P M Modi : नागरिकांनी आपल्या घरावर १३ ते १५ ऑगस्टला तिरंगा लावावा : पंतप्रधानांचे आवाहन | पुढारी

P M Modi : नागरिकांनी आपल्या घरावर १३ ते १५ ऑगस्टला तिरंगा लावावा : पंतप्रधानांचे आवाहन

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधत नागरिकांनी १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत आपापल्या घरावर तिरंगा लावावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात‘ कार्यक्रमात बोलताना केले. तिरंगा आपणा सर्वांना जोडण्याचे काम करतो आणि देशासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा देतो, असे सांगतानाच २ ते १५ ऑगस्ट या काळात नागरिक आपल्या सोशल मीडिया प्रोफाईलवर तिरंगा लावू शकतात, असेही मोदी (P M Modi) यांनी या वेळी स्पष्ट केले.

पंतप्रधान मोदी (P M Modi) यांनी मन की बात कार्यक्रमात विविध विषयांवर मत व्यक्त केले. त्यात आयुष मंत्रालयाची उपलब्धी, स्टार्टअप्स्, औषधांवरील संशोधन आदी विषयांचा समावेश होता. खेळण्यांच्या उत्पादनात देश प्रगती करीत असून, मागील काही वर्षांत खेळण्यांच्या निर्यातीत वाढ झाली आहे, असे सांगून ते पुढे म्हणाले की, स्वातंत्र्याच्या लढाईत रेल्वेने दिलेले योगदान कधीही विसरता येणार नाही. जुलै महिन्यात ‘स्वातंत्र्याची रेल्वेगाडी आणि रेल्वे स्टेशन‘ ही मोहीम सुरु करण्यात आली होती. देशातील अनेक रेल्वे स्थानके अशी आहेत, की जी इतिहासाशी जोडली गेलेली आहेत.

झारखंडमधील गोमो नावाचे रेल्वे स्थानक नेताजी सुभाषचंद्र बोस जंक्शन या नावाने ओळखले जाते. कारण कालका मेलमध्ये बसून याच ठिकाणाहून सुभाषचंद्र बोस ब्रिटिशांना चकमा देऊन फरारी होण्यात यशस्वी ठरले होते. काकोरी रेल्वे स्थानकाचे नाव रामप्रसाद बिस्मिल आणि अशफाकुल्लाह खान यांच्याशी जोडले गेलेले आहे. देशातील 24 राज्यांतील अशा इतिहासाशी जोडल्या गेलेल्या 75 स्थानकांना सजविण्यात आलेले आहे. नागरिकांनी संबंधित रेल्वे स्थानकांवर निश्चितपणे गेले पाहिजे. शाळांनी मुलांना या स्थानकांवर नेऊन त्यांना इतिहासाची माहिती दिली पाहिजे.

आगामी 75 वर्षे ही देशातील प्रत्येक नागरिकासाठी अमृतकाळासारखी आहेत, असे सांगत मोदी म्हणाले की, कोरोनाविरोधातील लढाई अद्यापही सुरु असून, या लढाईत पारंपरिक उपचार पध्दतीने मोठे योगदान दिलेले आहे. चालू महिन्याच्या सुरुवातीला मेघालयात एका कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली होती. यात स्थानिक संस्कृतीला दर्शविण्यात आले होते. तेथील क्रांतीकारी लोकांनी संस्कृतीवर आक्रमण करणाऱ्यांना कसे हुसकावून लावले, याचे नाट्यही सदर कार्यक्रमात दाखविण्यात आले होते. अशाच प्रकारे कर्नाटकात अमृता भारती कन्नाडार्थी नावाचे अभियान चालविण्यात आले होते. मोदी यांनी यावेळी शहीद उधमसिंग यांच्यासह इतर शहिदांना आदरांजली अर्पण केली. क्रांतीवीरांनी आणि स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्यावर मोठी जबाबदारी सोपविलेली आहे. या कर्तव्यापथावर प्रत्येकाने चालणे आवश्यक आहे, असेही मोदी यांनी नमूद केले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button