बेळगाव ; पुढारी वृत्तसेवा : मराठी कागदपत्रांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात यावी, या मागणीसाठी 8 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी 11 ते सायंकाळी 5 पर्यंत ठिय्या आंदोलन करून प्रशासनाला जाग आणण्यात येणार आहे. त्यासाठी रविवारपासून (दि. 31) गावोगावी जागृती करण्याचा निर्धार तालुका म. ए. समिती बैठकीत घेण्यात आला.
तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची शनिवारी (दि. 30) तुकाराम सांस्कृतिक भवनात कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
किणेकर म्हणाले, जून महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून देखील मराठीतून कागदपत्रे देण्याची मागणी करण्यात आली होती. तसेच वेळेत कागदपत्रे न मिळाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. तरीही कागदपत्रे देण्याबाबत कोणत्याही प्रकारच्या हालचाली करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे प्रशासनाला मराठी भाषिकांची ताकद पुन्हा एकदा दाखवून देण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यानुसार मध्यवर्ती समिती बैठकीत 9 ऑगस्ट क्रांतिदिनी धरणे आंदोलन निश्चित करण्यात आले होते. पण, त्या दिवशी मोहरमनिमित्त सरकारी सुट्टी असल्याने 8 ऑगस्ट रोजी ठिय्या आंदोलन छेडले जाणार आहे. या आंदोलनामध्ये तालुक्याच्या विविध भागातून मराठी भाषिकांनी अधिक संख्येने सहभागी व्हावे, यासाठी कार्यकर्त्यांनी आपाल्या भागात जनजागृती करावी.
अॅड. राजाभाऊ पाटील म्हणाले, महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्यासाठी कायदा मोडण्याचे आंदोलन झाले. पण, आमचे आंदोलन कायद्याची अंमलबजावणी करा, अशी मागणी करणारे आहे. त्यामुळे सरकारी अधिकार्यांनी याची जाण ठेऊन आमच्या मागण्या मान्य
कराव्यात.
यावेळी माजी महापौर शिवाजी सुंठकर, युवा आघाडीचे अध्यक्ष संतोष मंडलिक, जिल्हा पंचायत माजी सदस्या सरस्वती पाटील, मनोज पावशे, अॅड. सुधीर चव्हाण, प्रकाश अष्टेकर, लक्ष्मण होनगेकर, आर. एम. चौगुले, पुंडलिक पावशे, मनोहर संताजी, विलास घाडी आदींनी मराठी भाषिकांवर होणार्या अन्यायाविरोधात यापुढे आक्रमक भूमिका घ्यावी लागेल, असे मत व्यक्त केले.
बैठकीला म्हात्रू झंगरुचे, एस. एल. चौगुले, आर. आय. पाटील, एपीएमसी माजी सदस्य आर. के. पाटील, कृष्णा हुंदरे, दत्ता उघाडे, महेश जुवेकर, अंकुश पाटील, अनिल हेगडे, रावजी पाटील, पिराजी मुचंडीकर, माणिक होनगेकर, निंगाप्पा जाधव, नानू पाटील आदी उपस्थित होते.
येळ्ळूर येथे आज बैठक
मराठी भाषिकांना मराठी भाषेमध्ये परिपत्रके मिळावीत तसेच सरकारी कार्यालयात मराठी भाषेला प्राधान्य मिळावे. यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने सोमवारी ठिय्या आंदोलनाच्या जागृतीसाठी रविवारी (दि. 31) सायंकाळी सात वाजता येळ्ळूर विभाग म. ए. समितीने चांगळेश्वरी मंदिर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी समितीच्या कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष शांताराम कुगजी, सचिव प्रकाश अष्टेकर यांनी केले आहे.