुई माऊंटबॅटन यांच्या हत्येची तुलना गांधी हत्येशी करण्यात आली होती. मात्र दोन्ही हत्येत काही साम्य नव्हते.
(समाप्त)
तिरंग्याची निवड गांधीजींची; मात्र अशोक चक्राची निवड काँग्रेसची!
ब्रिटिशांचा युनियन जॅक 15 ऑगस्ट 1947 रोजी खाली उतरला आणि त्या जागी फडकला खादीचा भारतीय तिरंगा! भगवा, पांढरा आणि हिरवा रंगाच्या तीन पट्ट्यांच्या तिरंग्यावर गांधीजींनी मध्यभागी चरखा ठेवला होता. 30 वर्षांपासून इंग्रजांशी लढणार्या, देशाच्या स्वातंत्र्यासाठी तहानलेल्या काँग्रेससाठी तिरंग्याची निवड स्वतः महात्मा गांधींनी केली होती. मात्र तिरंग्यावर चरखा चिन्ह ठेवण्यास काँग्रेसच्या इतर नेत्यांनी विरोध दर्शवला. चरखा हे अंतर्मुखी प्राचीन भारताचे चिन्ह आहे. चरखा हे भूतकाळाचे प्रतीक आहे, असा तर्क काँग्रेस नेत्यांनी दिला. त्याऐवजी अशोक चक्राला सन्मान द्यायला हवा. सम्राट अशोकाचे धर्मचक्र हेच नव्या भारताचे प्रतीक बनावे, अशी मागणी लावून धरली. तीच पूर्णत्वास आली. गांधीजींना या निर्णयाची माहिती मिळाली, तेव्हा ते व्यथित झाले.