शिंदेंना पाठिंबा देणाऱ्या विजय नाहटा, विजय चौगुले यांची शिवसेनेतून हकालपट्टी | पुढारी

शिंदेंना पाठिंबा देणाऱ्या विजय नाहटा, विजय चौगुले यांची शिवसेनेतून हकालपट्टी

नवी मुंबई: पुढारी वृतसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी नवी मुंबई शिवसेना उपनेते विजय नाहटा यांच्यासह माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले आणि ३२ माजी नगरसेवकांनी भेट घेऊन पत्र दिले. यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी विजय नाहटा आणि विजय चौगुले यांची शिवसेनेतून हकालपट्टी केली.

शिवसेनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्या दिवसापासून नवी मुंबईतील ३६ नगरसेवकांसह शिवसेना उपनेते विजय नाहटा, माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात होते. बेलापूर विधानसभा मतदारसंघाचे जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे यांनी बंड करणाऱ्या शिवसेना शिंदे गटाचा निषेध करत वाशीत आंदोलन केले होते. मात्र, ऐरोली मतदारसंघात बंडाविरोधात ना जिल्हा प्रमुख ना विजय चौगुले यांनी कुठलेही आंदोलन केले नाही. आम्ही शिवसेनेत असल्याचे सांगत आपण एकनिष्ठ असल्याचा नारा देत होते.

मात्र, एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागताच उपनेते विजय नाहटा यांनी आपण शिंदे यांच्या संपर्कात सुरूवातीपासून असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर नवी मुंबईत शिवसेनेत फूट पडल्याचे समोर आले. मुख्यमंत्री शिंदे यांची नवी मुंबईतील ३२ नगरसेवकांसह शिवसेना उपनेते विजय नाहटा आणि विजय चौगुले यांनी भेट घेऊन आम्ही शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेत असल्याचे स्पष्ट केले होते. यामुळे आता केवळ ६ नगरसेवक शिवसेनेत राहिले आहेत. या भेटीच्या घडामोडीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी तातडीने उपनेते विजय नाहटा आणि विजय चौगुले यांची शिवसेनेतून हकालपट्टी केली.

हेही वाचलंत का ? 

Back to top button