बंगळूर; पुढारी वृत्तसेवा : कर्नाटकामध्ये भाजप विरुद्ध भाजप असे चित्र निर्माण झाले आहे. सरकारविरुद्ध कार्यकर्त्यांच्या नाराजीचा स्फोट झाला आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी गेल्या काही दिवसांत झालेल्या हत्यांबाबत आक्रोश व्यक्त करुन गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र यांच्या निवासाला घेराव घातला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी लाठीमार करुन कार्यकर्त्यांना पांगवले.
येथील जयमहलनजीक अरग ज्ञानेंद्र यांचा बंगला आहे. त्या ठिकाणी शनिवारी सकाळी अभाविप कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलनाला सुरुवात केली. गेल्या काही दिवसांमध्ये हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या. पण, सरकारने याविरुद्ध कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही. मारेकरी अजूनही मोकाट आहेत. युवा नेत्यांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकार घेणार का, असा प्रश्न कार्यक़र्त्यांनी उपस्थित केला. परिस्थितीवर नियंत्रणासाठी पोलिसांनी कार्यकर्त्यांवर लाठीमार केला. त्यानंतर शेकडो कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
एसडीपीआयसारख्या संघटनांवर बंदीची मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. याबाबत चौकशीची सूचना पोलिसांना दिली आहे. लवकरच त्यांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला जाईल.
– अरग ज्ञानेंद्र, गृहमंत्री, कर्नाटक