गुंतवणूक : नको कमी मुदतीचे गृहकर्ज! | पुढारी

गुंतवणूक : नको कमी मुदतीचे गृहकर्ज!

स्वप्नातील घर सत्यात येण्यासाठी मोठा पैसा जमवावा लागतो. त्यासाठी मोठी तयारी करावी लागते. घर बांधायचे स्वप्न असो वा इतर आर्थिक मोठ्या गरजा पूर्ण करायच्या असोत. आपल्या आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यांवर त्या गरजांचे आर्थिक नियोजन करणे गरजेचे आहे. आर्थिक नियोजन केले तरच स्वप्ने सहजपणे साकार होतात.

भावी काळासाठी केलेली पूर्वतयारी आर्थिक अडचण कमी करून कुटुंबात आर्थिक समृद्धी आणते. नियोजनाअभावी गरिबी अन् सतत पैशाची कमतरता यामुळे कुटुंबात कलह होतात. स्वप्नातील घर बांधायचे असेल, तर मोठी रक्कम हवी. पूर्वतयारी म्हणून बचत करून मोठी रक्कम निर्माण करा किंवा गृहकर्ज घेऊन घर बांधा. बचतीतून मोठी रक्कम उभी करणे लवकर शक्य नसते. त्यासाठी भरपूर वेळ लागतो. मग पर्याय राहतो, तो गृहकर्ज घेण्याचा.

गृहकर्ज घेताना कर्जाची रक्कम लवकर संपावी हा उद्देश ठेवून कर्जाची मुदत कमी घेणे. गृहकर्ज संपल्यानंतर गुंतवणूक सुरू करता येईल, या विचाराने जात असाल, तर तो तुमच्या जीवनात चुकीचा निर्णय ठरतो. कारण गृहकर्ज मोठे कर्ज असते. मोठ्या कर्जाचे हप्ते वर्षानुवर्षे भरावे लागतात. कर्जावरील व्याजाची रक्कम कमी प्रमाणात भरायला लागावी म्हणून कर्जाची मुदत कमी घेतात. त्याचा परिणाम म्हणजे कर्जाचा हप्ता मोठा बसतो.

दरमहा येणार्‍या उत्पन्नातून होणारा खर्च आणि कर्जाचा मोठा हप्ता या कारणाने भविष्यात येणार्‍या मोठ्या खर्चासाठी गुंतवणूक करता येत नाही व आपल्या भावी आयुष्यातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी, लग्नासाठी किंवा आपल्या निवृत्ती नियोजनासाठी आपल्याकडून काहीच बचत होत नाही किंवा उशिरा गुंतवणूक केल्याने आयुष्यातील आर्थिक गणिते बिघडून जातात.म्हणून होम लोन घेण्यापूर्वी आपण आर्थिक सल्लागारासोबत बसून आर्थिक उद्दिष्टाचा आराखडा मांडला पाहिजे.

पैशातील वेळेचे मूल्य हा नियम काय सांगतो? छोटा पैसा अन् मोठा वेळ दिला की मोठा पैसा निर्माण होतो. गृहकर्जाची रक्कम मोठी असते. आणि सदर कर्जाचा व्याजदर खूपच कमी असतो. त्याची परतफेड करण्यासाठी दीर्घकालीन मुदत घेतली, तर कर्जाचा हप्ता कमी बसतो. कर्जाचे हप्ते अन् व्याजावर आयकर सवलतही मिळते. हा दीर्घकाळासाठी फायदा होऊ शकतो. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे महागाईनुसार तुमच्या पैशाची किंमत कमी होत असते. आपले उत्पन्न वाढत असते.

त्यामुळे भविष्यात दीर्घकाळासाठी कर्जाचा हप्ता देणे नेहमी फायदेशीर ठरते. व्याज जास्त भरावे लागते; परंतु कर्जाचा हप्ता कमी झालेने आपल्याकडे गुंतवणुकीसाठी पैसे शिल्लक राहतात. आणि ही रक्कम इक्विटीमध्ये दीर्घकाळासाठी गुंतवणूक केली, तर परतावा चांगला मिळून मोठी रक्कम उभी राहू शकते. सर्वात महत्त्वाचे चक्रवाढ व्याजाची शक्ती सांगते. मोठा पैसा उभा करण्यासाठी छोटा पैसा द्या अन् मोठा वेळ द्यावे. म्हणजेच पैशातील वेळेचे मूल्य आणि चक्रवाढ व्याजाची ताकद हे दोन्ही नियम काम करतात. किती मोठा फायदा होतो, हे खालील उदाहरणांवरून लक्षात येईल.

आर्थिक आराखडा न करता, भविष्यातील आर्थिक गरजांचा विचार न करता आपल्या सुबुद्धीने होम लोन घेऊन व लवकर संपवून टाकू, या विचाराने निर्णय घेतल्यामुळे अमित पाटील (काल्पनिक) यांच्या जीवनात काय परिस्थिती निर्माण झाली, याचा आढावा मांडला आहे. समजा, अमित यांचे आजचे वय 65 वर्षे आहे. स्वप्नातील मोठा बंगला बांधला आहे. परंतु आज त्यांना घरात उच्च दर्जाच्या राहणीमानाने जगता येत नाही. वृद्धापकाळात पुरेसा पैसा नाही, आयुष्यातील गणिते चुकलीच याचा पश्चाताप होत आहे.

अमित यांना वयाच्या चाळीसाव्या वर्षी 80 हजार रु. पगार होता. त्यांच्या पत्नी सुनीता यांना 35 व्या वर्षी खासगी नोकरीमध्ये 30 हजार रुपये पगार होता. अमितच्या चाळीसाव्या वर्षी त्यांची दोन मुले अनुक्रमे सीमा 10 वर्षांची आणि नीलेश चार वर्षांचा होता. दर महिन्याला घरामध्ये एकूण उत्पन्न 1,10,000/- चालू होते. घरात भरपूर पैसा येत असल्याने उच्च दर्जाचे राहणीमान ठेवले होते. मोठा बंगला असावा, असे मनोमन वाटत असल्याने 40 व्या वर्षी होमलोन घेऊन मोठा बंगला बांधला. आर्थिक नियोजन न करता धाडसाने निर्णय घेत गेले अन् वृद्धापकाळी रिकामे बसले. म्हणजेच, स्वत:च्या बुद्धीने नियोजन केले; मात्र काय झाले पहा.

अमित यांचे सुंदर घराचे स्वप्न उराशी बाळगून वयाच्या चाळीशीपर्यंत दोघा पती-पत्नीने 20 लाख रक्कम बचतीच्या माध्यमातून उभी केली होती. सदर बचतीतून रिकामा प्लॉट घेतला. त्यामध्ये चांगला बंगला बांधण्यासाठी साठ लाखांचे कर्ज व पाच लाख हातउसने घेऊन बंगला बांधला होता.

प्लॉट 20,00,000/-
होमलोन 60,00,000/-
हातउसने 5,00,000/-
85,00,000/- एकूण घरासाठी आलेला खर्च.

गृहकर्ज हप्ता मोठा असल्याने भावी काळातील गरजासाठी तरतूदच करता आली नाही. एकूण 85 लाख खर्च करून चांगला मोठा बंगला बांधला. वृद्धापकाळात कर्जाचा बोजा नको म्हणून होमलोनची मुदत 10 वर्षे घेतलेने 72,796/- दर महिन्याला हप्ता भरावा लागला. स्वप्नातील बंगल्यासाठी 85 लाख प्रथमदर्शी खर्च आणि गृहकर्ज व्याजाची रक्कम 27 लाख एकूण 112 लाख खर्च झाले. तेथून एक रुपया उत्पन्न मिळाले नाही. घर ही माझी संपत्ती नसून ती जबाबदारी आहे. हे अमित यांच्या लक्षात आले नाही.

अमित यांनी घेतलेले हातउसने पाच लाख, 60 लाख कर्ज, दहा वर्षांत पूर्ण संपवायचे, कर्जातून मुक्त व्हायचे हे ठरविले. मुलांचे शिक्षण वगैरे नंतर पाहायचे, हा उद्देश ठेवून स्वतःचे आर्थिक नियोजन स्वतः करत होते. अमितच्या चाळीशीपासून 50 पर्यंत 60 लाख कर्जासाठी दरमहा 72796/- हप्ता भरला गेला. हा हप्ता घरात येणारा एकूण उत्पन्नापैकी 65% खर्च होता. त्यामुळे हप्ता मोठा असल्याने मुलांच्या शिक्षणासाठी काही शिल्लक ठेवता आले नाही. अमितच्या वयाच्या अठ्ठेचाळीसाव्या वर्षी सीमाचे उच्चशिक्षण चालू झाले. प्रत्येक वर्षी चार लाख खर्च चालू झाला. शिल्लक नसल्याने परत पर्सनल लोन घ्यावे लागले. पन्नाशीनंतर गृहकर्जातून मुक्त झाले; पण पर्सनल लोन फेडण्यात चार वर्षे गेली, मुलीच्या लग्नासाठी परत कर्ज घ्यावे लागले, पुढे चार वर्षांनंतर या कर्जातून मुक्त झाले, त्यानंतर मुलगा नीलेशचे उच्चशिक्षण चालू झाले.

प्रत्येक वर्षी पाच लाख खर्च चालू झाला. उच्च शिक्षणासाठी परत कर्ज काढले आणि मुलाच्या लग्नकार्यासाठी एकच मुलगा म्हणून मोठ्याने लग्नकार्य केले. नोकरीतून रिटायरमेंटचे आलेले पैसे वरील मोठ्या कार्यात खर्च झाले. येण्यापेक्षा देणं वाढलं. कर्जाचे हप्ते भरताना तारांबळ उडाली. रिटायरमेंटनंतर पुरेसा पैसा शिल्लक राहिला नाही. आता मिळणारी तुटपुंजी पेन्शन आहे, त्यामध्ये जगत आहेत. मोठा बंगला असून पूर्वीच्या राहणीमानाच्या दर्जानुसार जगता येत नाही, त्याची खंत वाटत आहे. भविष्याचा विचार न केल्याने प्रत्येक गोष्टीसाठी कर्ज काढावे लागत होते.

कर्जाची मुदत वाढवून सोबत गुंतवणूक वाढविली तर काय झाले असते?
अमितने आर्थिक नियोजन केले असते, तर भविष्यातील मुलांच्या शिक्षणाचा खर्च, लग्नाचा खर्च किती येणार? हे लक्षात आले असते. मुलांच्या शिक्षणाच्या गरजेला महत्त्व देऊन; घरासाठी थोडेफार बजेट कमी करून; कर्जाची मुदत 25 वर्षे ठेवली, तर फार चांगले नियोजन झाले असते. ते कसे ते पाहूया.
कर्जाची मुदत वाढविल्याने हप्ता कमी बसतो. गुंतवणुकीसाठी रक्कम शिल्लक राहते. त्या गुंतवणुकीतून मोठी रक्कम तयार होते.

प्लॉट 20,00,000/-
होमलोन 55,00,000/-
मुदत 25 वर्षे
हप्ता 40644/-
दरमहा एसआयपी गुंतवणूक 30,000/-

प्रतिवर्षी वाढलेल्या उत्पन्नातून 5% नी गुंतवणुकीत वाढ केली. 12% व्याजदर गृहीत धरून वयाच्या पन्नासाव्या वर्षी एसआयपी गुंतवणुकीतून जमा रक्कम 80,89,000/- फंड तयार झाला असता, त्यामधून सीमाच्या शिक्षण तरतुदीसाठी 20 लाख – खर्चासाठी काढून घेतली. शिल्लक रक्कम 60,89,000/- राहिली. एसआयपी गुंतवणूक चालू राहिली. पाच वर्षांत परत गुंतवणूक माध्यमातून 1,33,00,000/- फंड तयार झाला. सीमाच्या लग्नासाठी 25 लाख काढून घेतले. शिल्लक 1,08,00,000/- राहिली. पैकी नीलेशच्या शिक्षणासाठी 40 लाख खर्च करून एसआयपी तशीच चालू राहिली. चार वर्षांत 1,26,00,000/- फंड तयार होऊ शकतो. नीलेशच्या लग्नासाठी 25 लाख खर्च करून रिटायरमेंटसाठी 1,01,00,000/- शिल्लक राहिली. त्याशिवाय रिटायरमेंटचा आलेला फंड वेगळा राहिला असता.

रिटायरमेंटसाठी पुरेसा ठरेल असा फंड तयार होतो. होमलोनची मुदत वाढविली की हप्ता कमी बसतो अन् त्याचबरोबर गुंतवणुकीला वाव मिळतो. म्युच्युअल फंड गुंतवणूक चालू ठेवल्याने होमलोन दिलेल्या व्याजापेक्षा 4 ते 5% गुंतवणूक वरचढ मिळतो. त्यामुळे कर्जाला व्याज गेल्याचे दुःख होत नाही.

सातत्याने जोखीमयुक्त इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये एसआयपीद्वारे गुंतवणूक केल्याने आणि मोठा वेळ दिल्याने आपल्या गरजेसाठी मोठा फंड कसा उभा राहू शकतो, ते दर्शविले आहे. पण गुंतवणुकीचे नियोजन करताना बाजारातील जोखीम स्वीकारावी लागते. ते समजून घेऊन चांगल्या सल्लागाराकडून गुंतवणुकीचे नियोजन करणे गरजेचे ठरते. माणसांची स्वप्नं मोठी असतात, तशीच खरी आर्थिक गरजासुद्धा मोठ्या असतात. आपल्या आयुष्याचा आर्थिक ताळमेळ ठेवून पैशांचा योग्य वापर कराल तर आपल्या सगळ्या आर्थिक गरजा पूर्ण होऊ शकतील. त्यासाठी फक्त थोडं आर्थिक सज्ञान होणं गरजेचे आहे. त्याचबरोबर चांगल्या सल्लागाराकडून कुटुंबाचे आर्थिक नियोजन करणे गरजेचे आहे.

अनिल पाटील

Back to top button