पन्हाळ गडावर चार दरवाजा परिसरातील तटबंदीचे दगड कोसळले : व्हिडिओ व्हायरल | पुढारी

पन्हाळ गडावर चार दरवाजा परिसरातील तटबंदीचे दगड कोसळले : व्हिडिओ व्हायरल

पन्हाळा ; पुढारी वृत्‍तसेवा पन्हाळ गडावर आज (सोमवार) पुन्हा चार दरवाजा परिसरातील तटबंदी ढासळत असल्याचे निदर्शनास आले. मात्र पन्हाळ्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे नव्याने बांधण्यात आलेल्या मुख्य रस्त्याच्या बांधकामाच्या वेळी ठिसूळ झालेली माती व दगड गडावरून वाहत येणाऱ्या पावसाच्या पाण्याबरोबर खाली पडत आहेत. मुख्य रस्त्याला यामुळे कोणताही धोका नाही, अशी माहिती या ठिकाणी प्रत्यक्ष पाहाणी केल्यानंतर पन्हाळा शाहूवाडी विभागाचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता धनंजय भोसले यांनी दिली.

पन्हाळ्याचा मुख्य रस्ता गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे खचला होता. या रस्त्यावर जिओ ग्रेड तंत्रज्ञानाचा वापरून नव्याने रस्ता तयार करण्यात आला. या रस्त्याच्या बाजूला असणारी तटबंदी आज सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास ढासळत असल्याचे व दगड मंगळवार पेठ या गावातील घरांच्या दिशेने जात असल्याचे स्पष्ट दिसत होते. या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्‍यानंतर पन्हाळा ढासळतोय अशी चर्चा सुरू झाली. नुकताच बांधण्यात आलेल्या मुख्य रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या तटाचे दगड, माती पाण्याच्या प्रवाहा बरोबर पडत असल्याने मंगळावर पेठेतील नागरिकांतून भीती व्यक्त होत आहे.

पुरातत्व विभागाला दिली माहिती

तटावरून दगड पडत असल्याने गाव भीतीच्या छायेखाली आहे. त्याची आज सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता, भोसले व तहसीलदार रमेश शेंडगे यांनी पहाणी केली असता, बांधकाम करत असताना लूज राहिलेले दगडमाती वाहून जात असल्याचे व मुख्य रस्त्याला कोणताही धोका नसल्याचे दिसून येते. तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने पूर्ण पाहणी केली जात आहे. पुरातत्व विभागाला या बाबत कळविले आहे असेही उपअभियंता भोसले यांनी माहिती देताना सांगितले.

पुरातत्व विभागाने तटबंदी ढासळत असल्याचे माहित असून देखील कोणतीही दखल घेतली नाही गेले तीन वर्षं पन्हाळ्यात पुरातत्व विभागाने तटबंदीची स्वच्छता केलेली नाही. पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष असल्यानेच पन्हाळा ढासळत असल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे.

हेही वाचा : 

Back to top button