Bihar Politics : बिहारमध्‍ये सत्तातंराच्‍या हालचाली? जेडीयूसह आरजेडीनेही बोलवली आमदारांची बैठक | पुढारी

Bihar Politics : बिहारमध्‍ये सत्तातंराच्‍या हालचाली? जेडीयूसह आरजेडीनेही बोलवली आमदारांची बैठक

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : बिहारमधील सत्तातंराच्‍या हालचालीला वेग आला आहे. जनता दल संयुक्‍तचे ( जेडीयू ) माजी राष्‍ट्रीय अध्‍यक्ष आरसीपी सिंह यांनी दिलेल्‍या राजीनामानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. ( Bihar Politics ) सूत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, मुख्‍यमंत्री नितीश कुमार यांनी काँग्रेस अध्‍यक्षा सोनिया गांधी यांच्‍याशी फोनवरुन राज्‍यातील राजकीय परिस्‍थितीवर चर्चा केली. आज जेडीयूने आपल्‍या आमदार व खासदारांची बैठक बोलवली आहे. दरम्‍यान, राष्‍ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) तेजस्‍वी यादव यांनीही आपल्‍या आमदारांच्‍या बैठकीचे नियोजन केले आहे. राज्‍यात प्रचंड वेगाने होणार्‍या राजकीय घडामोडींमुळे गुरुवार ११ ऑगस्‍टपर्यंत राज्‍यात सत्तातंर होईल, अशी शक्‍यता राजकीय वर्तुळात व्‍यक्‍त होत आहे.

Bihar Politics : बिहारमध्ये राजकीय संघर्ष पेटण्याची चिन्हे

भ्रष्टाचाराचा आरोप आणि त्यानंतर माजी केंद्रीय मंत्री आरसीपी सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर बिहारमध्ये राजकीय संघर्ष पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री नीतिशकुमार यांनी जेडीयूच्या सर्व खासदारांची आज बैठक बोलावली आहे. बैठकीचा विषय जाहीर झालेला नसला तरी त्यात भाजपसोबतच्या युतीच्या भवितव्यावर चर्चा होऊ शकते.

याच दरम्यान बिहारचे शिक्षण मंत्री विजय चौधरी यांनी आपल्या पक्षाचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश केला जाणार नसल्याचे सांगितले आहे. नीतिशकुमार यांनी यापूर्वीच याबाबत घोषणा केली होती. आरसीपी सिंह यांच्यावर बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचा गंभीर आरोप खुद्द त्यांच्या पक्षाकडूनच करण्यात आला होता. याप्रकरणी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. यानंतर सिंह यांनी शनिवारी संध्याकाळी त्यांनी पक्षातील आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला. गेल्या काही महिन्यांपासून नीतिशकुमार आणि सिंह यांच्यात वाद सुरू होता. त्याची परिणती सिंह यांनी राजीनामा देण्यात झाली आहे. जेडीयूने सिंह यांचे राज्यसभेचे तिकीट कापल्यामुळे त्यांना मंत्रिपद सोडावे लागले होते.

नीतीशकुमार यांचा सोनिया गांधींशी संपर्क

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बिहारचे मुख्यमंत्री नीतिशकुमार यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी संपर्क साधला आहे. त्यामुळे नजीकच्या काळात बिहारच्या राजकारणात भूकंप झाल्यास आश्चर्य वाटू नये, असे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे. कदाचित भाजपसोबत असलेली युती तोडून नीतिशकुमार हे आगामी काळात काँग्रेसबरोबर जाऊ शकतात, अशीही शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सोमवारी जेडीयूच्या सर्व खासदारांची बैठक यासंदर्भात निर्णायक ठरू शकते.

हेही वाचा : 

Back to top button