India@75 : … तर मी हिंदू-मुस्‍लिम ऐक्‍याची निवड करेन : मौलाना आझाद | पुढारी

India@75 : ... तर मी हिंदू-मुस्‍लिम ऐक्‍याची निवड करेन : मौलाना आझाद

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : “स्‍वराज्‍य आणि हिंदू-मुस्‍लिम एकता या दोन्‍हींपैकी एकाची निवड करायची झाल्‍यास मी हिंदू-मुस्‍लिम ऐक्‍याची निवड करेन. कारण स्‍वराज मिळण्‍यास विलंब झाला तर देशाचं नुकसान होईल; पण हिंदू-मुस्‍लिम ऐक्‍य झाले नाही तर सर्व मानवजातीचे नुकसान होईल,” अशा शब्‍दात थोर स्‍वातंत्र्यसेनानी मौलाना अब्‍दुल कलाम आझाद यांनी १९४० मध्‍ये काँग्रेसच्‍या रामगढ अधिवेशनातील भाषणात हिंदू-मुस्‍लिम ऐक्‍याचे पुरस्‍कार केला होता.

हिंदू-मुस्‍लिम ऐक्‍याचे प्रतीक असणारे नेते

रामगढ येथे झालेले काँग्रेसचे अधिवेशन अनेक अर्थाने ऐतिहासिक ठरले होते. १८ ते २० मार्च १९४० या कालावधीत झालेल्‍या या अधिवेशनात ब्रिटीश सरकारविरोधातील लढा अधिक तीव्र करण्‍याचा निर्धार करण्‍यात आला होता. या अधिवेशनाच्‍या अध्‍यक्षपदी मौलाना आझाद होते. यावेळी जेव्‍हा आझाद रांची येथील रेल्‍वे स्‍टेशनवर पोहचले. तेथे त्‍यांचे अभूतपूर्व उत्‍साहात स्‍वागत करण्‍यात आले हाेते. यावेळी त्‍यांनी आपल्‍या भाषणात हिंदू-मुस्‍लिम ऐक्‍याची हाक दिली होती. यामुळेच स्‍वातंत्र्य चळवळीतील आणि स्वातंत्र्योत्तर काळात हिंदू-मुस्‍लिम ऐक्‍याचे प्रतीक असणारे नेते अशी त्‍यांची ओळख झाली.

निर्भिड लेखनीतून फोडली ब्रिटीश सरकारच्‍या अन्‍यायाविरुद्‍ध वाचा

महात्‍मा गांधी यांचे अनुयानी असणार्‍या आझाद यांनी स्‍वातंत्र्य चळवळीतील योगदान अमूल्‍य होते. कुराणाचा सखोल अभ्‍यास, त्‍याला अभ्‍यासपूर्ण वक्‍कृत्‍वाची जोड यामुळेच राजकीय नेत्‍यांबरोबर एक विचारवंत अशीही त्‍यांची ओळख होती. मौलाना आझाद यांनी अलहिलाल आणि अलबलाग या वृत्तपत्रांमधून ब्रिटन शासनाकडून भारतीयांवर हाेणार्‍या अन्‍यायावर ताशेरे ओढले. भारतीयांमध्‍ये राष्‍ट्रवादाची मशाल पेटविण्‍यात त्‍यांचे भरीव योगदान होते. ते राष्‍ट्रीय उर्दू पत्रकारितेचे संस्‍थापक मानले जातात. लोकजागृती हे त्‍यांनी आपल्‍या पत्रकारितेचे ध्‍येय मानले. त्‍यांनी आपल्‍या सडेतोड आणि निर्भिड लेखनीतून ब्रिटीश सरकारच्‍या अन्‍यायाविरुद्‍ध वाचा फोडली. ब्रिटश सरकारने त्‍यांना बंगाल, पंजाब आणि उत्तर प्रदेश राज्‍यांमध्‍ये वास्‍तव्‍यास प्रतिबंध घातला हाेता.

रांचीत ब्रिटीशांच्‍या नजरकैदेत

5 एप्रिल 1916 रोजी मौलाना आझाद रांची येथे गेले. पुढे चार वर्ष ते ब्रिटीशांच्‍या नजरकैदेत होते. येथील एक पोलीस ठाण्‍यात त्‍यांना दररोज हजेरी लावली लागत असे. याच काळात त्‍यांची वैचारिक बैठक अधिक पक्‍की झाली. या चार वर्षातील अध्‍ययन आणि चिंतनामुळे पुढे १९३२ मधील खिलाफत चळवळीतील एक विचारवंत आणि आंदोलनातील प्रमुख नेते अशी त्‍यांची ओळख झाली.

असहकार आंदोलनास पाठिंबा देणारे देशातील पहिले नेते

नजरकैदेतून सुटका झाल्‍यानंतर १८ जानेवारी १९२० रोजी त्‍यांची प्रथम महात्‍मा गांधी यांच्‍याशी दिल्‍लीत भेट झाली. ही भेट आझाद यांच्‍या जीवनाला कलाटणी देणारी ठरली. विशेष म्‍हणजे महात्‍मा गांधी यांच्‍या असहकार आंदोलनास पाठिंबा जाहीर करणारे आझाद हे देशातील पहिले नेते ठरले होते.

जिनांकडून बाेचरी टीका

सविनय कायदेभंग आणि सत्‍याग्रह या गांधींच्‍या विचारांना मोहम्‍मद अली जिना यांचा विरोध होता. याच विरोधामुळे त्‍यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता. मौलान आझाद हे नेहरु आणि वल्‍लभबाई पटेल यांच्‍या पेक्षाही आधी महात्‍मा गांधीचे अनुयायी झाले होते. त्‍यामुळे जिना नेहमी त्‍यांच्‍यावर बोचरी टीका करत असत. मात्र मौलाना आझाद नेहमीच आपल्‍या विचारांची प्रामाणिक राहिले.

‘या’ शाळेतून सच्‍चे भारतीय निर्माण होवोत

मीरतची खिलाफ कमिटीची बैठक ही मौलाना आझाद यांच्‍या अध्‍यक्षतेखाली झाली होती. या बैठकीत महात्‍मा गांधी यांनी सर्वप्रथम असहकार कार्यक्रमाची घोषणा केली होती. कोलकाता येथील जामा मशिद परिसरातील इस्‍लमिया मदरसाचे उद्‍घाटन हे महात्‍मा गांधी यांच्‍या हस्‍ते झाले होते. या शाळेतून सच्‍चे भारतीय निर्माण होवोत, जे स्वातंत्र्यासाठी आपल्‍या प्राणाची आहुती देत गुलागगिरीचे साखळदंड तोडतील, असे मत या वेळी महात्‍मा गांधी यांनी व्‍यक्‍त केले होते.

हेही वाचा : 

 

 

 

Back to top button