PV Sindhu : पीव्ही सिंधूची ‘सिंगापूर ओपन’वर मोहर! चीनच्या वांग झीवर ऐतिहासिक विजय | पुढारी

PV Sindhu : पीव्ही सिंधूची ‘सिंगापूर ओपन’वर मोहर! चीनच्या वांग झीवर ऐतिहासिक विजय

पुढारी ऑनलाईन डेस्क : सिंगापूर ओपनच्या स्पर्धेतून भारतासाठी चांगली बातमी समोर आली आहे. या स्पर्धेत महिला एकेरीच्या फायनलमध्ये भारताच्या पीव्ही सिंधूने बाजी मारत विजेतेपद पटकावले. फायनलमध्ये तिने चीनच्या चीनच्या वांग झी हिचा २१-९, ११-२१, २१-१५ असा पराभव केला.

भारतीय बॅडमिंटनपटू पीव्‍ही सिंधुने मोठ्या दिमाखात सिंगापूर ओपन सुपर 500 स्‍पर्धेच्‍या फायनलमध्‍ये धडक मारली होती. सेमीफायनलमध्‍ये तिने जपानच्‍या सेईना कावाकामीचा २१-१५, २१-७ असे सलग दोन सेट जिंकत पराभव केला. केवळ ३२ मिनिटांमध्‍ये सलग दोन सेट (२१-१५,२१-७) जिंकत पीव्‍ही सिंधुने आपले फायनलचे तिकिट पक्‍के केले होते.

आज सिंधुने फायनलमध्‍ये आपल्‍या नावाला साजेशी कामगिरी केली. तिने पहिल्‍या सेटमध्‍ये निर्वावाद आघाडी घेतली. २१-९ असा सेट आपल्‍या नावावर केला. पहिला सेट जिंकल्‍यानंतर सिंधुचा आत्‍मविश्‍वास दुणावला हाेता. मात्र वांग झीने कम बॅक करत दुसर्‍या सेटमध्‍ये बाजी मारली. तिने ११-२१ असा सेट आपल्‍या नावावर करत सामन्‍यात बराेबरी साधली. चुरशीच्‍या झालेल्‍या तिसर्‍या सेटमध्‍ये सिंधुने उत्‍कृष्‍ट खेळाचे प्रदर्शन करत आघाडी घेतली. ही निर्णायक आघाडी कायम ठेवत  तिने २१-१५ असा सेट जिंकत सिंगापूर ओपन सुपर 500 स्‍पर्धेच्‍या विजेतेपदाला गवसणी घेतली.

स्विस ओपननंतर दुसरी स्पर्धा जिंकली

पीव्ही सिंधू सातत्याने उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसत आहे. या वर्षी मार्चमध्ये झालेल्या स्विस ओपनवर कब्जा केला होता. तिने स्विस ओपन सुपर ३०० बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत थायलंडच्या बुसानन ओंगबामरुंगफानचा २१-१६, २१-८ असा पराभव केला. आता तिने सिंगापूर ओपनवरही आपले नाव कोरले आहे. हे सिंधूचे यंदाचे तिसरे विजेतेपद आहे. यापूर्वी तिने कोरिया ओपन आणि स्विस ओपनचे जेतेपद पटकावले आहे. मात्र, तिने पहिल्यांदाच सिंगापूर ओपन स्पर्धा जिंकली आहे.

Back to top button