अमरावतीतील दुषित पाणी प्रकरण : मुख्यमंत्री शिंदेंनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या खबरदारीच्या सूचना | पुढारी

अमरावतीतील दुषित पाणी प्रकरण : मुख्यमंत्री शिंदेंनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या खबरदारीच्या सूचना

मुंबई : पुढारी ऑनलाईन डेस्क : अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरातील पाच डोंगरी आणि कोयलारी गावात खुल्या विहिरीतील दूषित पाणी प्यायल्याने ५० जणांची प्रकृती खराब झाली होती. या सगळ्यांना डायरिया झाल्याचे निष्पन्न झाले होते. या नागरिकांपैकी ३ जणांचा मृत्यू झाला. या घटनेची बातमी कळताच दिल्ली दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ अमरावती जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून त्याच्याशी संवाद साधला.

या सर्वांवर तातडीने उपचार करावेत तसेच गरज पडल्यास त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करावे असेही त्यांनी सांगितले. यातील काही जणांची प्रकृती चिंताजनक असली तरीही उर्वरित लोकांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना फोनवरून दिली. यावेळी या सर्वांना योग्य उपचार मिळतील तसेच मृतांचा आकडा वाढू नये यासाठी शक्य ते सारे प्रयत्न करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांना केली.

Back to top button