अमरावतीतील उमेश कोल्हे हत्येचा तपास NIAकडे; केंद्रीय गृहमंत्रालयाची माहिती | पुढारी

अमरावतीतील उमेश कोल्हे हत्येचा तपास NIAकडे; केंद्रीय गृहमंत्रालयाची माहिती

अमरावती, पुढारी वृत्तसेवा : औषध व्यवसायिक असलेल्या उमेश प्रल्हाद कोल्हे (वय ५५, रा. घनश्यामनगर, सातुर्णा) यांची अमरावतीत गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणाची केंद्रीय गृहमंत्रालयाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाचा तपास गृहमंत्रालयाने राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) कडे सोपवला आहे. या हत्येमागील कट, काही संघटनांचा सहभाग आहे का आणि याचा आंतरराष्ट्रीय संबंध आहे का याची कसून चौकशी केली जाईल, असे गृहमंत्रालय कार्यालयाने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

दुचाकीने घरी परतताना उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. शहर कोतवाली पोलिस ठाण्याच्या काही अंतरावर श्याम चौकाजवळील न्यू हायस्कूल मेनसमोर ही घटना मंगळवार, २१ जून रोजी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी पाच जणांना अटक केली आहे. स्थानिक न्यायालयाने त्यांची पोलीस कोठडी ५ जुलै पर्यंत वाढवली आहे.

उमेश कोल्हेंची हत्या कोणत्या कारणास्तव करण्यात आली. ही बाब अद्याप समोर आलेली नाही. उमेश कोल्हे यांचे तहसील कार्यालय परिसरात अमित मेडिकल स्टोअर्स नावाने प्रतिष्ठान आहे. ते पशुवैद्यकीय औषधींची विक्री करतात. गेल्या अनेक वर्षांपासून ते औषधी व्यवसायात आहेत. २१ जूनच्या रात्री मंगळवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास उमेश हे आपले मेडिकल स्टोअर्स बंद करून, मुलगा संकेत (२७) व त्यांची सून वैष्णवी यांच्यासोबत घरी जात होते. उमेश हे एका दुचाकीवर, तर दुसऱ्या दुचाकीवर मुलगा संकेत व त्यांची पत्नी वैष्णवी जात होते. दरम्यान, न्यू हायस्कूल मेन समोरील गल्लीतून जात असताना उमेश कोल्हे यांची दुचाकी पुढे होती, तर त्यांच्या पाठोपाठ त्यांचा मुलगा व सुन दुसऱ्या दुचाकीवरून येत होते. परंतु या दरम्यान एका ठिकाणी एक दुचाकी आणि त्या दुचाकीजवळ तीन जण उभे होते. अचानक त्या तिघांनी उमेश कोल्हे यांची दुचाकी अडविली आणि काही कळण्याआधीच तिघांपैकी एकाने उमेश यांच्या गळ्यावर चाकूने वार केला. त्यामुळे उमेश हे रक्तबंबाळ अवस्थेत दुचाकीसह खाली कोसळले. उमेश कोल्हे हे खाली पडल्याचे पाहून, त्यांच्याच मागे दुचाकीवर असणारा मुलगा व सून यांनी दुचाकी थांबवून आरडाओरड सुरु केली. त्यामुळे मारेकरी दुचाकीने तेथून पळून गेले. त्यानंतर संकेत व वैष्णवी यांनी परिसरातील नागरिकांच्या मदतीने उमेश यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारादरम्यान काही वेळातच उमेश यांची प्राणज्योत मालवली.

गळ्यावर गंभीर वार

उमेश कोल्हेवर हल्ला करणारे मारेकरी हे तोंडाला दुप्पटा बांधून होते. त्यांनी अचानक उमेश कोल्हे यांच्या गळ्यावर चाकूने वार केला. त्यामुळे त्यांच्या गळ्यावर ५ इंच इतका मोठी जखम झाली. त्यामुळे अधिक रक्तस्त्राव झाला.

Back to top button