शिंदे-शिंदे यांच्यातील क्षणीक भेटीचे लाक्षणीक कवित्व! बुलडाणा जिल्ह्यात तर्कांना फुटले अनेक पंख | पुढारी

शिंदे-शिंदे यांच्यातील क्षणीक भेटीचे लाक्षणीक कवित्व! बुलडाणा जिल्ह्यात तर्कांना फुटले अनेक पंख

बुलडाणा; विजय देशमुख : शिवसेना, वंचित बहूजन आघाडी मार्गे सध्या भाजपावासी असलेले माजी आमदार विजयराज शिंदे यांनी नुकतीच नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. उभ्या -उभ्या झालेल्या या क्षणीक भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जिल्ह्यात सर्वच पक्षात चर्चेतून तर्कांना पंख फुटत आहेत. बुलडाण्याचे माजी आमदार विजयराज शिंदे हे एकनाथ शिंदें यांच्या गटात जातात की काय? असे काहींना वाटू लागले आहे.

अलिकडेच भाजपा व एकनाथ शिंदेंच्या गटाचे सरकार आले आहे. अशावेळी भाजपचे विजयराज शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करणे स्वाभाविक आहे. शिवसेनेचे तीन वेळा आमदार असताना मुख्यमंत्र्यासोबत त्यांनी काम केलेले आहे. अलिकडेच शिंदे गट व भाजपाचं सूत जमल्यामुळे बुलडाण्यात विधानसभेची पुढची समिकरणे बदलणारच!. विद्यमान आमदारालाच उमेदवारी दिली जाईल, ही जाणीव विजयराज शिंदें यांनाही झाली असणार.

बुलडाण्यात सेनेचे संजय गायकवाड व भाजपचे शिंदे या कट्टर विरोधकांत विधानसभेचा मुकाबला होईल असे गृहीत धरले जात होते. पण अलिकडच्या नव्या रचनेने विजयराज शिंदे यांची काळजी वाढवली असणार. एकनाथजींचे कडवे समर्थक आमदार संजय गायकवाड व विजयराज यांचेतील विळाभोपळ्याचे सख्य उघड आहे. सध्या गायकवाड फूल फॉर्ममध्ये आहेत. आता शिंदे यांचं राजकीय भवितव्य काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

सध्याच्या बदलेल्या स्थितीत शिंदें काही वेगळी भूमिका घेतील का?

विजयराज शिंदे सद्या भाजपत आहेत, तेथेच राहिले तर सत्तेतील थोडेबहूत लाभ मिळवू शकतील. पण आमदारकीच्या महत्वांकाक्षेला त्यांना मूरड घालावी लागेल. आधीच्या परिस्थितीत शिवसेनेशी लढण्यासाठी एक बहूजन चेहरा म्हणून भाजपाला त्यांची जेवढी आवश्यकता होती, तेवढी आता राहणार नाही. म्हणजे महत्व काहीसे कमी होईल. राजकारण उपयुक्तता मुल्यावर चालते हा सिद्धांत आहे. भाजपाला कधीतरी कामी येईल असा बारावा गडी म्हणून रहायचे? की आता वेगळी वाट चोखाळायची यावर शिंदेंना चिंतन करावे लागणार आहे.

एकनाथ शिंदे यांच्या गटात जाण्याचा विचार शिवत असेल तर कट्टर विरोधक आ. संजय गायकवाडांची आडकाठी येणार यात शंका नाही. तसेही तिकडे जाणे शिंदेंसाठी सुकर आणि सोईस्कर तर मुळीच दिसत नाही. विजयराज यांना पुढे विधानसभा लढवायची असेल तर शिवसेनेचा रस्ता जवळचा आणि सोईचा राहील. पण शिवसेनेची सध्याची पडझड पाहून तिकडे जाण्याचे मन धजावत नसेल!.

पडत्या काळात डागडुजीला कामी आलेत तर मतदारसंघात राजकीय खुन्नस जिरवण्याबरोबर शिवसेनेच्या माध्यमातून स्वतंत्र बस्तान मांडता येईल. परंतू शिवसेनेच्या अस्तित्वाचा विषय कायदेशीर लढाईच्या ऐरणीवर आलेला दिसत आहे. त्यामुळे विजयराज हे तिकडे जाण्याची घाई करणार नाहीत. त्यांना शिंदे गटाचा किंवा शिवसेनेचाही रस्ता एवढा सोपा नक्कीच नाही. पुढे खड्डा आहे, तर मागे दलदल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

“बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको संसारामधी ऐस आपुला उगाच भटकत फिरू नको” या काव्यपंक्तीला अनुसरून शिंदे यांना तूर्त भाजपतच राहून वाट्याला येईल तेवढं समाधान मानून घ्यावे लागेल. त्याशिवाय दुसरा कुठला मार्ग सध्यातरी दिसत नाही.

हेही वाचलंत का? 

Back to top button