नगर-औरंगाबाद महामार्गावर चालकाला लुटण्याचा प्रयत्न | पुढारी

नगर-औरंगाबाद महामार्गावर चालकाला लुटण्याचा प्रयत्न

नेवासा : पुढारी वृत्तसेवा : नगर-औरंगाबाद मार्गावर नेवासा फाटा परिसरात पुन्हा एकदा मालवाहतूक चालकाला लुटण्याचा प्रयत्न झाला. याप्रकरणी पोलिसांनी तालुक्यातील नवीन चांदगाव येथील अमोल सिद्धार्थ आळवीकर या आरोपीला अटक केली आहे. दि. 7 जुलैच्या रात्री पुण्याकडे टेम्पो (एम एच 17 ए जी 3296) औरंगाबादहून पुण्याकडे चालला होता.

नेवासा फाटा परिसरात रात्री 10.45 च्या सुमारास विनाक्रमांकाच्या दुचाक्यांवरुन दोघांनी दोन वेळेस आयशर टेम्पोला अडविण्याचा प्रयत्न केला. ओळखीच्या व्यक्ती नसल्याने टेम्पो थांबविला नाही. मात्र, सुरेशनगरजवळ या दोघा तरुणांनी मोटारसायकल टेम्पोला दुचाकी आडवी लावून चालकास धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. पैशाची मागणी केली. चालकाने तातडीने 112 या पोलिस मदत क्रमांकावर फोन केल्याने पोलिसांची मदत आली.

पोलिसांनी मोटारसायकल स्वारांचा पाठलाग केला. काही अंतरावरील मयूर हाँटेलजवळ या चोरट्यांनी गाडी टाकून ऊसात पलायन केले. याच दरम्यान पोलिसांनी अमोल सिद्धार्थ आळवीकर यास पकडले. त्याचा साथीदार पसार झाला. याप्रकरणी नेवासा पोलिसांनी दोघांविरुद्ध जबरी चोरीचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक विजय करे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मनोज मोंढे, पोलिस नाईक भागवत शिंदे तपास करीत आहेत.

Back to top button