अविनाश साबळेने इतिहास घडवला; अॅथलेटिक्समध्ये 3 हजार मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत गाठली अंतिम फेरी | पुढारी

अविनाश साबळेने इतिहास घडवला; अॅथलेटिक्समध्ये 3 हजार मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत गाठली अंतिम फेरी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत महाराष्ट्राचा सुपुत्र अविनाश साबळेने शनिवारी 3 हजार मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत अंतिम फेरीत स्थान पक्के केले आहे. महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील अविनाश 8.18.44 इतक्या वेळेत पहिल्या 3 मध्ये स्थान मिळवले. हिट 3 मध्ये अविनाशने 1 हजार 500 मीटरपर्यंत अव्वल स्थान कायम ठेवले होते. त्यानंतर तो मागे पडला आणि सहाव्या क्रमांकावर गेला. अखेरच्या 200 मीटरमध्ये अविनाशने जोरदार कमबॅक केले आणि तिसरे स्थान मिळवले.

मे महिन्यात अमेरिकेतील सॅन जुआन कॅपिस्ट्रोनो येथे झालेल्या साऊंड रनिंग ट्रॅक मीटमध्ये अविनाश साबळेने इतिहास घडवला होता. अविनाशने 5 हजार मीटर शर्यतीत 30 वर्षे जुना विक्रम मोडीत काढला आणि नवा राष्ट्रीय विक्रम केला. तेव्हा अविनाशने बहादूर प्रसादने 30 वर्षांपूर्वी केलेला विक्रम मागे टाकला. अविनाशने 13.25.65 या वेळेत 5 हजार मीटर हे अंतर पार केले, त्याला 12 वा क्रमांक मिळाला होता. तर जून महिन्यात प्रतिष्ठेच्या डायमंड लीग मीटमध्ये त्याने 3 हजार मीटर स्टीपलचेसमध्ये आठव्यांदा स्वत:चा राष्ट्रीय विक्रम मोडला.

भारतीय लष्करात असलेल्या 27 वर्षीय अविनाशने 8 मिनिटे 12.48 सेकंद इतका वेळ घेतला होता. अविनाशने गेल्या वर्षी झालेल्या टोकिओ ऑलिम्पिक स्पर्धेत 3 हजार मीटर स्टीपलचेस प्रकारात नवा राष्ट्रीय विक्रम गेला होता. तेव्हा अविनाशला अंतिम फेरीत पोहोचण्यात यश मिळाले नव्हते.

मुरली श्रीशंकरची फायनलमध्ये उडी

मुरली श्रीशंकर जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या लांब उडीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. पुरुषांच्या लांब उडी अंतिम फेरीसाठी पात्र ठरणारा मुरली श्रीशंकर पहिला भारतीय ठरला आहे. प्रियांका गोस्वामीने 20 कि.मी. शर्यतीच्या चालण्याच्या अंतिम फेरीत 34 वे स्थान पटकावले, तर संदीपकुमार 40 व्या स्थानावर राहिला. श्रीशंकरने 8 मीटर उडी मारून अंतिम फेरीसाठी पात्र ठरले.

Back to top button