कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेला तडा, पदाधिकाऱ्यांसह ५५ नगरसेवक शिंदे गटात सामील | पुढारी

कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेला तडा, पदाधिकाऱ्यांसह ५५ नगरसेवक शिंदे गटात सामील

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाण्यातील नगरसेवकांनी एकमताने पाठिंबा दिल्यानंतर आता कल्याण-डोंबिवलीतही शिवसेनेला तडा गेला आहे. सेनेच्या नगरसेवकांनी गुरूवारी रात्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत त्यांना आपला पाठिंबा जाहीर केला. पाठिंबा देणाऱ्यांमध्ये ५५ नगरसेवकांसह शिवसेनेच्या काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचाही समावेश असल्याची माहिती हाती आली आहे.

मुंबईतील नंदनवन या शासकीय निवासस्थानी कल्याण-डोंबिवलीकर नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही भेट घेतली. विशेष म्हणजे शिंदे गटात सामील होणाऱ्यांमध्ये इतर पक्षातून काही महिन्यांपूर्वी शिवसेनेत दाखल झालेल्या नगरसेवकांचाही समावेश आहे. ठाणे महानगपालिकेच्या ६७ पैकी ६६ नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समर्थन दिल्याच्या घटनेला काही तासही उलटले असतानाच शिवसेनाचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कल्याण-डोंबिवलीतील अनेक नगरसेवकांनी गुरूवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी या नगरसेवकांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या भूमिकेला पाठिंबा दिल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली.

तसेच काही नगरसेवक बाहेरगावी आहेत, तर काही प्रकृती अस्वास्थ्यामुळे यावेळी उपस्थित राहू शकले नसले तरी अशा सर्व नगरसेवकांनीही आम्ही सर्वजण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याचे सांगितल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

यावेळी उपस्थित नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबोधित केले. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबध्द आहोत. हा विकास रथ प्रगतीपथावर नेण्याचे स्वप्न आपण पूर्ण करणार आहोत, त्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी बोलताना केले.

 हे ही वाचा :

Back to top button