औरंगाबाद की संभाजीनगर, केंद्रीय कायदामंत्री झाले कन्फ्यूज | पुढारी

औरंगाबाद की संभाजीनगर, केंद्रीय कायदामंत्री झाले कन्फ्यूज

औरंगाबाद; पुढारी वृत्तसेवा : भारतीय न्यायव्यवस्थेला जगभरात सर्वोच्च स्थान आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अनेक न्यायनिवाड्याचे दाखले जगभरात दिले जातात, असे गौरवोद्गार केंद्रीय विधी व न्याय विभागाचे मंत्री किरेन रिजिजू यांनी काढले. आपल्या न्यायव्यवस्थेकडील खटल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मी मंत्री झालो तेव्हा ही संख्या 4 कोटीपर्यंत होती, सध्या सुमारे 5 कोटी आहे, ही खूप चिंतेची बाब असल्याचेही रिजिजू यांनी म्हटले आहे. आज (दि.9) राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या पहिल्या दीक्षांत समारंभप्रसंगी ते बोलत होते.

एमजीएमच्या रुख्मिणी सभागृहात दीक्षांत समारंभाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी मंत्री रिजिजू म्हणाले, युकेमध्ये एक न्यायाधीश चार-पाच खटल्यांवर सुनावणी घेतात, आपल्याकडे एका न्यायाधीशाकडे 40-50 खटले आहेत. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत ते काम करतात. समाजातील विविध प्रश्नांबाबत माहिती नसतानाही, आजकाल अनेकजण सोशल मिडियातून न्यायव्यवस्थेबद्दल आपली मते मांडू लागले आहेत, मात्र न्यायाधीशही माणसं आहेत, ते किती दबावाखाली काम करतात, हे सुद्धा लोकांनी समजून घेतले पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडनमधील निवासस्थानाला वकिलांनी भेट द्यावी. शासनाने तिथे संग्रहालय केले असून, वकिलांना प्रेरणा देणारे असे हे स्थान असल्याचे त्यांनी सांगितले.

सगळेचे खटले दाखल करून घेण्याची गरज नसते, बरेच खटले हे न्यायव्यवस्थेचा बहुमूल्य वेळ खाणारे असतात. त्यामुळे असे खटले दाखल करून घेताना खूप काळजीपूर्वक निर्णय घेतला पाहिजे. आगामी पावसाळी अधिवेशनात सेशन बील सादर होणार आहे. या बील मंजुरीनंतर नवीन वकिलांना या क्षेत्रात संधी उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

औरंगाबाद की संभाजीनगर, कायदामंत्री कन्फ्यूज

शहराच्या नामांतरावरून गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेवरही त्यांनी आपल्या भाषणाच्या सुरवातीला टिपणी केली. या विषयावरून मी कन्फ्यूज आहे, औरंगाबाद म्हणावे की संभाजीनगर, असे ते म्हणाले. सरकारचे नोटिफिकेशन निघाल्यानंतर त्यावेळी तसा उल्लेख करू, असेही रिजिजू म्हणाले.

Back to top button