Indian Rupee | डॉलरच्या तुलनेत रुपया गडगडला! पहिल्यांदाच ८० पार | पुढारी

Indian Rupee | डॉलरच्या तुलनेत रुपया गडगडला! पहिल्यांदाच ८० पार

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाने (Indian Rupee) निच्चांकी पातळी गाठली आहे. आज रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ८० वर पोहोचला. रुपयाची ही आतापर्यंतची निच्चांकी घसरण आहे. मंगळवारी सुरुवातीच्या व्यवहारात भारतीय रुपया घसरुन अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ८०.०५ वर गेला. सोमवारी रुपया ७९.९७ वर स्थिरावला होता आणि आज मंगळवारी मागील बंदच्या तुलनेत रुपया १५ पैशांनी घसरला.

या वर्षाच्या सुरुवातीपासून रुपयाची घसरण सुरु आहे. आतापर्यंत रुपयाची ७ टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. ३० जून पर्यंत प्रति डॉलर रुपया ७८.९४ वर होता. त्यानंतर रुपयाची घसरण पुढील काही सत्रांमध्ये वाढून तो आता डॉलरच्या तुलनेत ८० पार झाला आहे.

याआधीच्या आकडेवारीशी तुलना केली तर डिसेंबर २०१४ पासून रुपयाचे मूल्य २६.२७ टक्क्यांनी घसरले आहे. ३१ डिसेंबर २०१४ रोजी डॉलरच्या तुलनेत रुपया ६३.३३ वर होता. तो आज ८०.०६ पर्यंत घसरला.

रुपया घसरल्याने (Indian Rupee) अमेरिकन डॉलर फायद्यात आला आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासून डॉलर जवळपास ८ टक्क्यांनी वधारला आहे. डॉलर मजबूत होणे भारतीय रुपयासाठी निश्चितच अनुकूल नाही. वर्षाच्या सुरुवातीपासूनच रुपयाची घसरण सुरू असून तो आतापर्यंत ७.६ टक्क्यांनी घसरला आहे.

रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील अर्थव्यवस्थेवर संकट आले. कोरोनाच्या संकटातून अर्थव्यवस्था सावरत असताना त्यात युद्धाची भर पडली. यामुळे महागाईने उच्चांक गाठला. आर्थिक वृद्धीबाबत निर्माण झालेली चिंता, आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढलेल्या कच्च्या तेलाच्या किंमती आणि महागाईचा उच्चांक अशा परिस्थितीत बहुतांश देशांच्या अर्थव्यवस्था अमेरिकन डॉलरच्या तुलनेत आपल्या चलनाची घसरण रोखण्यासाठी अपयशी ठरत असल्याचे अर्थज्ज्ञांचे म्हणणे आहे.

दरम्यान, रुपया सोबतच आज भारतीय शेअर बाजारात घसरण पहायला मिळत आहे. सकाळच्या सत्रात सेन्सेक्स १८७ अंकांनी घसरून ५४ हजारांवर व्यवहार करत आहे. तर निफ्टीही ५१ अंकांनी खाली येऊन व्यवहार करत आहे.

Back to top button