विमा हप्ता भरण्यासाठी मिळणार कर्ज! ही आहे योजना?

विमा हप्ता भरण्यासाठी मिळणार कर्ज! ही आहे योजना?

जीवन विमा, आरोग्य विमा, वाहन विमा किंवा प्रवास विमा यासह कोणताही विमा असो, ती योजना कर्जावर मिळत नाही. एवढेच नाही, तर थर्ड पार्टीकडून हप्ता भरला तरी त्यापोटी मिळणारी सवलत ही ग्राहकाला विमा कंपनीकडून दिली जात नाही. कारण विम्याचा हप्ता हा अन्य व्यक्तीच्या क्रेडिट कार्डने, धनादेशाद्वारे भरता येत नाही किंवा मान्य केला जात नाही. विम्याचा हप्ता हा योजनेच्या स्वरूपानुसार निश्चित केलेले असते. प्लॅटिनम, गोल्ड, सिल्वर या प्रकारच्या विविध श्रेणी असतात आणि त्यानुसार हप्ता भरावा लागतो. विमा योजनेचे असंख्य फायदे आहेत आणि त्याचे महत्त्व ओळखून असंख्य नागरिक विमा उतरविण्याबाबतही सजग असतात. विमा व्यवसाय सध्या वेगाने विकसित होत असला, तरीही समाजातील निम्न उत्पन्न गटातील किंवा गरीब गटातील लोकांत विमा घेण्याबाबत उदासीनता दिसते. उत्पन्नाचा स्रोत कमी असल्यानेच अनेकांना विम्याचा हप्ता भरणे शक्य होत नाही.

• सर्वांपर्यंत विमा पोहोचेल

विम्याचा लाभ हा प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचावा यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जातात. विमा नियामक संस्था 'इर्डा'देखील सरकारच्या धोरणानुसार काम करते आणि उपाययोजना आखते. गरीब आणि सामान्य लोकांना विमा हप्त्याचा बोजा सहन करता यावा आणि गरजा भागाव्यात, अशा प्रकारच्या योजना आणण्यासाठी 'इर्डा' संस्था दक्ष असते. या श्रेणीत 'इर्डा'ने एक नवीन योजना आणली असून, यानुसार एखादी व्यक्ती विमा योजना खरेदीची इच्छा बाळगून आहे. परंतु हप्ता भरता येत नसल्याने आपला विचार बदलत असेल, तर अशा मंडळींसाठी ही योजना फायदेशीर आहे. 'इर्डा'ची नवीन योजना अमलात येत असेल, तर मग संबंधित व्यक्ती कितीही गरीब असली तरी त्याच्याकडे किमान एक जीवन विमा पॉलिसी राहील. याबाबत 'इर्डा'कडून होणार्‍या तयारीचे आकलन करू या.

• विमा हप्ता भरण्यासाठी मिळेल कर्ज

'इर्डा' संस्था अशा एका योजनेवर काम करत असून, त्यानुसार एखादा व्यक्ती विमा पॉलिसी खरेदी करण्याचा विचार करत असेल; परंतु त्याकडे हप्ता भरण्यासाठी पैसे नसतील तरीही तो या योजनेंर्तगत विमा पॉलिसी खरेदी करू शकतो. हप्ता भरण्यासाठी लोकांना कर्ज देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या नियोजनावर 'इर्डा' संस्था काम करत आहे. या माध्यामतून हप्ता भरण्याची सुविधा प्रदान करून पॉलिसी सक्रिय ठेवण्यासाठी 'इर्डा' मदत करेल. तसेच पॉलिसी मुदतपूर्वच बंद होण्यापासून वाचविणे आणि गरजूंना विम्याचा लाभ पोहोचवणे, यासाठी ही योजना आणली जात आहे. गरीब घटकांतील लोकांनादेखील विमा योजनेचा लाभ मिळावा, हा यामागचा हेतू आहे. अमेरिका आणि युरोपचा विचार केल्यास तेथे विमा बाजार बर्‍याच अंशी व्यापक आहे. भारतारसारख्या विकसित होणार्‍या अर्थव्यवस्थेत कमी उत्पन्न गटातील लोकांची संख्या अधिक असल्याने विम्याची व्यापकता कमी आहे. त्यामुळेच 'इर्डा'कडून अशा प्रकारचा बदल केला जात आहे.

• विम्याला अन्य कोणताही पर्याय नाही

अनिश्चिततेच्या वातावरणापासून कुटुंबाला, स्वत:ला सुरक्षितता मिळवण्यासाठी आणि भविष्य सुकर ठेवण्यासाठी विमा योजना असणे गरजेचे आहे. एवढेच नाही, तर दुर्दैवी घटनेत वारसदारांना किंवा अवलंबून असणार्‍या सदस्यांना आर्थिक आधार देण्याचे काम विमा योजना करतात. एखादा व्यक्ती अचानक आजारी पडत असेल, तर त्यावेळी विमा योजना मदत करते. आपल्याकडे योग्य जीवन विमा, टर्म इन्श्युरन्स, आरोग्य विमा पॉलिसी असेल तर भविष्यातील तणावातून मुक्त राहू शकतो. विमा योजना मोलाची असूनही काही जण विमा योजना खरेदी करू शकत नाही. कारण त्यांच्याकडे हप्ता भरण्यासाठी पैसे नसतात. विमा नियामक 'इर्डा'च्या प्रयत्नातून आता ही समस्या लवकरच निकाली निघण्याची आशा आहे.

• कर्जाच्या आधारे हप्ता भरण्याचे फायदे

ही व्यवस्था लागू झाल्याने विमा नूतनीकरण न करण्याचे प्रमाण कमी होईल. त्याचबरोबर जी मंडळी विमा योजनेपासून वंचित आहेत, त्यांनादेखील विमा योजना घेता येणार आहे. कारण त्यांना नवीन नियमांनुसार विमा पॉलिसी खरेदी करणे सहज शक्य राहू शकते. तसेच विमा योजना लॅप्स होण्याचे प्रमाण कमी राहील. विमा सुरू राहिल्याने ग्राहकांना योजनेचा लाभ कायम राहू शकतो आणि दावे निकाली काढण्यात अडचणीदेखील येणार नाहीत. कर्जाच्या सुविधेतून कमी वयोगटातील ग्राहकदेखील विमा योजना सक्रिय ठेवू शकतील.

• रिटेल आणि कॉर्पोरेट या दोन्ही प्रकारच्या प्रस्तावकांना हप्त्यासाठी फायनान्सची सुविधा मिळू शकते. दोन्ही प्रकारचे ग्राहक हप्ता भरण्यासाठी कर्ज घेऊ शकतील आणि कालांतराने ते परतफेड करू शकतील. त्यामुळे संबंधितावर एकाचवेळी मोठा हप्ता भरण्याचा बोजा पडणार नाही.

• कशी असेल योजना?

या महत्त्वाकांक्षी योजनेतून लोकांना विम्याचा एकरकमी हप्ता भरण्यासाठी कर्ज मिळेल आणि ते कर्ज कालांतराने मासिक आधारावर
फेडता येणार आहे. या व्यवस्थेतून देशात विमा योजनेचा विस्तार होईल आणि विम्याबाहेर असलेले नागरिक विमा कवचाखाली येतील.

प्रसाद पाटील

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news