Abe Shinzo : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावरील हल्ल्याने पंतप्रधान मोदी व्यथित, म्हणाले… | पुढारी

Abe Shinzo : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावरील हल्ल्याने पंतप्रधान मोदी व्यथित, म्हणाले...

पुढारी ऑनलाईन डेस्क : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर नारा शहरात हल्ला झाला. त्यांच्यावर झालेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आहेत. शिंजो आबे यांच्यावरील हल्ल्याने व्यथित होत, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले आहे. पंतप्रधानांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “माझे प्रिय मित्र शिंजो आबे यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे मला खूप दुःख झाले आहे. आमच्या प्रार्थना त्यांच्या, त्यांचे कुटुंब आणि जपानच्या लोकांसोबत आहेत”, असेही ते म्हणाले.

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अत्यंत जवळचे मित्र आहेत. भारत आणि जपान यांच्यातील संबंध वृद्धीगत करण्यात शिंजो आबे यांचा मोलाचा वाटा आहे. २०१७ मध्ये ते भारतात आले होते. त्यावेळी पंतप्रधान मोदींनी अहमदाबाद विमानतळावर त्यांचे स्वागत केले होते. तसेच २०१८ मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जपान दौऱ्यावर गेले होते. तेव्हा शिंजो आबे यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुसाखतीत पंतप्रधान मोदी हे माझे जवळचे आणि अत्यंत विश्वासू मित्र असल्याचे सांगितले होते.

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर नारा शहरात हल्ला करण्यात आला आहे. त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्याचे वृत्त जपानच्या NHK WORLD News ने दिले आहे. जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे हे पश्चिम जपानमधील नारा शहरातील एका प्रचारसभेत संबोधित करत होते. भाषण करत असताना ते अचानक खाली कोसळले. त्यांच्यावर गोळीबार झाला असून त्यांच्या छातीत गोळी लागली आहे. यामुळे ते गंभीर जखमी झाले असून बेशुद्ध अवस्थेत त्यांना रुग्णालयात नेण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून, शिंजो आबे यांची प्रकृती गंभीर आहे.

हेही वाचा:

 

 

Back to top button